मानवी अल्पकालिक स्मृती किंवा स्मृतीचा एक प्रकार. मानवी स्मृतीचा अभ्यास करून मानसशास्त्रज्ञांनी सुरुवातीला तिचे दोन विभागांत वर्गीकरण केले, ते म्हणजे अल्पकालिक स्मृती आणि दीर्घकालिक स्मृती. या दोन्ही स्मृती मेंदूशी निगडित आहेत; परंतु त्यानंतर असे लक्षात आले, की लक्षात ठेवण्यासाठीच्या गोष्टी मानवी मेंदूमध्ये संवेदनइंद्रियांमार्फत जातात. उदा., शब्द हे ऐकून (कान या इंद्रियाद्वारे) किंवा वाचून (डोळा या इंद्रियाद्वारे) मेंदूमध्ये प्रवेश करतात आणि लक्षात ठेवले जातात,  वास घेण्यासाठी  घ्राणेंद्रियांचा (नाक) वापर होतो व तो मेंदूत साठवला जातो, स्पर्श लक्षात ठेवण्यासाठी त्वचा हे संवेदनइंद्रिय वापरले जाते इत्यादी. हे लक्षात ठेवणे मेंदूत होत असले, तरी त्याची सुरुवात संवेदनइंद्रियांपासून होते. याचा विचार करून, मानसशास्त्रज्ञांनी असे मानले, की इंद्रियांनाही स्वत:ची स्मृती असावी. या इंद्रियांच्या स्मृतीला संवेदनिक स्मृती असे म्हणतात. संवेदनेच्या प्रकारानुसार तिला प्रतिमा (दृश्य) स्मृती, श्राव्य स्मृती, स्पर्श स्मृती अशी नावे देण्यात येतात.

मानवी संवेदन इंद्रियांचे, म्हणजेच डोळे, कान, नाक, त्वचा यांचे, उत्तेजन झाल्यास सुरुवातीला थोड्या काळासाठीची माहिती (अल्पकालिक माहिती) विशिष्ट मर्यादेत मज्जासंस्थेद्वारे संवेदनइंद्रिय स्मृतीमध्ये दर्शविली जाते. मानसशास्त्रज्ञ ॲटकिन्सन आणि शफरीन यांच्या मतानुसार संवेदन इंद्रिय स्मृती केवळ कच्च्या माहितीने बनलेली असते. तीवर कोणत्याही प्रकारचे संस्कार घडलेले नसतात. संवेदनिक स्मृतीची काही वैशिष्ट्ये आहेत. संवेदनिक स्मृतीमधील माहिती ही इंद्रियसापेक्ष असते. दृश्य माहिती डोळ्याशी संबंधित संवेदन स्मृतीमध्ये ठेवली जाते व ध्वनीची माहिती ही कानाशी संबंधित संवेदन स्मृतीमध्ये ठेवली जाते. या स्मृतीमध्ये उद्दीपकाची वैशिष्ट्ये अतिशय स्पष्टपणे परंतु अत्यल्प काळासाठी साठवलेली असतात. संवेदनिक स्मृती ही काही प्रमाणात अवधानावर अवलंबून असते. ही स्मृती अल्पकालिक असून तिला नवीन स्मृती बदलून टाकतात किंवा तिची जागा घेतात.

वरील सर्वच इंद्रियांना किंवा संवेदनांना स्मृती असल्याचे आढळले असले तरी संवेदन स्मृतीच्या दोन महत्त्वाच्या प्रकारांबद्दल अधिक संशोधन झाले आहे. ते प्रकार १. प्रतिमा (दृश्य) संवेदनिक स्मृति (Iconic Memory) व २. श्राव्य संवेदनिक स्मृति (Echoic Memory) असे होत. ह्या अल्पकालिक संवेदन स्मृती आहेत. दृश्यमान उद्दीपकाचे (बाह्य जगातील दृश्य वस्तू) सुरुवातीचे प्रतिरूपण म्हणजे प्रतिमा (दृश्य) संवेदनिक स्मृति होय. प्रतिमा संवेदनिक स्मृतीचे श्रवणविषयक प्रतिरूपण म्हणजे श्राव्य संवेदनिक स्मृती होय. (नायसर, १९६७). प्रतिमा स्मृती सुमारे २५० मिलिसेकंद (१ मिलिसेकंद हा सेकंदाचा एक हजारावा भाग आहे) या काळासाठी माहिती राखून ठेऊ शकते, तर श्राव्य स्मृती सुमारे २०० मिलिसेकंद ते २.५ सेकंद या काळासाठी माहिती राखून ठेऊ शकते. दृश्य संवेदनिक स्मृतीची क्षमता अंदाजे ३-४ घटक इतकी मानली जाते.

कार्यात्मकदृष्ट्या, संवेदनिक स्मृतीची तुलना संगणकामधील एखाद्या माहिती प्रक्रियेतील नोंदवहीशी (रजिस्टरशी) करता येते. एखाद्या संवेदनइंद्रियामधून जेव्हा माहिती इंद्रिय स्मृतीस्थानी येते, तेव्हा तेथून ती नंतर अल्पकालीन स्मृतीस्थानी प्रवेश करते. तिची क्षमता अल्पकालिक असल्यामुळे ज्या माहितीचा सराव केला जातो किंवा जी माहिती संवेदनाक्षम किंवा भावनिक रीत्या मजबूत असते, तीच माहिती दीर्घकालिक स्मृतिस्थानांमध्ये साठवली जाते. एकदा इंद्रियस्मृतीचे ठसे नष्ट झाले किंवा नवीन स्मृतीने त्यांची जागा घेतली, की प्रथम स्मृती कायमस्वरूपी नष्ट होते.

जनुकीय यंत्रणा संवेदनिक स्मृतीमध्ये महत्त्वाच्या आहेत, असे अलीकडील संशोधनात आढळून आले आहे. मेंदूतून निर्माण होणारे न्यूरोट्रॉफिक फॅक्टरचे  (Brain derived neurotropic factor-BDNF) बदल आणि NMDA मधील बदल अनुक्रमे दृक आणि श्राव्य संवेदनिक स्मृतीच्या क्षमतेला कमी करतात.

संवेदनिक स्मृतीवर व्यक्तीच्या बोधनप्रणालीचे थेट नियंत्रण नसते. संवेदनिक स्मृतीच्या, विशेषकरून, प्रतिमा संवेदनिक स्मृतीच्या अभ्यासाच्या उपयुक्ततेवर काही संशोधकांनी आक्षेप घेतला आहे. एकंदरच संवेदनिक स्मृतीच्या अभ्यासाने मानवी स्मृती यंत्रणेच्या आकलनामध्ये भर पडली आहे.

समीक्षक : मनीषा पोळ