मीराबो, ऑनॉरे गाब्रीएल रीकेती काँत द : (९ मार्च १७४९ – २ एप्रिल १७९१). फ्रेंच राज्यक्रांतिकालातील एक प्रभावी वक्ता आणि मुत्सद्दी. जन्म फ्रान्समधील एका सुप्रतिष्ठित सरदार घराण्यात ओमनॉन (नेमर्सजवळ) या गावी. मीराबोचे बालपण आजार (देवीचा रोग) आणि उडाणटप्पूपणात गेले. त्याच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण राहिल्यामुळे त्याला कुरूपता प्राप्त झाली. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने पॅरिसमधून शिक्षण घेऊन, कॉर्सिका येथील घोडदळात एक स्वयंसेवक म्हणून नोकरी पतकरली (१७६९).
मार्की द मारी या सरदाराच्या एमिली या मुलीशी त्याचे लग्न झाले (१७७२). यानंतर तो आणखी बेफिकीर व कर्जबाजारी झाला. तेव्हा वडिलांनीच त्याला तुरूंगात डांबले (१७७४). तिथून तो पळून स्वित्झर्लंडमध्ये गेला. तिथे मार्की द मोनिए या सरदाराची तरुण पत्नी सॉफी (मारी-तेरॅझद् सफे) हिच्याची त्याची मैत्री झाली. ती दोघे ॲम्स्टरडॅमला स्थायिक झाली. १७७७ मध्ये त्या दोघांना कैद करून पॅरिसला आणण्यात आले. त्याच्यावर अनेक आरोप ठेवून त्याला कैद झाली आणि पुढे फाशीची शिक्षाही फर्मावण्यात आली; परंतु त्यातूनही काही वर्षांच्या तुररुंगवासानंतर त्याची सुटका झाली (१७८२). त्याच्या पत्नीने कायदेशीर विभक्तपणा मिळवून त्याच्याशी कायमचे संबंध तोडले (१७८३).
तुरुंगात त्याने तत्कालीन विचारवंतांचे विपुल साहित्य वाचले. फ्रान्स शासनाचा गुप्त प्रतिनिधी म्हणून त्याने इंग्लंड-प्रशियाला भेटी दिल्या. तिथे त्याने दुसरा फ्रीड्रिख व दुसरा फ्रीड्रिक विल्यम यांच्या भेटी घेतल्या. प्रशियाच्या भेटीसंबंधीचा वृत्तांत त्याने द ला मॉनार्शीं प्युसियॅन सू फ्रेदेरिक ल ग्रा (इं. शी. ‘प्रशियन मॉनर्की अंडर फ्रीड्रिख द ग्रेटʼ) या नावाने प्रसिद्ध केला (१७८८). तसेच प्रशियाला कलंक लावणारा इस्त्वावर सक्रॅत द् लाकूर द् बॅर्लँ (इं.शी. ‘सिक्रेट हिस्टरी ऑफ द कोर्ट ऑफ बर्लिनʼ) हा ग्रंथ लिहिला (१७८९). यामुळे पॅरिसला आल्यानंतर त्याची सरंजामदारवर्गात नालस्ती झाली. फ्रेंच संसदेच्या त्याच्या उमेदवारीला सरदारांनी विरोध दर्शविला. तेव्हा ॲक्स-आं-प्रॉव्हांसमधून तो सामान्य लोकांचा प्रतिनिधी म्हणून निवडून आला (१७८९). त्याने आपल्या वक्तृत्वाने स्टेट्स जनरलमध्ये प्रभाव पाडला. त्याला लोक ‘फ्रेंच डिमॉस्थिनीझ’ म्हणत. राष्ट्रीय दिवाळखोरी, नागरी संविधान, राजाची आज्ञा, शांतता आणि युद्ध वगैरे विषयांवरील त्याची वक्तव्ये संसदेत गाजली. त्याने २३ जून १७८९ च्या राजाज्ञेला प्रतिकार करून जनतेचे धन्यवाद मिळवले.
मीराबोने फ्रेंच क्रांतिपूर्वी आपल्या कुरिए द् प्रॉव्हांस (इं. शी. ‘कोरीअर द प्रॉव्हेन्सʼ) या वृत्तपत्रातून आणि विविध भाषणांतून प्रातिनिधिक राजेशाही शासनाचा पुरस्कार केला; तथापि सरंजामशाही नष्ट करण्याच्या धोरणाचा मात्र त्याने पाठपुरावा केला नाही. राज्यपद नष्ट व्हावे असे त्याला वाटत नव्हते; पण राजाने क्रांतीच्या मूलभूत तत्त्वास मान्यता द्यावी आणि घटनेनुसार राज्यकारभार करावा, असा सल्ला त्याने सोळाव्या लूईला दिला. शासनात काही मूलभूत बदल आवश्यक आहेत, या क्रांतिकारकांच्या मतालाही त्याने पाठिंबा दिला. स्टेट्स जनरलच्या सभासदांना शपथ घेण्यासाठी त्यांना टेनिस कोर्टावर नेण्यात त्याने पुढाकार घेतला. संसदेने धार्मिक बाबतीत काही सुधारणा सुचविल्या, त्यामागील प्रेरणाही त्याचीच होती. त्याला राजाचा पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा होती; पण संसदेतील कोणत्याही प्रतिनिधीने राजाचा मंत्री होता कामा नये, असा राष्ट्रीय सभेचा आदेश होता. तेव्हा राजाने त्याला खासगी सल्लागाराची जागा देऊ केली (१७९०). कर्जाचा बोजा कमी होईल म्हणून त्याने ती स्वीकारली; परंतु प्रत्यक्षात राजा लाफायेतचा सल्ल घेत असे. याच वेळी राजाचे द्रव्यसाहाय्य मीराबो घेत आहे, अशी वार्ता प्रसृत झाली. त्याच्यावर काहींनी फितुरीचाही आरोप ठेवला. परंतु त्याच्या २९ जानेवारी १७९० च्या राष्ट्रीय सभेतील तडफदार भाषणामुळे त्याची लोकप्रियता पुन्हा वाढली. त्यानंतर तो अचानक आजारी पडून पॅरिस येथे मरण पावला. त्याला इतमामाने सेंट जीनेव्हिव्ह येथील चर्चमध्ये पुरण्यात आले. पुढे राजाशी केलेला गुप्त पत्रव्यवहार उघडकीस आल्यावर, त्याचे शव तेथून हलविण्यात आले (१७९३).
संदर्भ :
- Vallentin, A. Mirabeau, Voice of the Revolution, Toronto, 1948.
- Welch, O. J. G. Mirabeau : a Study of a Democratic Monarchist, New York, 1951.