सर्वसामान्यपणे मराठीमध्ये संयम या शब्दाचा अर्थ ‘मनावर ताबा ठेवणे’ असा होतो. योग दर्शनामध्ये ‘संयम’ हा एक पारिभाषिक शब्द आहे. अष्टांगयोगातील धारणा, ध्यान आणि (संप्रज्ञात) समाधि या अंतिम तीन अंगांना एकत्रितपणे संयम अशी संज्ञा आहे. संयम (सम् + यम्) म्हणजे चित्ताचे योग्य रीतीने केलेले नियंत्रण होय. चित्त एखाद्या विषयावर संपूर्णपणे एकाग्र होणे म्हणजे संयम होय. धारणा, ध्यान आणि समाधि त्या एकाग्रतेच्या प्रक्रियेचेच तीन टप्पे आहेत. धारणा म्हणजे एखाद्या विषयावर किंवा स्थानावर चित्त स्थिर करणे. ध्यान म्हणजे त्या एकाच विषयाचे ज्ञान दीर्घकालपर्यंत होत राहणे. समाधि म्हणजे ध्यान करणारा मी आणि ध्यान करण्याची क्रिया यांची जाणीव न होता केवळ ज्या विषयावर चित्त एकाग्र आहे त्याचीच जाणीव राहणे.
योग्याचे त्याच्या चित्तावर व त्याच्या संयमावर पूर्ण नियंत्रण असेल तर ज्या विषयावर संयम केला जात आहे त्या विषयाची प्रज्ञा (संपूर्ण ज्ञान) योग्याला प्राप्त होते. योगी वेगवेगळ्या विषयांवर संयम करू शकतो, त्यामुळे त्या त्या विषयाची प्रज्ञा व विशिष्ट सिद्धीही योग्याला प्राप्त होते. महर्षि पतंजलींनी योगसूत्रांच्या विभूतिपादामध्ये कोणत्या विषयांवर संयम केल्याने कोणते ज्ञान किंवा सिद्धि प्राप्त होऊ शकते याचे विस्तृत स्पष्टीकरण केलेले आहे. संयमाद्वारे प्राप्त होणाऱ्या सिद्धींचे थोडक्यात विवेचन पुढीलप्रमाणे —
- वस्तूमध्ये होणाऱ्या धर्म, लक्षण आणि अवस्था या तीन प्रकारच्या परिणामांवर संयम केल्यास योग्याला त्या वस्तूचे अतीत (भूतकाळातील) आणि अनागत (भविष्यकाळातील) स्वरूप काय असेल याचे ज्ञान प्राप्त होते (योगसूत्र ३.१६).
- एखादी वस्तू (अर्थ), तिचे नाव (शब्द) आणि त्या वस्तूचे ज्ञान या तीन वेगळ्या गोष्टी आहेत; पण आपल्याला या तीन गोष्टी एकरूपाने अनुभवाला येतात. या तीन गोष्टी वेगवेगळ्या आहेत अशाप्रकारे त्यांच्यातील भिन्नतेवर संयम केल्यास योग्याला सर्व प्राणिमात्रांची भाषा समजू शकते (योगसूत्र ३.१७).
- जीव कोणतेही कर्म करतो तेव्हा त्या कर्माचे संस्कार चित्तामध्ये उत्पन्न होतात. चित्तातील कर्माच्या संस्कारांवर संयम केल्यास पूर्वजन्माचे ज्ञान प्राप्त होऊ शकते (योगसूत्र ३.१८).
- दुसरी व्यक्ती एखाद्या विषयाला कशा प्रकारे जाणत आहे हे समजून त्यावर संयम केल्यास दुसऱ्याच्या चित्ताचे ज्ञान होते (योगसूत्र ३.१९).
- स्वत:च्या शरीराच्या रूपावर संयम केल्यास रूपातील ग्राह्यशक्ति स्तंभित होते, ज्यामुळे अन्य व्यक्ती योग्याच्या शरीराचे रूप पाहू शकत नाहीत व योगी अंतर्धान पावतो (योगसूत्र ३.२१).
- शीघ्र फळ देणाऱ्या आणि दीर्घकाळाने फळ देणाऱ्या कर्मांवर संयम केल्याने अथवा अरिष्टांचे (मृत्युसूचक निमित्त) ज्ञान झाल्यास व्यक्तीचा मृत्यू कधी होणार याचे ज्ञान होते (योगसूत्र ३.२२).
- मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या भावनांवर संयम केल्याने त्या त्या भावनांचे दृढतेने अनुष्ठान करण्याचे बळ योग्याला प्राप्त होते (योगसूत्र ३.२३).
- हत्ती, घोडा किंवा गरुड यांसारख्या प्राणी, पक्षी यांच्या विशिष्ट सामर्थ्यावर संयम केल्याने थोड्याफार प्रमाणात त्यांच्यासारखेच बळ योग्याला प्राप्त होऊ शकते (योगसूत्र ३.२४).
- ज्योतिष्मती प्रवृत्तीद्वारे प्राप्त होणाऱ्या ज्ञानावर संयम केल्याने अतिसूक्ष्म असल्यामुळे, मध्ये व्यवधान असल्यामुळे आणि दूर असल्यामुळे ज्या गोष्टी दिसत नाहीत, अशा गोष्टींचेही ज्ञान प्राप्त होते (योगसूत्र ३.२५).
- सूर्य तत्त्वावर संयम केल्यास संपूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान प्राप्त होते (योगसूत्र ३.२६).
- चंद्र तत्त्वावर संयम केल्यास नक्षत्र आणि त्यांच्या विशिष्ट रचनेचे ज्ञान होते (योगसूत्र ३.२७).
- ध्रुव ताऱ्यावर संयम केल्यास नक्षत्रांच्या गतीचे ज्ञान होते (योगसूत्र ३.२८).
- नाभिचक्रावर संयम केल्यास शरीराच्या रचनेचे ज्ञान होते (योगसूत्र ३.२९).
- कंठातील पोकळीवर संयम केल्याने भूक व तहान यांपासून मुक्ती मिळते (योगसूत्र ३.३०).
- कूर्म नावाच्या नाडीवर संयम केल्यास शरीर दृढ आणि अचल बनते (योगसूत्र ३.३१).
- दोन्ही भुवयांच्या मध्यभागी असणाऱ्या स्थानावर संयम केल्यास सिद्ध पुरुषांचे दर्शन होऊ शकते (योगसूत्र ३.३२).
- हृदयावर संयम केल्याने स्वत:च्या चित्ताचे ज्ञान होते (योगसूत्र ३.३४).
- श्रोत्र-इंद्रिये (ज्यामुळे आवाज ऐकू येतो) आणि आकाश तत्त्व या दोघांच्या संबंधावर संयम केल्याने दिव्य ध्वनी किंवा अनाहत नाद ऐकू येतो (योगसूत्र ३.४१).
- शरीर आणि आकाश यांच्या संबंधावर संयम केल्यास किंवा कापसासारख्या हलक्या वस्तूवर चित्त एकाग्र झाल्यास शरीराला जमिनीपेक्षा वर उचलता येते (योगसूत्र ३.४२).
- पंचमहाभूतांमधील स्थूल (विशेष धर्म), स्वरूप (मूळ स्वरूप), सूक्ष्म (महाभूतांचे सूक्ष्म कारण म्हणजे तन्मात्र), अन्वय (त्रिगुण) आणि अर्थवत्त्व (प्रयोजन) या पाच आयामांवर संयम केल्याने योग्याला भूतजय म्हणजे त्या त्या महाभूतावर संपूर्ण नियंत्रण प्राप्त होते (योगसूत्र ३.४४).
- इंद्रियांमधील ग्रहण, स्वरूप, सूक्ष्म, अन्वय आणि अर्थवत्त्व या पाच आयामांवर संयम केल्याने योग्याला इंद्रियजय म्हणजे त्या त्या इंद्रियावर संपूर्ण नियंत्रण प्राप्त होते (योगसूत्र ३.४७).
- क्षण आणि क्षणांच्या क्रमावर संयम केल्याने विवेकजन्य ज्ञान प्राप्त होते (योगसूत्र ३.५२).
योगसूत्रात उल्लेखिलेल्या संयमाद्वारे प्राप्त होणाऱ्या या सिद्धींविषयी वाचल्यावर त्यांविषयी केलेले विवेचन हे अंधश्रद्धायुक्त किंवा कल्पित वाटू शकते, परंतु या सिद्धींना अप्रामाणिक म्हणता येऊ शकत नाही. कारण एखादी गोष्ट यथार्थ आहे हे सिद्ध करण्यासाठी जसे प्रमाण लागते, तसेच एखादी गोष्ट कल्पित आहे हे सिद्ध करण्यासाठीही प्रमाण लागते. ध्यान किंवा समाधि हा अगदी व्यक्तिनिष्ठ अनुभव असल्यामुळे त्याला दुसऱ्या कोणासाठी तरी सिद्ध करून दाखवणे अशक्य आहे. चित्त एकाग्र झाले आहे का; किंवा ते ध्यान अवस्थेमध्ये गेले आहे का; समाधि अवस्थेपर्यंत गेले आहे हे सर्व मोजण्यासाठी कोणतीही यंत्रसामग्री उपलब्ध नाही. त्यामुळे प्रचलित संशोधन पद्धतींनुसार संयम आणि संयमाद्वारे प्राप्त होणाऱ्या सिद्धींचे प्रामाण्य सिद्ध करणे कठीण आहे. तरीसुद्धा इतिहासात काही योग्यांना अशा प्रकारच्या काही सिद्धींची उपलब्धी झाली असल्याचे उल्लेख प्राप्त होतात. त्यावरून संयम आणि सिद्धी यांची अनुभवगम्यता आपण स्वीकारू शकतो.
समीक्षक : कला आचार्य