फ्रिश, रॅग्नर आन्तोन किट्टिल (३ मार्च १८८५ – ३१ जानेवारी १९७३)

R

फ्रिश यांचा जन्म नॉर्वेमधील ख्रिस्तियाना येथे झाला. फ्रिश कुटुंबीय हे १७ व्या शतकात जर्मनीहून नॉर्वेमधील कोंग्सबर्ग (Kongsberg) येथे स्थलांतरीत झाले. जवळपास दोन शतके हे कुटुंब सोन्या-चांदीच्या खाणी व व्यापार यात कार्यरत होते. सुरुवातीला फ्रिश ऑस्लोतील डेव्हीड अँडरसन यांच्याकडे उमेदवारी करत होते, परंतु आईच्या सल्ल्याप्रमाणे ते अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी रॉयल फ्रेडरिक विद्यापीठात दाखल झाले आणि त्यांना १९१९ मध्ये अर्थशास्त्रातील पदवी मिळाली. हस्तकौशल्य कारागीर ही परिक्षाही फ्रिश यांनी १९२० मध्ये दिली. नंतर ते वडलांच्या कारखान्यात भागीदार झाले.

फ्रिश यांना १९२१ मध्ये ओस्लो विद्यापीठाची फेलोशिप मिळाली आणि अर्थशास्त्र व गणित या विषयांच्या अभ्यासासाठी त्यांनी फ्रान्स व इंग्लंडमध्ये ३ वर्षे व्यतीत केली. १९२३ मध्ये नॉर्वेला परतल्यावर जरी त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय अडचणीत आलेला होता, तरी फ्रिश यांनी शास्त्रीय संशोधनालाच प्राधान्य दिले आणि संभाव्यता सिद्धांतावरचे काही शोधनिबंध प्रसिद्ध केले. १९२५ पासून त्यांनी विद्यापीठात शिकवायला सुरुवात केली. ‘गणितीय संख्याशास्त्र’ या प्रबंधासाठी फ्रिश यांना १९२६ मध्ये ऑस्लो विद्यापीठाची पीएच.डी. मिळाली. १९२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात फ्रिश यांनी भौतिकशास्त्राप्रमाणे अर्थशास्त्रातही सैध्दांतिक व प्रायोगिक पुंजीकरण (Empirical quantization) यांचा मार्ग एकच असावा असे प्रतिपादन केले. त्यांच्या ग्राहकाच्या सिद्धांताने पुढे नव-वॉलरसिअन (Neo-Walrasian) संशोधनाला दिशा दिली.

फ्रिश यांना १९२७ मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची पाठ्यवृत्ती मिळाली व ते अमेरिकेस गेले. तेथे अर्थशास्त्रज्ञांचे लक्ष त्यांनी गणिती व संख्याशास्त्रीय दृष्टीकोनाकडे वेधले. आयर्विंग फिशर, वेस्ले क्लेअर मिचेल, अॅलन यंग आणि हेन्री शुल्ट यांच्याशी फ्रिश यांनी वेळोवेळी अभ्यासपूर्ण चर्चा केली. त्याचबरोबर अर्थमितीमध्ये कालक्रमिका (Time series) यावर संशोधन केले. ते १९२८ मध्ये ऑस्लो विद्यापीठात फ्रिश संख्याशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे सहकारी प्राध्यापक झाले. संख्याशास्त्रातील कालक्रमिका या विषयावर फ्रिश यांनी लेखांची मालिकाच प्रसिद्ध केली. १९२९ मध्ये त्यांचा महत्त्वाचा अर्थशास्त्रीय पद्धतीवरचा निबंध ‘सहसंबंध व संख्याशास्त्रीय चलामधील विकरण’ (Correlation and Scatter in Statistical Variables) आणि पाठोपाठ ‘अर्थशास्त्रीय सिद्धांतातील स्थिरता व गतिशीलता’ (Static and Dynamics in Economic Theory) हाही निबंध लिहिला; यामुळे अर्थशास्त्रीय विश्लेषणात गतिशीलतेचा अंतर्भाव झाला.

फ्रिश १९३१ साली ऑस्लो विद्यापीठात प्राध्यापक झाले. रॉकफेलर फाउंडेशनच्या निधीतून त्यांनी १९३२ मध्ये (Rockefeller-funded Institute of Economics) रॉकफेलर अर्थशास्त्रीय संस्था सुरू केली व ते संस्थेत संशोधन विभागाचे संचालक झाले.

१९३३ मध्ये फ्रेडरिक वॉ यांच्यासह फ्रिश यांचा फ्रिश-वॉ (Waugh) सिद्धांत इकॉनॉमेट्रीका या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. अल्पिष्ठाधिकार (Oligopoly) मध्ये त्यांनी तर्कावर आधारित चल (conjectural variation) हा दृष्टीकोन विकसित केला. प्रेरणा-प्रचार व्यापार-चक्र (impulse-propagation business cycle) हे फ्रिश यांनी प्रतिपादन केलेले आधुनिक शास्त्रबद्ध व्यापार-चक्र सिद्धांताचे तत्त्व मानले जाते. अर्थमिती संस्थेच्या (Econometric Society) संस्थापकांपैकी ते एक होते. तसेच इकॉनॉमेट्रीका जर्नलचे फ्रिश हे २० वर्षांहून अधिक काळ संपादक होते. आधीच्या पाच वर्षातील त्या जर्नलमधील उत्तम शोधनिबंधाला फ्रिश पदकाने एक वर्षाआड सन्मानित केले जाते.

फ्रिश यांनी १९४२-४३ या वर्षात कायदा शाखेचे अधिष्ठाता म्हणूनही काम पाहिले. आज त्यांच्या सन्मानार्थ ऑस्लो विद्यापीठात ‘फ्रिश’ केंद्र सुरू आहे. १९४३-४४ मध्ये जर्मन नाझी सैन्याने नॉर्वे ताब्यात घेतले तेव्हा फ्रिश यांना तीन वेगवेगळया छळछावण्यांत रहावे लागले होते.

१९६१ साली फ्रिश हे अॅन्टोनिओ फेलट्रीनेली (Antonio Feltrinelli) पारितोषिकाचे मानकरी होते, तर १९६९ साली अर्थशास्त्रीय व्यवस्थेच्या विश्लेषणात गतिशील प्रतिमानाचा विकास व उपयोजन केल्याबद्दल यान टिनबर्गेन (Jan Tinbergen) यांच्या सोबत विभागून त्यांना सर्वोच्च मानाचा असा अर्थशास्त्रातील पहिला नोबेल पुरस्कार  मिळाला.

फ्रिश यांचे निवडक लेखन :

  1. आर्थिक सिद्धांतासाठी गतिशील दृष्टीकोन (फ्रिश यांची येल येथील व्याख्याने) १९३०.
  2. सीमांतिक उपयोगिता मोजण्याची नवी पद्धत, १९३२.
  3. आधुनिक अर्थशास्त्राचा पायाः रॅग्नर फ्रिश यांचे निवडक निबंध (विसाव्या शतकातील अर्थतज्ञ) १९५५.
  4. आर्थिक नियोजनाचा अभ्यासः निबंधसंग्रह (अर्थशास्त्र व अर्थमितीचा आंतरराष्ट्रीय अभ्यास) १९७५.
  5. अर्थमितीमधील समस्या व उपायः फ्रिश यांची पॉईनकेअर व्याख्याने (१९३३), २००९.

संदर्भ :

समीक्षक : पाटकर, विवेक