कैवल्याधाम योग संस्था, लोणावळा : (स्थापना- १९२४ दसरा)
स्वामी कुवलयानंद यांनी कैवल्याधाम योग संस्थेची स्थापना केली. स्वामीजींचे गुरु परमहंस श्री माधवदासजी यांच्याकडे ते योगाचे धडे घेत असताना कुवलयानंद यांना योगाचे ज्ञान विज्ञानाच्या तत्त्वावर तपासून पाहावे अशी कल्पना आली. त्यातून कैवल्यधाम या संस्थेच्या स्थापनेची बिजे रोवली गेली.
योग संस्था स्थापन झाल्यावर त्यामध्ये शास्त्रीय संशोधन विभाग सुरू करण्यात आला व त्या काळातील आधुनिक विज्ञानातील यंत्रे आणली व त्याच्या सहाय्याने योगाचे मूल्यमापन सुरू केले. कुवलयानंद यांची धारणा होती की योगामुळे आयुष्याची फक्त कालमर्यादाच वाढत नाही तर शारीरिक व मानसिक क्षमता देखील वाढते. योगाच्या रोग प्रतिबंधक तत्त्वाचा उपयोग करून शरीरातील मज्जासंस्था व ग्रंथीसंस्था उत्तम कार्य करून व्यक्तीला पूर्ण स्वास्थ्य प्रदान करतात, तसेच योग उपचार पद्धती म्हणून सुद्धा दीर्घकालीन आजारावर प्रभावी उपाय आहे.
योग हे अनुभूतीचे शास्त्र आहे परंतु पाश्चिमात्य लोकांच्या प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक निकषांनी मोजण्याच्या पद्धतीचे आव्हान स्वीकारून त्या मार्गाने वाटचाल करणे, पाश्चिमात्य वैज्ञानिकांना पारंपारिक योगशास्त्राच्या आधारे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक अनुभूती घेण्यास शिकवणे, अध्यात्मिक अनुभूती आधुनिक वैज्ञानिक प्रयोगशाळेत सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे ही उद्दिष्टे ठरवण्यात आली.
संस्थेच्या प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगांचे निकाल जगभर पोहोचविण्यासाठी स्वामीजींनी १९३२ साली योगमीमांसा नावाचे मासिक सुरू केले. त्यामधून योग विषयक संशोधन प्रकाशित केले जाई. आतापर्यंत योगमीमांसाचे ४७ खंड प्रसिद्ध झाले आहेत. योगमीमांसाचे खंड महाजालकावर सुद्धा उपलब्ध आहेत. संस्थेच्या शास्त्रीय संशोधन विभागाने आतापर्यंत हजारापेक्षा जास्त योगशास्त्राविषयी संशोधन निबंध प्रसिद्ध केले आहेत.
योग साधनेचा प्रसार व प्रचार जास्तीत जास्त प्रमाणात होण्यासाठी योग शिक्षक निर्माण करण्याची गरज लक्षात घेउन कुवलयानंदांनी योग महाविद्यालय स्थापन केले (१९५१). महाविद्यालयामध्ये पारंपारिक योगाचे धडे फार काटेकोरपणे दिले जातात. सुरुवातीला योगविद्येचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम होता. त्यामध्ये शरीरशास्त्र रचना व कार्यप्रणालीचा अभ्यासाचा देखील समावेश होता, ज्याची योगाद्वारे रोगनिवारण करण्यास मदत होईल. स्वामीजींनी महाविद्यालयाचे नाव योग कॉलेज अँड कल्चरल सिंथेसिस असे ठेवले. पाश्चिमात्य विद्यार्थी येथे मोठ्या प्रमाणात येतात, दोन वर्षे राहून योग अध्ययन करतात. येल आणि इतर पाश्चिमात्य विद्यापीठातील शास्त्रज्ञ येथे प्रतिनियुक्तीवर येऊन योगसाधनेचे धडे घेत होते व त्याचा प्रयोगशाळेत केलेला पडताळा तपासून पाहत होते.
योगाद्वारे रोगनिवारण होऊ शकते हे लोकांच्या लक्षात येऊ लागले व ते कुवलयानंदांकडे उपचारासाठी यायला लागले. रुग्णांची संख्या वाढू लागली म्हणून १९६१ मध्ये स्वामीजींनी योग रुग्णालयाची स्थापना केली. याप्रकारचे त्या काळातील जगातील एकमेव व सर्वप्रथम झालेले हे रुग्णालय आहे. योग रुग्णालयात योगाबरोबर आयुर्वेदिक किंवा निसर्गोपचाराद्वारे व्याधी निवारण करण्याची सोय केली जाते. आयुर्वेदिक पारंपारिक पंचकर्माचाही उपयोग येथे केला जातो. येथे सात्विक आहार दिला जातो. निसर्गोपचारातील तसेच अन्य सर्व उपचार पद्धतींचा अवलंब केला जातो. येथे ७ किंवा १४ दिवसांचे उपचार पद्धतीचे पर्याय उपलब्ध असतात.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्यावर योगपचाराद्वारे व्याधी निवारण करून स्वास्थ्य प्रदान करण्याची संधी स्वामीजीना मिळाली. पंडित मोतीलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडीत मदनमोहन मालवीय, पंडीत जवाहरलाल नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी, मोरारजी देसाई यांसारख्या अनेक मान्यवरांनी कैवल्यधाम संस्थेला भेट देऊन संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
कुवलयानंद स्वामींनी १९३२ मध्ये कैवल्यधामची दुसरी शाखा चर्नी रोड, मुंबई येथे सुरू केली. संस्थेमध्ये अद्यावत ग्रंथालय, तसेच आधुनिक काळाची गरज भागवण्यासाठी आधुनिक संगणक तंत्रज्ञान व इंटरनेट सेवा उपलब्ध आहे.
कैवल्यधाम संस्थेचे ६० हेक्टर जागेत उभारलेले, आधुनिक काळाची कास धरून चालणारे शास्त्रीय संशोधन विभाग, वैज्ञानिक साहित्यानुसंधान विभाग तसेच पारंपारिक योगशास्त्राचे महाविद्यालय लोणावळा येथे आहे.
समीक्षक : आशिष फडके