हा व्यक्तिमत्त्व मानसशास्त्रातील एक गुणविशेष (trait) सिद्धांत आहे. हा सिद्धांत हान्स यूर्गन आयसेंक/आयझेंक (Hans Jürgen Eysenck, १९१६–१९९७) या जन्माने जर्मन असलेल्या ब्रिटिश मानसशास्त्रज्ञांनी विकसित केला. त्यांनी व्यक्तिमत्त्वाच्या अभ्यासाकरिता घटक विश्लेषण (factor analysis) पद्धतीचा वापर केला. या सिद्धांतानुसार व्यक्तिमत्त्वाचे तीन प्रमुख घटक आहेत. हे घटक त्यांनी तीन व्यापक आयामांद्वारे मांडले. त्यातील पहिले दोन आयाम हा सिद्धांत मांडताना सुरुवातीसच सांगितले होते. तर तिसरा घटक किंवा आयाम त्यांनी १९७० मध्ये मांडला. त्यांच्या सिद्धांतानुसार, पहिला आयाम किंवा अक्ष चेतापदशिता किंवा अतिभावनिकता (Neuroticism) हा आहे. या अक्षाच्या एका बाजूस अतिभावनिकता किंवा अधिक चेतापदशिता हा घटक आहे, या टोकापासून हा घटक कमी-कमी होत दुसऱ्या बाजूच्या कमी चेतापदशिता ह्या घटकापर्यंत जातो. ही या अक्षाची मर्यादा आहे. दुसरा अक्ष बहिर्मुखता (Extraversion) हा आहे. या अक्षाच्या एका बाजूस उच्च बहिर्मुखता आहे व हा घटक कमी होत अक्षाच्या दुसऱ्या टोकास असलेल्या उच्च अंतर्मुखता या घटकापर्यंत जातो. ही या अक्षाची मर्यादा आहे. या दोन अक्षांबरोबर १९७० मध्ये त्यांनी तिसऱ्या एका घटकाचे वर्णन आपल्या सिद्धांतात मांडले, तो प्रकार म्हणजे चित्तविकृती (Psychosticism) हा होय. या आयामाच्या किंवा अक्षाच्या एका बाजूस कमी चित्तविकृती म्हणजेच सामाजिक व भावनिक स्थिरता हा घटक आहे, तर हा घटक वाढत वाढत अक्षाच्या दुसऱ्या बाजूस असणाऱ्या भावनिक असमायोजन म्हणजेच जास्त चित्तविकृती या घटकापर्यंत जातो, ही याची मर्यादा आहे.
व्यक्तिमत्त्वाच्या या सिद्धांताबद्दल पुढील पाच भागांमध्ये माहिती दिलेली आहे. १. व्यक्तिमत्त्वाच्या प्रमुख तीन घटकांचे वर्णन; २. तीन घटकांचे मापन; ३. सिद्धांतावरील अभ्यास; ४. इतर पर्यायी सिद्धांत; ५. उपयुक्तता.
१. आयसेंक यांनी मांडलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या सिद्धांताचे वर्णन – आयसेंक यांच्यामते चेतापदशिता अधिक असलेल्या व्यक्ती अतिसंवेदनाक्षम असून भावनात्मकदृष्ट्या नकारात्मक भावनांना – जसे की उदासीनता, नैराश्य आणि चिडचिड यांना अनुभवण्याची शक्यता जास्त असते. तर चेतापदशिता कमी असणाऱ्या व्यक्ती या शांत स्वभावाच्या व स्वत:वर अधिक नियंत्रण ठेवणाऱ्या असतात. उच्च बहिर्मुखता असणाऱ्या व्यक्ती जोमदार, क्रियाशील आणि सामाजिक असतात, तर उच्च अंतर्मुखता असणाऱ्या व्यक्ती शांत, संकोची, स्वत:मध्ये रमणाऱ्या आणि भिडस्त असतात. चित्तविकृती कमी असलेल्या व्यक्ती सहकारी आणि विनयशील, विश्वासू, समजूतदार, मदत करणाऱ्या, हळव्या मनाच्या, कार्य-केंद्रित आणि सुव्यवस्थित असतात. याउलट अधिक प्रमाणात चित्तविकृती असलेल्या व्यक्ती कठोर मनाच्या, क्रूर, थंड डोक्याच्या, दुसऱ्यांच्या दु:खाबद्दल जाणीव नसलेल्या, अविश्वासू, मदत न करणाऱ्या, विरोध करणाऱ्या आणि उद्धट, विचलित, अव्यवस्थित असतात; मात्र त्यांच्यामध्ये एक प्रकारची विचित्र सर्जनशीलता असते. व्यक्तिमत्त्वाच्या या आयामांमध्ये अनेक घटक व्यापकरीतीने सामावलेले आहेत. त्या सर्वांची चाचणी करून व्यक्तिमत्त्वाचे मापन केले जाते. या सिद्धांतानुसार व्यक्तिमत्त्वाचे मापन करणाऱ्या अनेक प्रश्नावल्या आणि चाचण्या बनविण्यात आल्या.
२. आयसेंकच्या व्यक्तिमत्त्वाच्या सिद्धांताचे मापन – माउड्सली पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी, माउड्सली पर्सनॅलिटी क्वेश्चनिअर, आयसेंक पर्सनॅलिटी क्वेश्चनिअर या आयसेंक यांनी स्वत: विकसित केलेल्या मानसशास्त्रीय चाचण्या आहेत. यातील आयसेंक पर्सनॅलिटी क्वेश्चनिअर सुधारित (१९८४) ही मोठ्या प्रमाणात मानसोपचार तज्ज्ञांकडून वापरली गेली. त्याचे छोटे रूप म्हणजे EPQ – R S आहे. याचे मराठी रूपांतर मानसशास्त्रज्ञ प्र. ह. लोधी यांनी केले असून त्यावर संशोधनही केले आहे. आयसेंक यांनी व्यक्तिमत्त्वाच्या वरील तीन घटकांना काही उपघटकांमध्ये विभागून त्याचे मापन करण्याची पद्धती विकसित केली. तिला आयसेंक पर्सनॅलिटी प्रोफाईलर (Eysenck Personality Profiler – EPP) असे म्हणतात. आयसेंक यांनी लहान मुले आणि किशोरवयीन मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचे मापन करण्यासाठी चाचण्या विकसित केल्या. ज्युनिअर आयसेंक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी (JEPI), ज्युनिअर आयसेंक पर्सनॅलिटी क्वेश्चनिअर (JEPQ) या किशोरवयीन मुलांसाठी उपयुक्त चाचण्या आहेत.
३. सिद्धांतावरील अभ्यास – आयसेंकचा व्यक्तिमत्त्वाचा सिद्धांत हा व्यक्तिमत्त्वाचा जीवशास्त्रीय पाया आणि प्रायोगिक अभ्यास महत्त्वाचा आहे असे मानणारा सिद्धांत आहे. आयसेंक यांच्यामते घटक विश्लेषण ही केवळ सुरुवातीची पायरी आहे. प्रयोगात्मक यथार्थता ही अधिक महत्त्वाची. त्यामुळे त्यांनी व्यक्तिमत्त्वाच्या प्रायोगिक अभ्यासाच्या पद्धती विकसित केल्या. या सिद्धांतावरील संशोधने ही मोठ्या प्रमाणात त्याच्या जीवशास्त्रीय पायाबद्दलची आहेत. उदा., उच्च बहिर्मुखता प्रमस्तिष्क उत्तेजनेशी कमी जोडलेली असते तर अंतर्मुखता प्रमस्तिष्क उत्तेजनेशी अधिक जोडलेली असते. त्यामुळे अंतर्मुख व्यक्तींना बाह्य जगातून कमी उत्तेजनाची आवश्यकता असते तर बहिर्मुख व्यक्तींना बाह्य जगातून अधिक उत्तेजनाची आवश्यकता असते. आयसेंक आणि प्रेल यांच्या संशोधनानुसार व्यक्तिमत्त्वाला जनुकीय म्हणजेच अनुवंशिक आधार असतो. त्यांनी चेतापदशिता या आयामाचे वार्तनिक जनुकीय अभ्यासाद्वारे जनुकीय आधार सिद्ध केले. याशिवाय, या सिद्धांतावर मोठ्या प्रमाणात झालेल्या आंतरसांस्कृतिक संशोधनाने या सिद्धांताची उपयुक्तता सिद्ध केली आहे. या सिद्धांतावर २२ हून अधिक संस्कृतींमध्ये संशोधन झाले असून त्यामध्ये विविध विश्लेषण तंत्रांचा वापर केला आहे. या घटक विश्लेषणांनी सर्वसामान्यपणे या सिद्धांताला बळकटी दिली आहे.
४. इतर पर्यायी सिद्धांत – आयसेंक यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सिद्धांतावर होणारी टीका ही प्रामुख्याने त्यांनी सांगितलेल्या घटकांच्या संख्येवर आणि चेतापदशिता या आयामावर आहे. त्यामुळे पंचघटक सिद्धांताच्या विकासानंतर आयसेंक यांचा व्यक्तिमत्त्वाचा सिद्धांत काहीसा मागे पडला. पंचघटक सिद्धांताच्या अनुसार व्यक्तिमत्त्वाचे पाच प्रमुख घटक आहेत. ते म्हणजे एक, चेतापदशिता (Neuroticism); दोन, बहिर्मुखता (Extroversion) तीन, अनुभवाचा खुलेपणा (Openness to Experiance); चार, सहमतीदर्शकता (Agreeableness); पाच, कार्यविवेकी (Consciousness). पंचघटक सिद्धांताने चेतापदशिता या घटकाची सामान्य वर्तन पातळी अधिक स्पष्ट केली. याशिवाय आयसेंक यांच्या सिद्धांतात बौद्धिकता (Intellect) किंवा अनुभवाचा खुलेपणा या मितींचा अभाव आहे. त्यामुळेदेखील पंचघटक सिद्धांत अधिक व्यापक आहे. हेक्साको (Hexaco) हा देखील एक वेगळा सिद्धांत आहे. त्यात सहमतीदर्शकता या घटकाला दोन वेगवेगळ्या घटकांत विभागले आहे. प्रामाणिकपणा-नम्रता आणि सहमतीदर्शकता हे वेगळे घटक यात दर्शविले आहेत.
५. उपयुक्तता – हा सिद्धांत समुपदेशन, राजकारणाचे आकलन, खेळाचे मानसशास्त्र, सर्जनशीलता, कामगारांची निवड इत्यादी ठिकाणी वापरला जातो. मानसिक आजार समजून घेण्यासाठीही या सिद्धांताचा उपयोग केला जातो.
संदर्भ :
- https://www.hanseysenck.co.uk/hj-eysenck.html
समीक्षक : मनीषा पोळ