वॉरनॉक, हेलेन मेरी : (१४ एप्रिल १९२४—२० मार्च २०१९). ब्रिटिश तत्त्ववेत्त्या. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात नीतिशास्त्र, शिक्षणाचे तत्त्वज्ञान, मनाचे तत्त्वज्ञान तसेच विसाव्या शतकातील अस्तित्ववाद, स्त्रीवाद आणि आधुनिक तत्त्वज्ञान असे त्यांचे विशेष अभ्यासविषय होते. या सर्वच विषयांवर त्यांनी अतिशय मूलगामी आणि विपुल लेखन केले आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य अतिशय पायाभूत होते. ब्रिटिश समाजात जिथे दुरुस्तीची गरज होती, तिथे त्यांनी ती अतिशय तातडीने आणि कठोरपणे केली. त्यामुळे अँड्र्यू ब्राऊन या प्रसिद्ध ब्रिटिश पत्रकाराने त्यांचा गौरव ‘प्रस्थापित व्यवस्थेतील तत्त्वज्ञानात्मक दुरुस्ती कारागीर’ (Philosophical Plumber to the Establishment) अशा शब्दांत केला. ‘अँग्लीकन (इंग्लंडमधील चर्च) निरीश्वरवादी’ ह्या शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते.

मेरी वॉरनॉक यांचा जन्म इंग्लंडमधील विंचेस्टर या शहरात झाला. त्यांच्या आईचे नाव इथेल आणि वडिलांचे नाव आर्चीबाल्ड एडवर्ड विल्सन होते. मेरी त्यांच्या आईवडिलांच्या सातपैकी सहावे अपत्य होत्या. मेरी यांचा जन्म होण्यापूर्वी सात महिने आधीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. वडील अतिशय प्रतिष्ठित अशा विंचेस्टर महाविद्यालयामध्ये जर्मन भाषेचे शिक्षक आणि वसतिगृहप्रमुख होते. वडिलांच्या निधनामुळे मेरी यांचे (आणि त्यांची बहीण स्टेफना हिचे) पालनपोषण मातृप्रधान कुटुंबात म्हणजे आई आणि दाईच्या देखरेखीखाली झाले. मेरी यांचा सर्वांत मोठा भाऊ माल्कम गतिमंद होता, छोटा भाऊ डंकन विल्सन इंग्लडचा राजदूत होता, तर एका भावाचे बालपणीच निधन झाले. १९४९ साली मेरी यांचा विवाह प्रसिद्ध तत्त्ववेत्ते सर जिओफ्रे जेम्स वॉरनॉक यांच्याशी झाला. ते सेंट ह्यू’ज महाविद्यालय, ऑक्सफर्ड येथे मेरी यांचे सहाध्यायी आणि मॅग्डलेन महाविद्यालयाचे फेलो होते. कालांतराने ते सेंट ह्यू’ज महाविद्यालयात फेलो व प्राध्यापक झाले. त्यानंतर हेर्टफर्ड महाविद्यालयाचे प्राचार्य आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कुलगुरू होते. या तत्त्ववेत्त्या आणि जनविवेकवादी जोडप्याने तत्कालीन ब्रिटिश प्रबोधन काळात महत्त्वाची भूमिका बजावली. मेरी यांना दोन मुली आणि तीन मुलगे अशी पाच अपत्ये झाली. पती जिओफ्रे वॉरनॉक यांचे १९९५ साली निधन झाले.

मेरी यांचे प्राथमिक शिक्षण इंग्लंडमधील सेंट स्वीदन्स, विंचेस्टर आणि प्रायरर्स फील्ड स्कूल, गिल्फर्ड येथे झाले. लेडी मार्गारेट हॉल येथे त्यांनी १९४२ साली पदवीसाठी प्रवेश घेतला (त्या वेळी चार्ल्स द गॉलची मुलगी एलिझाबेथ ही त्यांची जिवलग मैत्रीण होती). युद्धकाळामुळे  लष्करात भरतीसाठी मेरी गेल्या; पण सैनिकी हे आपले काम नाही आणि साहित्य-तत्त्वज्ञान ह्यात रुची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दोन वर्षे शेरबर्न स्कूल, डोर्सेट येथे शिक्षिकेचे काम केले. त्यानंतर १९४६ मध्ये विद्यापीठात परत आल्या आणि १९४८ साली तत्त्वज्ञानात बीफिल पदवी मिळवली. पुन्हा त्या लेडी मार्गारेट हॉल महाविद्यालय येथे पीएच.डी.साठी परतल्या. त्यानंतर त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली.

मेरी यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात १९४९ ते ६६ दरम्यान सेंट ह्यू’ज महाविद्यालयाच्या तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापिका म्हणून झाली. १९६६ ते ७२ दरम्यान ऑक्सफर्ड हायस्कूल फॉर गर्ल्स येथे त्या मुख्याध्यापिका होत्या. लेडी मार्गारेट हॉल महाविद्यालय येथे त्यांना १९७२ ते ७६ दरम्यान टालबोल्ट रिसर्च फेलोशिप शिष्यवृत्ती मिळाली. १९७६ ते ८४ दरम्यान सेंट ह्यू’ज महाविद्यालयामध्ये त्या ज्येष्ठ संशोधिका होत्या. त्या तेथे अध्यापन करत असल्या तरी सेंट ह्यू’ज महाविद्यालयाच्या पहिल्या विवाहित महिला संशोधिका म्हणून त्यांना १९५९ साली मान्यता मिळाली. १९८५ मध्ये त्यांना महाविद्यालयाचे सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले. १९८६ ते ८९ दरम्यान गीर्टन महाविद्यालय, केंब्रिज येथे त्या प्रमुख होत्या. त्यांना १९८७ साली युनिव्हर्सिटी ऑफ बाथ, सॉमरसेट, यूके विद्यापीठाने त्यांना डी.लिट. पदवीने सन्मानित केले. १९९२ साली त्या निवृत्त झाल्या. २००० मध्ये त्या लंडन येथील ग्रेशम महाविद्यालयामध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर ऑफ ऱ्हेटोरिक या पदावर कार्यरत होत्या. अध्ययन व अध्यापन करत असतानाच्या काळातच समांतर रितीने त्यांनी केलेल्या कार्यातूनच त्यांची ‘सार्वजनिक जनविवेकवादी तत्त्ववेत्त्या’ अशी प्रतिमा तयार होत गेली.

ग्रेट ब्रिटनच्या सामाजिक, शैक्षणिक आणि तत्त्वचिंतनात्मक विश्वात मेरी यांनी मूलभूत परिवर्तन घडवून आणले. त्यांची शिक्षणक्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन अनेक राष्ट्रीय समित्यांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी त्या समित्यांवर केलेल्या कार्यातून त्यांची सार्वजनिक धोरणे दिसून येतात. त्या नियुक्त्या अशा : १९७३ ते ८३ दरम्यान इंडिपेंडंट ब्रॉडकास्टिंग ॲथॉरिटी या ब्रिटिश सरकारच्या नियामक मंडळाच्या सदस्या, १९७४ ते ७८ दरम्यान विशेष शिक्षण चौकशी समितीच्या प्रमुख, १९७९ ते ८४ दरम्यान पर्यावरण प्रदूषणविषयक रॉयल कमिशन समितीच्या सदस्या, १९८० साली चेअर ऑफ द गव्हर्नर्स ऑफ द बीबीसी या विशेष अधिकारपदावर नियुक्ती, १९८२‒८४ दरम्यान मानवी प्रजननफलन आणि भ्रूणविकासशास्त्र चौकशी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती, १९८४‒८९ दरम्यान प्राण्यांवरील प्रयोग समितीवर अध्यक्षपदी नियुक्ती, २००८ साली इच्छामरण समिती सदस्या. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शारीरिक आजार, अकार्यक्षमता, अध्ययनातील अडचणी आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न यांनी ग्रस्त झाल्याने वाचू-बोलू न शकणारी दिव्यांग मुले आणि तरुण विद्यार्थी यांच्या विशेष पद्धतीच्या शिक्षणासाठी ‘श्रवणग्रंथ निर्मिती’ करण्याऱ्या धर्मादाय समितीच्या (Listening Books Charity) अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली.

मेरी यांचे दोन अहवाल : ब्रिटनच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतील मूलभूत परिवर्तनाच्या संदर्भात मेरी यांचे दोन अहवाल मौलिक मानले जातात. त्यांना साधारणपणे ‘मेरी वॉरनॉक रिपोर्ट १९७८’ आणि ‘मेरी वॉरनॉक रिपोर्ट १९८४’ असे म्हटले जाते. पहिला अहवाल शिक्षणविषयक आहे, तर दुसरा मानवी भ्रूणाच्या जीवनाचे रक्षण करण्याबाबतचा आहे.

  • पहिला शिक्षणविषयक अहवाल १९७८ साली प्रसिद्ध झाला. ब्रिटनच्या तत्कालीन शिक्षणमंत्री  मार्गारेट थॅचर यांनी १९७४ साली मेरी यांची नियुक्ती विशेष शिक्षण चौकशी समितीच्या अध्यक्षपदी केली. हा अहवाल ‘स्पेशल एज्यूकेशनल नीड्स १९७८’ (Special Educational Needs 1978) नावाने प्रसिद्ध झाला. त्यानुसार सरकारने शिक्षणात आमूलाग्र बदल केले व कायदे केले.
  • दुसरा मानवी भ्रूणाच्या जीवनाचे रक्षण करण्याबाबतचा अहवाल अतिशय महत्त्वाचा आहे. मेरी यांच्या मानवी प्रजननफलन आणि भ्रूणविकासशास्त्र चौकशी समितीने केलेल्या अभ्यासातून ‘ए क्वेश्चन ऑफ लाईफ : द वॉरनॉक रिपोर्ट ऑन ह्यूमन फर्टिलायझेशन अँड एम्र्बीऑलॉजी १९८४’ (A Question of Life: The Warnock Report on Human Fertilisation and Embryology 1984) हा अहवाल निष्पन्न झाला. हा अहवाल मानवी भ्रूणाच्या आणि प्रजननफलनाच्या नीतिशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करणारा आहे. या अहवालामुळे प्रयोगासाठी मानवी भ्रूण वापरण्यासंबंधीचे कायदा १९९० साली तयार करण्यात आला. त्यातूनच ग्रेट ब्रिटन सरकारला ‘मानवी प्रजननफलन आणि भ्रूणविकासशास्त्र कायदा १९९०’ (Human Fertility and Embryology Act 1990) हा कायदा करणे भाग पडले. यापूर्वी असा कोणताही कायदा नसल्याने प्रयोगासाठी कोणत्याही वयाच्या भ्रूणाची हत्या केली जात होती. या अहवालामुळे १४ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा भ्रूण मानवी जीव समजला जाऊ लागला आणि त्याच्या रक्षणाची जबाबदारी घेण्यात आली. मेरी यांचा हा दुसरा अहवाल सर्वांत परिणामकारक ठरला.

मानवीप्रजनन व भ्रूणविकास या क्षेत्रात त्यांनी सतत ३५ वर्षे अथक काम केले. त्यांच्या त्या कार्यातूनच दोन जागतिक अहवाल तयार झाले. १९७८ आणि १९८४ सालचे हे अहवाल ‘मेरी वॉरनॉक रिपोर्ट’ म्हणून अतिशय प्रसिद्ध आहेत. या दोन अहवालांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या कायद्यांच्या जनक म्हणून मेरी वॉरनॉक यांचा साऱ्या जगाला परिचय आहे. मानवी प्रजननफलन आणि भ्रूणविकासशास्त्र या क्षेत्रातील मेरी यांच्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना ‘जीवशास्त्रयुगाच्या एक शिल्पकार’ (One of the Architects of the Age of Biology) असेही म्हटले जाते.

तत्त्वज्ञानाखेरीज मेरी यांचे चिंतन, लेखन आणि अतिशय महत्त्वाचे कार्य शिक्षण, जीवशास्त्र आणि मानवजीवशास्त्र या वैद्यकक्षेत्रात आहे. ‘मानवी प्रजननफलन आणि भ्रूणविकासशास्त्र कायद्या’मुळे जगभरातील सर्व देशांमध्ये गर्भपात कायदा निर्माण करण्यात आला. भारतातील गर्भपात कायदा या कायद्यावर आधारलेला आहे. मेरी यांना ब्रिटनचे आणि यूरोपीय देशांतील अनेक सन्मान लाभले आहेत. १९८४ साली त्यांना ‘डेम कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला. त्यानंतर १९८५ साली ‘बॅरोनेस वॉरनॉक’ या किताबाने त्यांचा बहुमान कण्यात आला. २००० साली ‘फेलो ऑफ ब्रिटिश अकॅडेमी’ म्हणून त्यांची निवड करण्यात आली, तर २०११ साली ‘द अकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेस’ सन्माननीय सदस्यत्व बहाल केले गेले. १९८०‒९० च्या दरम्यान त्यांनी ‘द टाईम्स एज्यूकेशनल सप्लीमेंट’मध्ये तत्कालिन ‘टोरी शिक्षण धोरणा’वर टीका करणारे स्तंभलेखन केले. शिक्षणक्षेत्रातील प्रभावशाली दहा व्यक्तींमधील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून २०१८ साली त्यांचा विशेष गौरव द टाईम्सने केला. मेरी यांच्या अस्तित्ववादावरील तीन पुस्तकांमुळेच त्यांना बीबीसी रेडिओ‒३ केंद्रावर नियमितपदावर ‘तत्त्वज्ञान विषयतज्ज्ञ’ म्हणून आमंत्रित करण्यात आले. तेथील ‘थर्ड प्रोग्राम’ या कार्यक्रमात तत्त्वज्ञानविषयक चर्चेत त्या भाष्यकार होत्या. त्यांच्या ह्या कामाची दखल घेऊन त्यांना ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ या जगतविख्यात संस्थेने लेखमाला लिहिण्याचे आमंत्रण दिले. जगाला त्यांचा परिचय महिला तत्त्ववेत्त्या, जनविवेकवादी लेखिका, महिला शिक्षणतज्ज्ञ आणि वक्त्या म्हणून आहे. असे सन्मान लाभणाऱ्या त्या यूरोप-अमेरिकेतील पहिल्या शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्ववेत्त्या आहेत. मेरी यांच्या नव्वदीनिमित्त २०१४ साली बीबीसीने त्यांच्यावर मोठा अनुबोधपट (Documentary) बनवला.

तत्त्वज्ञानातील कारकिर्द : सेंट ह्यू’ज महाविद्यालय येथे प्राध्यापक असताना मेरी यांना अध्यापन व्यवसाय आवडत होता; तथापि आपण तत्त्वज्ञानाच्या उच्चपदवीधर आणि व्यावसायिक तत्त्ववेत्ता असलो, तरी आपल्याला या विषयात फार गती नाही, असे त्यांना १९६० च्या दरम्यान वाटत होते. पण त्यांना ‘कल्पनांचा इतिहास’ आणि ‘तत्त्ववेत्त्यांच्या विचारांमधील संबंध आणि एकाच कालखंडात अस्तित्वात असणाऱ्या तत्त्ववेत्त्यांमधील परस्पर नाते’ शोधून काढण्याच्या कामात फारच रुची होती.

खुद्द तत्त्वज्ञानात रुची नसली तरीही १९६० च्या दशकात मेरी यांनी झां पॉल सार्त्रवर लक्ष केंद्रित केले. त्या दरम्यान आयरिश मरडॉक ही तत्त्ववेत्ती आणि महिला कादंबरीकार मेरी यांची ऑक्सफर्डमधील सहकारी आणि मैत्रीण होती. मरडॉकने १९५३ साली सार्त्रवर इंग्लिशमध्ये लिहिलेला मोठा लेख हाच इंग्लिश भाषिक तात्त्विक जगतातील सार्त्रवरील पहिला लेख होता. त्यानंतर मेरी यांनीच सार्त्रवर चिंतन आणि लेखन केले. इंग्लंडमध्ये सार्त्रचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या त्या काळातील त्या एकमेव अध्यापक होत्या. त्यांच्यामुळे ब्रिटिश वैचारिक जगाला सार्त्रचा परिचय झाला. ‘सार्त्रचे चिंतन व लेखन’ हे त्यांचे तत्त्वज्ञानातील पहिले योगदान होते. मेरी १९६३ ते ७० दरम्यान अस्तित्ववादावर एकूण तीन पुस्तके लिहिली आणि एका पुस्तकाचे सहसंपादन केले.

ऑक्सफर्ड हे १९५०‒६० च्या दशकात अनेक तत्त्ववेत्त्यांचे जणू ठाणेच बनले होते. वॉरनॉक पती-पत्नी यांच्या घनिष्ठ मित्रमंडळीत इसाया बर्लिन, पीटर स्ट्रॉसन, स्टुअर्ट हॅम्पशर आणि डेव्हिड पिअर्स या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्यांचा तसेच साहित्यिक किंग्जले अमीस, डेव्हिड सेसिल यांचा समावेश होता.

मेरी सतत काहीतरी नवीन शिकण्यास उत्सुक असत. पर्यावरण प्रदूषण समितीवर असताना अर्थशास्त्र व रसायनशास्त्र, प्राण्यांवरील प्रयोग समितीवर असताना जीवशास्त्र आणि मानवीप्रजननशास्त्र असे नवे ज्ञान त्यांनी प्राप्त केले. ह्या अनुभवामुळेच त्यांची तत्त्वज्ञानाकडे पाहण्याची नवी दृष्टी विकसित झाली. त्यांच्या मते ‘तत्त्वज्ञानेतर परिस्थितीत तत्त्ववेत्ते महत्त्वाचे ठरतात; कारण त्यांना स्वतःची विशेषिकृत तज्ज्ञता नसते आणि म्हणूनच इतर कोणत्याही विषयाच्या विशेष तज्ज्ञमंडळींच्या परीक्षण न झालेल्या गृहितकांचे विश्लेषण व निदान तत्त्ववेत्ते करू शकतात. हाच तत्त्वज्ञानाचा विशेष असतो’.

तत्त्वज्ञानाचे प्रश्न : मेरी यांच्या मते १९५०‒६० पूर्वी तत्त्वज्ञान हा विषय जगाच्या स्वरूपाबद्दल सखोल प्रश्न उपस्थित करत नव्हता. या काळात म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर यूरोप-पाश्चात्त्य राष्ट्रांत व संस्कृतींत माणसाच्या रोजच्या जगण्याच्या प्रश्नांनी जणू उग्र रूप धारण केले होते. म्हणूनच जगाचे स्वरूप याचा अर्थ जग कसे निर्माण झाले? ते ईश्वराने निर्माण केले का? इत्यादी जगाविषयीचे प्रश्न तत्त्वज्ञानाचे प्रश्न असू शकत नाहीत; तर ‘तत्त्वज्ञानाने ज्यांचे चिंतन करावे, असे प्रश्न म्हणजे माणसाच्या जगण्याचे प्रश्न असतात. तत्त्वज्ञानाच्या चिंतनाचे प्रश्न माणसाच्या जगाचे, समाजाचे प्रश्न असतात.’ त्याचप्रमाणे भजन-कीर्तन, अध्यात्म हे माणसाच्या जगण्याचे प्रश्न नाहीत, तर ‘जीवन अर्थपूर्ण कसे जगावे, ते सामाजिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या सक्षम व सुरक्षित कसे बनेल’ इत्यादी प्रश्न हे जगाबद्दलचे प्रश्न आहेत, असे मेरी म्हणतात. हे प्रश्न तेव्हाही यूरोप-अमेरिकेच्या चर्चाविश्वात होतेच; पण १९५०‒६० पूर्वीच्या काळात त्याकडे तत्त्वज्ञानाने दुर्लक्ष केले होते.

या परिस्थितीत १९६०‒१९७० च्या दशकात बदल झाले. त्याचे कारण त्या काळात विद्यार्थीवर्ग अतिशय अस्वस्थ झाला होता. बेकारी, महागाई, शिक्षणाचा अभाव, सरकारचे दुर्लक्ष, वाढती लोकसंख्या, महागडे वैद्यकीय उपचार या कारणांमुळे तरुण वर्गात अस्वस्थता होती. या विद्यार्थ्यांच्या अस्वस्थतेमुळे १९६०‒१९७० च्या दशकात बदलाला सुरुवात झाली. १९१४ ते १९१८ दरम्यानचे पहिले महायुद्ध, १९३९ ते ४५ दरम्यानचे दुसरे महायुद्ध आणि १९५५ ते १९७५ असे वीस वर्षे चालू असलेले व्हिएतनाम युद्ध अशा विविध युद्धांमध्ये तरुण वर्गाचे भविष्य बेचिराख झाले होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन, ब्रिटन, रशिया, यूरोप येथे सक्तीची लष्कर भरती चालू होती. व्हिएतनाम युद्ध तर अमेरिकेने जनतेवर लादले होते. ही सारीच परिस्थिती भयानक होती. त्यामुळे युद्धाविषयी तात्त्विक चिंतन करणे, त्यानुसार राजकीय व सामाजिक निर्णय घेणे आवश्यक होते. हा निर्णय मुख्यतः नैतिक निर्णय होता. म्हणजे युद्ध नैतिक आहे की नाही, हा प्रश्न केवळ तत्त्वज्ञान हा विषय नीटपणे मांडू शकेल, असे लोकांना वाटत होते. म्हणूनच सक्तीचे लष्करी प्रशिक्षण आणि इतर अनेक प्रकारचे सविनय कायदेभंग अशा विषयांवर तत्त्वज्ञानाची बाजू मांडणे, अमेरिकेतील  तत्त्वज्ञानाचा प्राध्यापकवर्ग व विद्यार्थीवर्गाला अनिवार्य वाटू लागले होते. न्यायाच्या संकल्पनेवर त्यांना चर्चा करण्यास समाजाने प्रवृत्त केले होते. ‘न्याय्य युद्ध’ नावाचे युद्ध असू शकते काय? ह्यावर चिंतन मांडणे, हे तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकवर्गाला व विद्यार्थीवर्गाला अटळ बनले होते. अशा रीतीने तत्त्वज्ञान वास्तव जगाविषयीचे खरे चिंतन करू लागले, असे मेरी म्हणतात.

मानवीप्रजनन व भ्रूणविकास समितीवर काम करताना गर्भपाताचा काळ, संशोधनासाठी गर्भाचा वापर, भाडोत्रीमातृत्वाची (Surrogacy) समस्या इत्यादींतील नैतिक पेचप्रसंग यांवर त्यांनी तात्त्विक आणि वैद्यकीय दृष्टीकोनातून संशोधन केले. ‘नैतिकतेत भावनांची गुंतवणूक असते आणि सार्वजनिक नैतिकतेचा विचार करणाऱ्यांनी तर सामान्य लोकांच्या नैतिक अंतःप्रेरणा लक्षात घेतल्याच पाहिजेत’, असा त्यांचा आग्रह होता. मानवीप्रजनन व भ्रूणविकास समितीत काम करताना विज्ञान आणि धर्म यांच्या संघर्षात दोघांचेही कमी-अधिक प्रमाणात समाधान होईल, असा मध्यममार्ग त्यांनी शोधला. चौदा दिवसांच्या आतील गर्भ वैद्यकीय संशोधनासाठी वापरता येईल; कारण या अविकसित अवस्थेतील भ्रूणपूर्वकाळापासून भ्रूणातून एक अथवा जुळी बालके उद्भवतात, तसेच ‘भाडोत्रीमातृत्वता दाता संस्था’ बेकायदा ठरवाव्यात, जन्माला येणाऱ्या बालकावर गर्भादान करणाऱ्या पित्यापेक्षा जन्म देणाऱ्या त्या संबंधित जीवशास्त्रीय मातेचाच अधिकार असावा, बालकाचे पालनपोषण हे तिचेच कर्तव्य असावे, त्यात गर्भदानदातापित्याला कोणतेही अधिकार असू नयेत, असा निर्णय नैतिक तत्त्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून त्यांनी दिला. तत्त्वज्ञानाचा असा उपयोग झाला पाहिजे, असे त्यांचे मत होते.

तत्त्वज्ञानाची संकल्पना व स्वरूप : मेरी यांच्या मते तत्त्वज्ञान हा ‘सामान्य’ (General) स्वरूपाचा विषय आहे; पण ‘सामान्य’ ह्या शब्दाची काळजीपूर्वक व्याख्या करणे आवश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन त्या करतात. त्यांनी तत्त्वज्ञानाला अमूर्त पातळीवरून मूर्त, उपयुक्त आणि उपयोजनात्मक दर्जा दिला होता. त्यांच्या मते तत्त्वज्ञानात ‘उपयोजन’ असे काहीही नसते. उपयोजित तत्त्वज्ञान किंवा उपयोजित नीतिशास्त्र या नव्या विचारसरणीबद्दल त्या काहीशा उपहासानेच बोलतात. समग्र तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र हे नेहमी उपयोजितच असते, हे तत्त्ववेत्त्यांनी, तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. तत्त्वज्ञानाचे स्वरूप कसे आहे, ते मेरी अतिशय सोप्या भाषेत दोन मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करतात.

अ) सामान्य व व्यापक स्वरूप : तत्त्वज्ञान – एक अखंड वस्त्र : मेरी यांच्या मते तत्त्वज्ञान हा अतिशय सामान्य स्वरूपाचा, कोठेही, कोणालाही, कोणत्याही परिस्थितीला लागू होणारा व व्यापक विषय आहे. तत्त्वज्ञानातील ज्ञान, नीती, तर्क, सौंदर्य, सिद्धान्त किंवा नियम ही सारी तत्त्वे जीवनाच्या सर्व अंगांना उपयोगी असतात. विद्यार्थ्यांनी तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांकडून या विषयाचा परिचय करून घेताना एक व्यापक विषय म्हणूनच करून घ्यावा. त्या म्हणतात, “तत्त्वज्ञान हे काही प्रमाणात वीण नसलेले अखंड वस्त्र आहे, ते सहजासहजी स्वतःचे तुकडे होऊ देत नाही.” याचा अर्थ असा की, तत्त्वज्ञानरूपी वस्त्र पिढ्यानपिढ्या अनेकांनी विणत आणले आहे. विणणाऱ्या लोकांत जसे तत्त्ववेत्ते, विचारवंत, वैज्ञानिक ही विशेषाधिकार असणारी मंडळी आहेत, तशीच सर्वसामान्य माणसेही आहेत. या सर्वसामान्यजनांचा सहभाग महत्त्वाचा व मौलिक असतो, हा प्राचीन वस्तुपाठ आहे. सॉक्रेटीस हा महान गुरू सामान्य लोकांमध्ये मिसळूनच तत्त्वज्ञान शोधत होता, असे मेरी यांना सूचित करायचे आहे.

समाज तत्त्ववेत्त्यांकडून कोणत्या अपेक्षा करतो? समाज ज्यांना ‘अचूक’ समस्या समजतो त्यांची उत्तरे तत्त्ववेत्त्यांनी द्यावीत, अशी समाजाची अपेक्षा असते. मेरी यांच्या मते अशा समस्यांना उत्तरे देणे, हे तत्त्ववेत्त्यांचे काम नाही. तत्त्ववेत्त्यांनी, तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांनी किंवा विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाचा, कामाचा भाग म्हणून काही समस्या सोडविल्या, तरी ती अतिशयच किरकोळ बाब आहे. उलट सुस्थापित झालेल्या किंवा जास्त करून ज्यांना प्रश्न करण्याची गरजच भासलेली नाही, अशा भोवतालच्या वस्तुस्थितीविषयी प्रश्न विचारणे, हे तत्त्वज्ञानाचे काम आहे.

हे कसे करता येईल? तर समजा, कुठे चर्चा चालू असेल किंवा मुद्दाम काहीएक चर्चा आयोजित केली असेल, तर तत्त्ववेत्ता, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक किंवा विद्यार्थ्यांनी त्या चर्चेत सहभाग घ्यावा. तेथे त्यांनी असे दाखवून द्यावे की, विचारला गेलेला किंवा चर्चिला जात असलेला प्रश्न ज्या स्वरूपात ज्या अर्थाने  गृहित धरला आहे, त्यापेक्षा त्याचे स्वरूप व अर्थ वेगळाच आहे. उदा., जीवनाची सुरुवात कधी होते? या प्रश्नाला साधारणतः देवाने पृथ्वी निर्माण केली, त्याने स्त्री-पुरुष निर्माण केले, देवानेच जीवन सुरू करून दिले, अशी उत्तरे दिली जातात; पण ही काही खरी उत्तरे नाहीत, असे मेरी म्हणतात.

मग तत्त्ववेत्त्याने, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक किंवा विद्यार्थ्यांनी जीवनाचे प्रश्न म्हणजे जीवनाची सुरुवात कधी होते? हा प्रश्न ‘पृथ्वीवर जीवन कधी सुरू झाले?’ असा न करता तो प्रश्न थेटपणे माणसाचे ‘जगणे’ किंवा ‘जगण्याचा हक्क’ या प्रश्नाकडे नेला पाहिजे. जसे की, ‘माणूस आईच्या पोटात असताना जीवन कधी सुरू होते? असाच प्रश्न विचारला पाहिजे, तरच माणसाला जगण्याचा हक्क मिळू शकतो. याचे कारण असे की, ‘गर्भ म्हणजे एक जी नाहीशी करण्यासारखी वस्तू आहे, नको असेल तर ती खुडून टाकता येते’ असा समज समाजात असतो. विशेषतः मुलगाच हवा असेल आणि गर्भ मुलीचा असेल, तर मुलीचा गर्भ ही वस्तू समजून नष्ट केला जातो. मेरी यांच्या मते येथे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक किंवा विद्यार्थ्यांनी अतिशय नम्रपणे असे लक्षात आणून दिले पाहिजे की, जीवनाची सुरुवात कधी होते? हा प्रश्न वस्तुतः गर्भाच्या विकासाच्या टप्प्याविषयी आहे. या टप्प्याचे स्वरूप असे आहे की, जिथे आपण हा गर्भ म्हणजे मानवी जीवनाची सुरुवात आहे आणि म्हणूनच आपण त्या गर्भाला ‘संपूर्ण सुरक्षा देण्यास पात्र असलेले मानवी जीवन’ अशी प्रतिष्ठा आणि त्यानुसारची वागणूक देण्यास प्रारंभ करू शकतो’.

मानवी भ्रूण म्हणजे ‘वैज्ञानिक ज्ञानाचा विकास कोणत्या टप्प्यावर आहे’, हे सांगणारी प्रयोगाची निर्जीव वस्तू नाही, तो मानवी जीव आहे. उलट वैज्ञानिक ज्ञानाच्या विकासाच्या मदतीने त्या जीवाचे रक्षण करता आले पाहिजे. त्या गर्भाला जगण्याचा हक्क आहे, ते समग्र मानवी जीवन आहे. तो गर्भ आणि त्याच्या जगण्याचा हक्क केवळ एखाद्याच्या मनाच्या लहरीनुसार नाहीसा करता येत नाही. गर्भपात करणे म्हणजे तो हक्क नाकारणे असते. म्हणूनच ‘गर्भाच्या विकासाच्या कोणत्या टप्प्यावर गर्भाला मानवी जीवन म्हणून सुरक्षा दिली पाहिजे?’ हाच जीवनाचा खरा प्रश्न आहे, असे मेरी म्हणतात. हे जीवनविषयक सत्य लक्षात घेता जीवनाची सुरुवात कधी होते? हा प्रश्न वस्तुतः गर्भाच्या विकासाच्या एका विशिष्ट टप्प्याशी निगडित आहे आणि हाच जीवनाचा महत्त्वाचा तात्त्विक प्रश्न आहे, असा युक्तिवाद तत्त्वज्ञानाने केला पाहिजे, असे मेरी म्हणतात. तत्त्वज्ञानाने म्हणजे तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाने आणि विद्यार्थ्याने प्रत्यक्ष जीवनातून असे प्रश्न शोधून काढून त्याबद्दल तात्त्विक प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, असे त्यांचे मत आहे.

दुसरी अपेक्षा खुद्द तत्त्वज्ञानाच्या प्रांतातूनच येते. म्हणजे असे की, तत्त्ववेत्त्यांनी सामाजिक प्रश्नांची अशा तऱ्हेने उत्तरे दिली पाहिजेत की, त्यामुळे ते प्रश्न पुन्हा उद्भवलेच नाही पाहिजेत किंवा उद्भवायलाच नको आहेत, असे जर तत्त्ववेत्तेच समजू लागले, तर मेरी यांच्या मते हा समज अतिशय चुकीचा आहे. ‘प्रश्न नको’ असे तत्त्ववेत्त्यांना वाटू लागले, तर अशा या कामासाठी तत्त्ववेत्ते हे ‘चुकीचे लोक’ आहेत. तत्त्ववेत्त्यांचे काम नेमके त्याच्या उलट आहे. त्यांनी असेच प्रश्न विचारले पाहिजेत की, ज्यांचा इतरांनी कधी विचारच केलेला नाही. इतर माणसे जो विचार करूच शकत नाहीत, तोच विचार तात्त्विक पद्धतीने करणे, हे तत्त्वज्ञानाचे काम आहे.

असे प्रश्न उपस्थित करून त्या प्रश्नांची चर्चा होणे आवश्यक आहे. समाजात चर्चा चालू असतील, तर ती चर्चा म्हणजे एक संवाद असतो. त्या चर्चा किंवा संवाद होत राहण्याच्या घटनेकडेही वेगळ्या नजरेने पहिले पाहिजे, असे मेरी यांचे मत आहे. त्या म्हणतात की, चर्चा किंवा संवाद ही ओघात होणारी, अकस्मात होणारी घटना नाही, तर ती हेतूतः निवडलेली विकासाची योग्य रीती आहे. त्यात कोणीही भाग घेऊ शकतो. हीच त्या तात्त्विक संवादाची, तात्त्विक चर्चेची ताकद आहे.

मेरी पुढे महत्त्वाचा मुद्दा मांडतात. तो असा की, पण समजा एखादा तत्त्ववेत्ता किंवा विद्यार्थी अभ्यासिकेत एकटाच बसून काम करीत असेल आणि कोणाशीही बोलत नसेल; पण चर्चेच्या विषयाचेच चिंतन करत असेल, तर तोही त्या चर्चेत सहभागी आहे, असेच समजले पाहिजे. चिंतन करून, विचार करून तो आणखी पुढील प्रश्न उपस्थित करू शकतो, नवी उत्तरे शोधण्याच्या प्रक्रियेला गती देऊ शकतो, एक सतत चालणारा संवाद घडवू शकतो. अर्थात त्याने वेळ मिळेल तसे प्रत्यक्ष चर्चेत सहभागी झाले पाहिजे, त्याने गप्प राहणे, केवळ चिंतनात मग्न राहणे योग्य नाही.

आ) तत्त्वज्ञान–एक खेळ : गर्भाची विकासाची अवस्था, युद्धे इत्यादी जर सार्वजनिक स्वरूपाचे आहेत आणि प्रत्येकाचे प्रश्न आहेत, हे लक्षात घेतले, तर त्याविषयीचे चिंतन करणे, ही केवळ तत्त्वज्ञान या विषयाची मक्तेदारी नाही, तर ती प्रत्येकाची जबाबदारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे मेरी म्हणतात. तत्त्वज्ञान हा केवळ काही विशिष्ट लोकांचा, म्हणजे केवळ तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी-प्राध्यापक किंवा तत्त्ववेत्ते अथवा विचारवंत यांच्यापुरता मर्यादित विषय नाही, तर तो सर्वांचा, सर्वांसाठी, सामान्य माणसासाठी आहे. सामान्य माणसाला मेरी ‘बिगर-तत्त्वज्ञ लोक’ (Non-Philosopher) म्हणतात; तथापि इथे एक अडचण आहे. ती अशी की, सामान्य माणसाची तत्त्वज्ञानाची प्रतिमा नकारात्मक आहे. त्याला असे वाटत असते की, तत्त्वज्ञान म्हणजे मूल्यांशी फारकत घेतलेला, थंडपणे निव्वळ विश्लेषणात गुंतून पडलेला, अतिशय क्षुल्लक, छचोर, निरुपयोगी आणि केवळ शब्दच्छलाला कवटाळून बसलेला, लोकांच्या प्रश्नांविषयी गांभीर्य नसलेला विषय आहे. ही विशेषतः १९५० च्या दशकातील अवस्था होती, असे मेरी लक्षात आणून देतात. अशी नकारात्मक प्रतिमा निर्माण होण्याचे कारण तत्त्वज्ञान हा विषय केवळ तत्त्ववेत्ते, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक यांचाच अधिकाराचा, मक्तेदारीचा विषय समजला जात होता आणि दुर्दैवाने तेही तसेच वागत आलेले होते; तथापि आता मात्र हा समज बदलेला आहे. मेरी म्हणतात, “तत्त्वज्ञान हा एक अतिशय उच्च दर्जाचा पण सर्वसामान्य तऱ्हेचा शोध आहे. तत्त्वज्ञान हा असा खेळ आहे की, यात कुणीही, अगणित माणसे भाग घेऊ शकतात”.

मेरी यांच्या मते तात्त्विक प्रश्न शोधणे आणि त्यावर चिंतन करणे, हे सकृतदर्शनी केवळ तत्त्ववेत्त्यांचे काम वाटले, तरी मूलतः ते सर्वांचे काम आहे. तात्त्विक प्रश्न ‘बिगर-तत्त्वज्ञ’ लोकांसाठी आणि तत्त्ववेत्त्यांसाठीही आहेत. ते दोघांना फलदायी होऊ शकतील. म्हणूनच दोघांनी अशी तात्त्विक विचार करण्याची पद्धती शोधावी की जिची सवय योग्य रीतीने अमलात आणता येऊ शकते आणि जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत ती उपयोगी पडू शकते. मात्र शिक्षण प्रक्रियेत शाळा, महाविद्यालये इत्यादींतील अभ्यासक्रमात तत्त्वज्ञान ह्या विषयाचा समावेश करण्यासारखा तो विषय नाही. त्यापेक्षा तेथील शिक्षक जे काही शिकवित आहेत आणि विद्यार्थी जे काही शिकत आहेत, त्या त्या विषयांच्या संदर्भात शिक्षक व विद्यार्थी या दोघांच्यात चिकित्सक, विश्लेषणात्मक आणि ऐतिहासिक अभिवृत्तीचा स्वीकार होईल, असे पाहिले पाहिजे. हे काम करणे हेच चिकित्सक तत्त्वज्ञानाचे कार्य आहे, असे त्या म्हणतात.

मेरी वॉरनॉक यांनी विपुल ग्रंथलेखन केले आहेत, ते असे ‒ स्वतंत्र लेखन : एथिक्स सिन्स १९०० (१९६०), द फिलॉसॉफी ऑफ सार्त्र (१९६३), एक्झीस्टन्शिअल एथिक्स (१९६७), एक्झीस्टन्शिॲलिझम (१९७०), इमॅजिनेशन (१९७६), स्कूल्स ऑफ थॉट (१९८७), मेमरी (१९८७), द यूजेस ऑफ फिलॉसॉफी (१९९२), इमॅजिनेशन अँड टाइम (१९९४), मेकिंग बेबीज : इज देअर अ राइट टु हॅव चिल्ड्रेन? (२००१), ॲन इंटेलिजेंट पर्सन्स गाइड टु एथिक्स (११९८ व २००४), नेचर अँड मोरॅलिटी : रिकलेक्शन्स ऑफ अ फिलॉसॉफर इन पब्लिक लाइफ (२००३), डिशोनेस्ट टु गॉड : ऑन किपिंग रिलिजन आऊट ऑफ पॉलिटिक्स (२०१०). सहलेखन : व्हॉट मस्ट वुई टिच? (१९७७; सहलेखक‒टीम डेव्हलीन). संपादित ग्रंथ : सार्त्र : ए कलेक्शन ऑफ क्रिटिकल एसेज (१९७१), विमेन फिलॉसॉफर्स (१९९५ व १९९६), आर्ट फॉर ऑल : देअर पॉलिसीज अँड अवर कल्चर (२०००; सहसंपादक‒मार्क वालीन्गर), क्रिटिकल रिफ्लेक्शन ऑन ओनरशिप (२०१५). स्मृतिग्रंथ : मेरी वॉरनॉक : ए मेमॉइर‒पीपल अँड प्लेसेस (२००१).

वृद्धापकाळाने त्यांचे सॅव्हर्नेक फॉरेस्ट (इंग्लंड) येथे निधन झाले.

https://www.youtube.com/watch?reload=9&v=mRodjoDXZ70

संदर्भ :

  • Warnock, Mary, The Uses of Philosophy, Oxford, 1992.
  • https://www.nature.com/articles/d41586-019-01277-5
  • https://www.theguardian.com/books/2003/jul/19/society1
  • https://www.theguardian.com/books/2019/mar/21/lady-warnock-obituary
  • https://www.giffordlectures.org/lecturers/mary-warnock
  • https://www.theguardian.com/books/2019/mar/21/philosopher-mary-warnock-dies-aged-94-special-needs-fertility
  • हेमाडे, श्रीनिवास, ‘भान न सोडता’, तत्त्वभान, लोकसत्ता, दि. २५ डिसेंबर २०१४.

                                                                                                                                                            समीक्षक : मीनल कातरणीकर