विवेकज्ञानाला सांख्ययोग दर्शनांमध्ये सर्वोत्कृष्ट ज्ञान मानले आहे. ज्या ज्या वेळी ज्ञान होते, त्या त्या वेळी त्या ज्ञानाचा कोणता न कोणता विषय असतो; म्हणजे ज्ञान नेहमी ‘कशाच्या तरी विषयी’ असते. ज्ञानाचा विषय एक पदार्थ किंवा अनेक पदार्थही असू शकतात. ज्ञानाचा विषय दोन पदार्थांमधील संबंध किंवा दोन पदार्थांमधील भेदही असू शकतात. दोन पदार्थांमधील भेदाचे ज्ञान होणे, दोन पदार्थ वेगळे आहेत असे जाणणे म्हणजे विवेकज्ञान होय असा विवेक शब्दाचा सामान्य अर्थ आहे; परंतु योगदर्शनानुसार विवेकज्ञान हे एक विशेष प्रकारचे ज्ञान आहे. दोन पदार्थांमधील भेदांचे ज्ञान अनेक निकषांद्वारे होऊ शकते; परंतु ज्या ठिकाणी अन्य कोणतेही निकष लागू पडत नाही, त्या ठिकाणी ते ज्ञान विवेकाद्वारे होऊ शकते.

सर्वसाधारणपणे जाती, लक्षण आणि देश या निकषांच्या आधारे दोन पदार्थांमधील भेदाचे ज्ञान होते. आंबा आणि फणस यांमधील भेदाचे ज्ञान त्यांची जाती भिन्न असल्यामुळे होते. जर दोन पदार्थ एकाच जातीचे असतील, तर त्यांमधील लक्षणे वेगळी असल्यामुळे त्यांतील भेदाचे ज्ञान होते. उदाहरणार्थ, दोन आंब्यांची तुलना केल्यास दोघांची जाती समानच आहे; परंतु त्यांचा रंग, आकार, चव इत्यादी लक्षणांच्या आधारावर त्यांमधील भिन्नता जाणता येऊ शकते. जर दोन्ही वस्तूंची जाती आणि लक्षण अगदी समान असतील, तर त्यांमधील भिन्नता ‘देश’ म्हणजे ते दोन पदार्थ कोणत्या ठिकाणी स्थित आहेत, त्या स्थानाच्या आधारे करता येऊ शकते. उदाहरणार्थ, जर दोन आंबे अगदी समान रंगाचे, समान वजनाचे आणि समान चवीचे असतील, तर ते दोन आंबे ज्या ठिकाणी स्थित आहेत, त्या स्थानाच्या (देशाच्या) भिन्नतेमुळे त्यांतील भेद जाणता येऊ शकतो; जसे उजवीकडे ठेवलेला आंबा आणि डावीकडे ठेवलेला आंबा. परंतु, जर दोन पदार्थांमधील भिन्नतेचे ज्ञान जाती, लक्षण आणि देश या तीनही निकषांच्या आधारावर करणे शक्य नसेल, तर त्यामधील भेदाचे ज्ञान योग्याला विवेकज्ञानाच्या सहाय्याने होऊ शकते (योगसूत्र ३.५३)

अशाप्रकारचे विवेकज्ञान हे विशेष प्रकारच्या अभ्यासाने प्राप्त करता येते, हे महर्षी पतंजलीनी स्पष्ट केले आहे (योगसूत्र ३.५२). क्षण आणि त्याच्या क्रमावर संयम (धारणा, ध्यान, समाधी) केल्याने विवेकाद्वारे ज्ञान प्राप्त होते. ज्याप्रमाणे सध्या काळाचे मोजमाप करण्यासाठी तास, मिनिट, सेकंद इत्यादी परिमाणे वापरली जातात, त्याप्रमाणे प्राचीन काळी मुहूर्त, होरा इत्यादी परिमाणे वापरली जात. काळाचे सूक्ष्म भेद करीत गेल्यास त्याची परिसीमा म्हणजे क्षण होय. जेव्हा काळाचे अतिसूक्ष्म विभाग करता येणे शक्य नाही, ती शेवटची सूक्ष्मतम अवस्था म्हणजे क्षण होय (व्यासभाष्य ३.५२). क्षणाचा अवधी ‘क्षणिक’ असला तरी क्षण व्यतीत होतात, त्या क्षणांमध्ये क्रम असतो. क्षण आणि त्याच्या क्रमावर संयम (धारणा, ध्यान, समाधी) साधल्याने विवेकज्ञान प्राप्त होते. दोन क्षणांमधील भेद जाती, लक्षण किंवा देश यांच्या आधारे जाणता येऊ शकत नाही. क्षण हा अतिसूक्ष्म पदार्थ असल्याने त्यावर संयम केल्याने सूक्ष्म पदार्थांमधील भेद जाणण्याची योग्यता प्राप्त होते. अशाप्रकारची योग्यता प्राप्त झाल्यावर पुरुष आणि बुद्धी किंवा प्रकृती आणि पुरुष या सूक्ष्म तत्त्वांमधील भेदाचे ज्ञान, ज्याला सांख्ययोगामध्ये विवेकख्याति म्हणतात, ते प्राप्त होऊ शकते.

पहा : पुरुष, प्रकृति, योगसूत्रे, विवेकख्याति.

संदर्भ :

  • स्वामी श्री ब्रह्मलीनमुनि, पातञ्जल योगदर्शन, वाराणसी, २००३.

समीक्षक : कला आचार्य