कार्ल, यास्पर्स : (२३ फेब्रुवारी १८८३—२६ फेब्रुवारी १९६९). प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता आणि अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाचा एक प्रमुख प्रवर्तक. जन्म ओल्डेनबर्ग येथे. त्याने हायडल्‌बर्ग व म्यूनिक या विद्यापीठांत प्रथम कायद्याचे शिक्षण घेतले आणि पुढे बर्लिन, गटिंगेन व हायडल्‌बर्ग विद्यापीठांत वैद्यकीय शिक्षण घेतले. वैद्यक व मानसचिकित्सा ह्या ज्ञानशाखांकडून तो नंतर तत्त्वज्ञानाकडे वळला.

१९२१ मध्ये हायडल्‌बर्ग विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून कार्लची नेमणूक झाली. १९३२ मध्ये फिलॉसॉफी हा त्याचा प्रमुख ग्रंथ तीन खंडांत प्रसिद्ध झाला. त्याची पत्नी ज्यू होती. नाझी राजवटीत ज्यूंच्या झालेल्या अघोरी छळाच्या यातना त्याने वैयक्तिक जीवनात अनुभविल्या होत्या. ज्यूंना देण्यात आलेल्या अमानुष वागणुकीच्या संदर्भात सबंध जर्मन समाजाचा काय अपराध होता ह्या प्रश्नावरील आपले विचार त्याने १९४६ मध्ये त्याच्या द क्वेश्चन ऑफ जर्मन गिल्ट ह्या ग्रंथाद्वारे मांडले. १९५८ मध्ये ऑटोमिक बॉम्ब अँड द फ्युचर ऑफ मॅनकाइंड ह्या ग्रंथासाठी त्याला जर्मन शांतता पारितोषिक देण्यात आले.

कार्लच्या कारकिर्दीचे दोन प्रमुख कालखंड करता येतील : वैद्यकीय व मानसशास्त्राशी निगडित कालखंड (१९१०—१९) आणि तत्त्वज्ञानाशी निगडित कालखंड (१९१९—४७). ह्या दुसऱ्या कालखंडातच त्याने आपले अस्तित्ववादाशी निगडित असलेले विपुल लेखन केले. बहुतेक सर्वच अतित्ववादी तत्त्ववेत्त्यांवर समकालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा प्रभाव असलेला दिसतो. त्याप्रमाणे कार्लच्या जीवनावर आणि विचारांवरही त्याच्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा प्रभाव तर दिसतोच; परंतु त्याबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही विशिष्ट घटनांचाही खोलवर परिणाम झालेला दिसतो. त्याच्या अस्तित्ववादी विचारांची पाळेमुळेही ह्याच घटनांमधून रुजलेली दिसतात.

कार्लच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असलेली पहिली महत्त्वाची बाब म्हणजे त्याची नाजूक प्रकृती. लहानपणीच त्याला श्वसनविकार जडला. ह्या आजारामुळे आयुष्यभर त्याच्या शारीरिक हालचालींवर बऱ्याच मर्यादा आल्या. त्या काळात वैद्यकीय सोयी-सुविधा एवढ्या प्रगत नसल्यामुळे संपूर्ण आयुष्य त्याला ह्या आजाराच्या भितीच्या छायेत घालवावे लागले. ह्या परिस्थितीतून उद्भवलेली हतबलता, अनिश्चितता, मृत्यूची भीती आणि दुःख हे त्याच्या अस्तित्ववादी विचारांच्या मुळाशी आहे. त्याच्या ह्या नाजूक परिस्थितीतूनच त्याच्या तत्त्वज्ञानातील एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेचा म्हणजेच ‘Grenzsituation’ किंवा ‘मर्यादा परिस्थिती’चा (limit situation/boundry situation) जन्म झाला. मृत्यूची अटळता, दुःख, जगण्यासाठीची धडपड, अपराधीपणाची भावना ह्यांसारखे मनुष्यजन्मात अनाहूतपणे येणारे अटळ अनुभव ह्यांना कार्ल ‘मर्यादा परिस्थिती’ असे म्हणतो. अशा परिस्थितींमध्ये माणसाला आपले अतित्व किती मर्यादित आहे, ह्याची तीव्रपणे जाणीव होते. त्याच्या मते अशा परिस्थितीचा अनुभव घेणे आणि त्यावर योग्यप्रकारे मात करणे ह्यातूनच माणसाला आपल्या आयुष्याचा खरा अर्थ कळतो.

कार्लच्या आयुष्यातली दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे १९१० मध्ये त्याचे गर्ट्रूड मायर ह्या ज्यू मुलीशी झालेले लग्न. पत्नीशी त्याचे अतिशय जवळिकीचे नाते होते. नाझी काळात त्यांच्या प्रेमाचा पुरावा मिळतो. पत्नी ज्यू असल्याने आपल्याला व आपल्या पत्नीला नाझी पकडून नेतील ही भीती कार्लला सतत वाटत होती. त्याच्या बाथरूममधील कपाटात त्याने विषाची एक बाटली ठेवली होती आणि आपल्याला अटक होणार असे दिसले, तर ते विष घेऊन आपले जीवन संपुष्टात आणायचे असे त्या दोघांनी ठरविले होते. त्या दोघांतील ह्या अतिशय प्रेमाच्या दृढ नात्यातूनच कार्लच्या तत्त्वज्ञानातील दुसऱ्या महत्त्वाच्या संकल्पनेचा−‘व्यक्तींमधील जिव्हाळ्याचा संवाद’ हिचा−उदय झाला असावा. अशा संवादातूनच मनुष्याचे जीवन अर्थपूर्ण होते, असे कार्लचे ठाम मत होते.

तिसरी घटना म्हणजे नाझी राजवटीत कार्लवर झालेले अन्याय. १९३३ मध्ये नाझी सत्तेचा उदय झाल्यानंतरचा काळ कार्लसाठी खूप कठीण ठरला. या काळात विद्यापीठातील त्याचे अनेक अधिकार त्याला गमवावे लागले. प्रकाशनाचे अधिकारही त्याच्याकडून काढून घेण्यात आले. १९३७ मध्ये त्याची हायडल्‌बर्ग विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली. ह्या घटना आणि परिस्थितीचा त्याच्यावर खूप परिणाम झाला. नाझींचा विजय आणि हायडेगरने नाझीवादाला अप्रत्यक्षपणे दिलेला पाठिंबा ह्यातूनच त्याची जीवनाच्या अर्थपूर्णतेविषयीची तिसरी कल्पना विकसित झाली. ती म्हणजे ‘प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे बुद्धिमत्तेपेक्षाही विवेकाने (Rationality) नियंत्रित असावे’. त्याच्या मते बुद्धिमत्ता आणि विवेक ह्यांत भेद आहे. बुद्धिमत्ता तर्काशी बद्ध असते; त्याउलट विवेक उत्स्फूर्त आणि स्वतंत्र असतो. विवेक म्हणजे केवळ तर्काने मर्यादित नसलेली, जीवनाचे समग्र आकलन घडविणारी शक्ती. अस्तित्वाचे खरे आकलन केवळ बौद्धिक कसरती करून होत नाही, तर प्रत्यक्ष सजग जीवनानुभवातून ते होत असते. जीवनातील अपूर्णता, दुःख, अपयश, मृत्यूची भीती, नैराश्य इत्यादींचा अनुभव घेतला तरच अस्तित्वाचा खरा अर्थ समजू शकतो. म्हणूनच कार्लच्या तत्त्वज्ञानाला ‘विवेकाचे तत्त्वज्ञान’ (Philosophy of Reason) असे नाव दिले गेले आहे. ही विवेकाची कल्पना त्याच्या १९३६ च्या रीझन अँड एक्झिस्टन्स  ह्या ग्रंथात आणि त्यानंतर १९४८ च्या ऑफ ट्रुथ ह्या ग्रंथात प्रामुख्याने आढळते. आपल्या तत्त्वज्ञानाला विवेकाचे तत्त्वज्ञान म्हणावे हा विचार त्याच्या १९५० सालच्या रीझन अँड अँटी-रीझन ह्या ग्रंथात आलेला आढळतो.

कार्लच्या विचारांवर एकीकडे कांट आणि दुसरीकडे किर्केगार्ड आणि नित्शे यांचा खोल प्रभाव दिसून येतो. अतींद्रिय अस्तित्वाचे ज्ञान होणे अशक्य आहे, हे कांटचे म्हणणे कार्लला पूर्ण मान्य होते. हे दोन्ही तत्त्ववेत्ते असामान्य होते आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यामुळेच माणसाची परिस्थिती आणि त्याच्या समस्या यांचे महत्त्व आपल्या लक्षात येत गेले, अशी स्पष्ट कबुली कार्लने दिली आहे.

पारंपरिक तत्त्वज्ञानाला कार्लने कडाडून विरोध केला. पारंपरिक तत्त्वज्ञानात अस्तित्वाकडे दुर्लक्ष करून ‘सत्’चा शोध घेण्याकडे सर्व लक्ष केंद्रित केले जाते. पारंपरिक चिद्वादी किंवा बुद्धिवादी तत्त्वज्ञानात ‘सत्’चे स्वरूप आणि ज्ञानाचे स्वरूप यांची चर्चा आढळते, तर आधुनिक तत्त्वज्ञानात तात्त्विक समस्यांचे केवळ तार्किक विश्लेषण किंवा भाषिक विश्लेषण केलेले दिसते. कार्लच्या मते तत्त्वज्ञान म्हणजे निव्वळ भाषिक, तार्किक विश्लेषण नव्हे किंवा वैज्ञानिक विश्लेषणही नव्हे. तत्त्वज्ञान हे ‘सत्’चे स्वरूप जाणून घेऊन त्याचा मानवी अस्तित्वाशी निश्चित संबंध काय हे समजून घेण्यासाठी बुद्धिनिष्ठ पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र आहे. तत्त्वज्ञान हे विज्ञान आणि तर्कशास्त्र यांच्याही पलीकडे जाणारे शास्त्र आहे आणि त्यात समग्र अस्तित्वाचा शोध घेतला जातो.

कार्लची अस्तित्वाची कल्पना : कार्लच्या मते मानवी अस्तित्वाला दोन बाजू असतात. भौतिक आणि अभौतिक. भौतिक बाजू विज्ञानाच्या आधारे अभ्यासता येते; परंतु अभौतिक बाजू विज्ञानाच्या पलीकडे असते, जिचे ज्ञान केवळ तत्त्वज्ञानाच्या आधारे होऊ शकते. भौतिक अस्तित्व तीन पातळ्यांमध्ये विभागलेले असते–सगळ्यात खालची ‘निव्वळ अस्तित्वाची’ पातळी, त्यावर ‘जाणिवेची पातळी’ आणि त्याच्या पलीकडे जाणारी ‘नेणिवेची पातळी’. ह्यानंतर अभौतिक अस्तित्वाची म्हणजेच ‘परमोच्च पातळी’ येते. निव्वळ अस्तित्वाच्या पातळीवरून अभौतिक परमोच्च अस्तित्वाच्या पातळीकडे जाता आले तरच व्यक्तीला तिच्या जीवनाचा खरा अर्थ सापडतो आणि आपली आंतरिक शक्ती तिला गवसते.

 • निव्वळ अस्तित्व (Dasein) : ही अस्तित्वाची सगळ्यात खालची पातळी. हे अस्तित्व भौतिक किंवा वस्तुनिष्ठ जगाशी बांधलेले असते. आपले हे अस्तित्व केवळ जीव किंवा देहात्मा ह्या स्वरूपाचे असते. विशिष्ट शरीर, मनोवृत्ती, बुद्धी ह्यांनी तो जीवात्मा बद्ध असून त्याला एक ऐतिहासिकता चिकटलेली असते. तो एका काळात, एका देशात, एका कुटुंबात जगत असतो. हे सर्व निवडण्याचे स्वातंत्र्यही त्याला नसते. तो शरीराच्या हालचाली, दैनंदिन कर्म, कर्तव्य, जबाबदाऱ्या ह्यांतच अडकलेला असतो. अशा ह्या स्तराला कार्ल निव्वळ अस्तित्व/डाझाईन असे म्हणतो.
 • जाणिवेची पातळी (Consciousness at large/consciousness in general) : ह्या स्तरावरचे मानवी अस्तित्व हे तर्कसंगती, बुद्धिमत्ता ह्या भोवती फिरते. हे अस्तित्वही भौतिक पातळीवरच असते; परंतु ह्या अस्तित्वावर विज्ञान, तर्कशास्त्र ह्यांचा पगडा असतो. बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाचे ज्ञान मिळवणे, हे ह्या स्तराचे उद्दिष्ट असते.
 • नेणिवेची पातळी (Geist) : जरी ही पातळी भौतिक जगाशी निगडित असली, जाणिवेच्या पातळीशी जोडलेली असली, तरी येथे मानवी अस्तित्व त्यापलीकडे जाण्याचा प्रयत्न करत असते. ह्या पायरीची महत्त्वाची लक्षणे म्हणजे जगाची समग्रता, सर्व वेगवेगळ्या गोष्टींमधला दुवा शोधण्याची शक्ती, त्यांमधील संबंध समजण्याची बौद्धिक शक्ती ही होत. ह्या स्तरावर मनुष्य अमूर्त कल्पनांचा अर्थ लावू शकतो. त्यातूनच वैयक्तिक आदर्श, मूल्ये, धार्मिक तत्त्वे, नैतिक विचार, राजकीय विचारसरणी, सर्जनशील कल्पना ह्यांचा जन्म होतो.

वर नमूद केलेल्या तीनही पातळ्या अस्तित्वाच्या भौतिक बाजूशीच जोडलेल्या आहेत. परंतु ह्या भौतिक बाजूच्या पलीकडे एक चौथी पातळी असते. जी अभौतिक बाजूशी जोडलेली असते. बहुतेक सर्व माणसे पहिल्या तीन स्तरांवरच आपले संपूर्ण आयुष्य घालवतात. अगदी मोजकी माणसे अस्तित्वाच्या सर्वांत वरच्या पातळीवर (परमोच्च पातळीवर) पोहोचू शकतात.

 • परमोच्च अस्तित्व (Existenz) : मानवी अस्तित्वाच्या परमोच्च पातळीवर पोहोचणे खूप अवघड असते. हे अस्तित्व स्थलकालबद्ध नसते. ते भौतिक जगाच्या पलीकडे असते. खरेतर हे आपले अस्सल अस्तित्व. विज्ञानाच्या पलीकडे असलेले; परंतु आपण आपल्या भौतिक जगात इतके व्यस्त असतो की, आपल्याला ह्या स्तराची जाणीवही होत नाही. तत्त्वज्ञानाच्या मदतीने आपण नेणिवेच्या पातळीपलीकडे जाऊ शकतो. ह्या पातळीवर पोहोचणे हीच आपल्या मानवी जीवनाची परिपूर्ती आहे, असे कार्लचे म्हणणे होते.

अतीताची कल्पना : परमोच्च स्तरावर पोहोचणे आणि त्याद्वारे आत्मज्ञान होणे हे केवळ तर्काच्या, विज्ञानाच्या आधारे होऊ शकत नाही. त्यासाठी तत्त्वज्ञानात्मक श्रद्धा गरजेची आहे. आत्मज्ञान हे एक प्रकारचे अतीताकडून मिळालेले बक्षिसच आहे, असे कार्ल म्हणतो. अतीताला तो ईश्वर, परमात्मा, सर्व परिवेष्टक तत्त्व, सर्वव्यापी तत्त्व अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधतो. त्याच्या मते अतीताचा फक्त अनुभव घेता येतो, एखाद्या वस्तूप्रमाणे त्याचे ज्ञान होऊ शकत नाही. आपल्या स्वतंत्र, स्वयंप्रमाणित निर्णयप्रक्रियेत ते अति-तत्त्व आपल्याला अनुभवता येते. धार्मिक श्रद्धेच्या नव्हे, तर तत्त्वज्ञानात्मक श्रद्धेच्या साहाय्याने अतीताशी असलेला आपला संबंध दृढ करता येतो. कार्लच्या मते मानवी जीवनात तत्त्वज्ञानात्मक श्रद्धेला खूप महत्त्व आहे. तत्त्वज्ञानात्मक श्रद्धेने कोणत्याही पंथाला, संप्रदायाला मान्यता दिलेली नसते. व्यक्तीच्या स्वतंत्र निर्णयाशी आणि अति-तत्त्वाच्या (परमात्मा) दिशेने त्याने केलेल्या प्रगतीशी ती निगडित असते. ही श्रद्धा बंदिस्त नसते. विचारविनिमय, साधकबाधक चर्चेला इथे वाव असतो. माणसाने ह्या श्रद्धेची जाणीवपूर्वक जपणूक/वाढ केली पाहिजे, ह्या विचारावर कार्ल ठाम होता.

कार्लच्या मते ही अस्तित्वाची परमोच्च पातळी गाठण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे ‘मर्यादा परिस्थितीचा अनुभव घेणे व त्यावर योग्य प्रकारे मात करणे’ आणि दुसरा म्हणजे ‘अस्तित्ववादी संवादाचा अनुभव घेणे’.

१. मर्यादा परिस्थितीवर मात करून जीवनाचा अर्थबोध होणे : इतर अस्तित्ववादी तत्त्ववेत्त्यांप्रमाणेच कार्लच्या मते प्रत्येक व्यक्ती ही परिस्थितीने बांधली गेलेली असते. एका परिस्थितीतून बाहेर पडून आपण दुसऱ्या परिस्थितीत जातो आणि हे चक्र अव्याहत सुरू राहते. आपल्या ह्या सीमित आयुष्यात आपल्याला अनेक वेळा काही अनपेक्षित परिस्थितींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीला कार्ल ‘मर्यादा परिस्थिती’ असे म्हणतो. अशा वेळी माणसाला आपल्या मर्यादित असण्याचा अनुभव येतो, हतबलता जाणवते. त्याच्या मते अशा परिस्थितीचा सामना वस्तुनिष्ठ, तार्किक ज्ञानाने करता येत नाही, तर त्या वेगळ्या प्रकारे हाताळाव्या लागतात. त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोण बदलला तरच आपण खऱ्या अर्थाने ह्या परिस्थितीवर मात करू शकतो. आपल्या अस्तित्वाच्या मर्यादा ओळखून, त्या स्वीकारून, आपली विचार करण्याची पद्धत बदलूनच अशा मर्यादा परिस्थितींचा सामना करता येतो.

आपल्या आयुष्यातील अनेक वेगवेगळ्या अनुभवांपैकी चार प्रमुख प्रकारचे अनुभव आपल्याला मर्यादा परिस्थिती अनुभवायला लावतात. ते म्हणजे–मृत्यूची जाणीव, दुःख, अपराधीपणाची भावना आणि जगण्यासाठीची धडपड. आपला मृत्यू किंवा आपल्या जवळच्या लोकांचा मृत्यू अटळ आहे, ही जाणीव खूप भीतीदायक असते आणि अशा परिस्थितीत आपल्या लक्षात येते की, आपल्या हातात काहीच नसते. जीवनात पदोपदी येणाऱ्या दुःखांमुळे माणसाचे मन खचून जाते. आपण केलेली कृत्ये आणि त्यामुळे येणारा अपराधीपणा आपला सतत पाठलाग करत राहतो. जगण्यासाठी, प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी आयुष्यभर माणसाला झगडावे लागते, धडपड करत राहावे लागते.  ह्या सर्व अनुभवांमध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे ह्या सर्व गोष्टी, घटना आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतात. कार्लच्या मते अशा वेळी एकतर आपण ह्या परिस्थितीत का आहोत ह्याचा विचार करून दुःख करत बसणे हा एक पर्याय आपल्याकडे असतो किंवा त्या परिस्थितीचा स्वीकार करून पुढे जात राहणे हा दुसरा पर्याय असतो. आपल्यावर आलेल्या संकटांचा विचार करून त्याबद्दल दुःख करत बसलो, तर आयुष्य असेच संपून जाईल; परंतु ह्या परिस्थितीचा एकदा स्वीकार केला की, आपल्याला जगण्याची खरी किंमत कळते. आपले आयुष्य किती क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव झाल्यामुळे आपण आयुष्यातील प्रत्येक क्षण अस्सलपणे (Authentically) जगण्याचा प्रयत्न करू शकतो. कार्ल दुःखाकडे सकारात्मक पद्धतीने बघण्याचा सल्ला देतो. दुःख अटळ आहे, त्यामुळे त्याचा स्वीकार करून, अशा परिस्थितीतही आनंदी राहण्याचा प्रयत्न करून, आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणे हाच त्यावरचा उपाय आहे, असे तो सूचवतो.

२. अस्तित्ववादी संवादातून जीवनाचा अर्थबोध होणे : कार्लच्या मते व्यक्तींमध्ये होणारा अस्तित्ववादी संवादच (Existential Communication) आपल्या आयुष्याला खरा अर्थ प्राप्त करून देतो. त्याने संवादाचे चार प्रकार सांगितले आहेत, जे अस्तित्वाच्या चार स्तरांशी जोडलेले असतात.

निव्वळ अस्तित्वाच्या स्तरावरचा संवाद हा आदिम स्वरूपाचा, आपल्या स्वार्थासाठी केलेला असतो. जाणिवेच्या स्तरावरचा संवाद हा त्याहून थोडा प्रगत असला, तरी तो बुद्धीवर आधारलेला, समस्यांच्या निराकरणासाठी केलेला संवाद असतो. नेणिवेच्या स्तरावर होणारा संवाद हा हळूहळू भौतिक जगातील वस्तूंपासून आणि विषयांपासून दूर जाऊन व्यक्तीच्या जवळ जायला लागतो. प्रत्येक संवाद हा आपल्या भौतिक जगासंदर्भात असू शकत नाही, त्या पलीकडेही आपण इतरांशी संवाद साधू शकतो ह्याची जाणीव व्हायला लागते.

ह्या तीनही स्तरांवरच्या संवादाचे वर्णन भाषेच्या आधारे करता येते; परंतु परमोच्च पातळीवर होणाऱ्या अस्तित्ववादी संवादाचे वर्णन आपल्याला भाषेच्या साहाय्याने करता येत नाही. त्याचे वर्णन फक्त तत्त्वज्ञानाच्या आधारेच होऊ शकते. असा संवाद म्हणजे दोन व्यक्तींमधील जिव्हाळ्याचा, प्रेमाचा, आपुलकीचा संवाद. ह्या संवादाचे मूळ प्रेमात रुजलेले असते. असा अस्तित्ववादी संवादच अस्तित्वाची परमोच्च पातळी गाठण्यासाठी आणि अतीताचा अनुभव घेण्यासाठी आवश्यक असतो.

असा संवाद साधण्यासाठी कार्लच्या मते काही विशिष्ट प्रकारचे गुण आपल्या अंगी बाणवण्याचा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. सर्वप्रथम आपली एकांतात राहण्याची तयारी असली पाहिजे. एकांत म्हणजे समाजापासून, लोकांपासून दूर जाणे नव्हे; तर एकटे राहून, अंतर्मुख होऊन, आत्मपरीक्षण करणे होय. आपल्या मतांवर नकळतपणे आधिपत्य गाजवणारे माहिती-तंत्रज्ञान व इतर माध्यमे किंवा आपलेच पूर्वग्रहदूषित विचार ह्या सर्व प्रभावांपासून दूर जाऊन अंतर्मुख होणे म्हणजे एकांत. ह्या एकांतातूनच अस्तित्ववादी संवादाची सुरुवात होते.

कार्लच्या मते असा अस्तित्वाचा ठाव घेणारा संवाद फक्त समान वैचारिक पातळीवर असलेल्या व्यक्तींमध्येच होऊ शकतो. अस्तित्ववादी संवाद म्हणजे दोन व्यक्तींमधील एक प्रेमळ लढा आहे. ह्या लढ्यात मोकळेपणा असला पाहिजे, जबरदस्ती नाही. त्यासाठी दोन्ही व्यक्तींची संवाद करण्याची इच्छा असली पाहिजे. एकमेकांचे विचार, टीका सकारात्मक पद्धतीने स्वीकारता आली पाहिजे. त्यात एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास असला पाहिजे. अशा अस्तित्ववादी संवादाद्वारेच आपण  परमोच्च अवस्थेत पोहचू शकतो. तिथेच एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची खरी ओळख पटते आणि ते दोघे आपल्या जीवनाचा नवीन अर्थ समजून घेऊन आपले जीवन प्रगल्भ करू शकतात.

गूढ चिन्हे किंवा प्रतीके : ह्या अस्तित्ववादी संवादाच्या आधारेच आपल्याला अतीताचे ज्ञानही होऊ शकते. रोजच्या व्यावहारिक भाषेत त्याचे वर्णन शक्य नाही. गूढ चिन्हांच्या मदतीने आपल्याला अतीताचा अनुभव घेता येतो. आपली व्यवहारातील नेहमीची भाषा अतीताचे स्वरूप व्यक्त करण्यास अपुरी पडते. त्याची एक वेगळी भाषा असते जी गूढ चिन्हांनी किंवा प्रतीकांनी बनलेली असते. ही गूढ चिन्हेच आपल्याला निव्वळ अस्तित्वापासून परमोच्च अस्तित्वाकडे जाण्यासाठी मदत करतात.

व्यक्तीच्या आयुष्यात अंतर्भूत असलेल्या अस्तित्वाच्या अनंत शक्यता, त्याचे मर्यादित अस्तित्व आणि त्यातील जीवघेण्या विरोध यांमुळे माणूस परतत्त्वाकडे, म्हणजे ईश्वराकडे वळतो. पण त्याच्या गूढ खुणा जगात विखुरलेल्या असतात. अशा गूढ प्रतीकांतून जगाची भंगुरता प्रगट होते आणि माणसामध्ये श्रद्धा उत्पन्न होत जाते. आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू, घटना विनाशी आहेत आणि अतीत किंवा ईश्वर हेच तत्त्व शाश्वत आहे, याची त्याला खात्री पटत जाते. ह्यालाच कार्लने ‘नश्वरतेचे तत्त्वज्ञान’ असे म्हटले आहे. अशाप्रकारे कार्ल पोथीनिष्ठतेला आणि कर्मकांडाला विरोध करत असला, तरी निरीश्वरवादाला मुळीच थारा देत नाही. त्यामुळे अशा सर्व प्रतीकांचा अर्थ लावणे आणि तत्त्वज्ञानात्मक श्रद्धेच्या बळावर ईश्वरी साक्षात्कार करून घेणे हेही तत्त्वज्ञानाचे एक महत्त्वाचे कार्य आहे, ह्यावर त्याचा विश्वास होता.

अशाप्रकारे कार्लच्या तत्त्वज्ञानात मानवी अस्तित्व, त्याचे स्वरूप, मर्यादा, त्याची अतीताकडे असणारी सन्मुखता यांबरोबरच भौतिक जग, संबंधित विज्ञाने आणि बुद्धी यांचेही महत्त्व आहे. त्यामुळे त्याचे तत्त्वज्ञान व्यापक, मानवतावादी आणि समतोल होते. त्याच्या अस्तित्ववादी तत्त्वज्ञानात बाह्य जग, सामाजिक-राजकीय परिस्थिती, व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि अतीताची ओढ अशा परस्परविरोधी द्वंद्वांना एकत्र गुंफण्याचा सुंदर प्रयत्न दिसून येतो.

कार्लच्या तत्त्वज्ञानाचा अनेक आधुनिक तत्त्ववेत्त्यांच्या विचारांवर प्रभाव पडलेला दिसतो. त्यातील काही महत्त्वाचे तत्त्ववेत्ते म्हणजे फ्रेंच तत्त्वज्ञ पॉल रिकर, जर्मन तत्त्वज्ञ हाना आरेंट, हान्स गाडमर आणि अमेरिकन तत्त्वज्ञ विलियम अर्ल. हाना ह्यांनी कार्लच्या मार्गदर्शनाखाली आपला प्रबंध लिहिला. तसेच पुढे त्याच्या अनेक ग्रंथांचे संपादन करून ती इंग्रजी भाषिक देशांमध्ये पोहोचवण्याचे श्रेयही हाना ह्यांना जाते.

रिकर हासुद्धा कार्लचा विद्यार्थी होता. ईश्वर, शास्त्र आणि तत्त्वज्ञान ह्यांच्यातील भेदाविषयीचे रिकरचे विचार हे कार्लच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेले आहेत.

विलियम अर्लचा कार्लच्या तत्त्वज्ञानाचा विशेष अभ्यास होता आणि त्याने त्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत.

हायडल्‌बर्ग विद्यापीठाने कार्लच्या योगदानाची दखल घेऊन १९८३ सालापासून ‘कार्ल यास्पर्स’ हे पारितोषिक जाहीर केले. तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोणातून केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शास्त्रीय संशोधनाला हे पारितोषिक दिले जाते. खास तत्त्वज्ञानासाठी दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च पारितोषिकांपैकी हे एक पारितोषिक आहे.

१९८० साली कार्लच्या काही अभ्यासकांनी त्याचे तत्त्वज्ञान आणि त्या संबंधीचे विचार ह्यांवर संशोधन करण्यासाठी ‘कार्ल यास्पर्स सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका’ ही संस्था उभारली. २००५ सालापासून त्यांनी Existenz हे नियतकालीक सुरू केले. संस्थेच्या वार्षिक बैठकीत प्रस्तुत करण्यात येणारे शोधनिबंध ह्या नियतकालिकात प्रसिद्ध होतात.

कार्लने जर्मन भाषेत विपुल लेखन केले असून त्याच्या काही महत्त्वपूर्ण जर्मन ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरेही झाली आहेत. त्याचे महत्त्वाचे ग्रंथ असे :  जनरल सायकोपॅथॉलॉजी (जर्मन १९१३, इं. भा. १९६३), मॅक्सवेबर (१९३२), फिलॉसॉफी (३ खंड, १९३२), रीझन अँड एक्झिस्टन्स (१९३५, १९५५), नित्शे (१९१६, १९६५), द फिलॉसाफी ऑफ एक्झिस्टन्स (१९३८, १९७१), द आयडिया ऑफ द युनिव्हर्सिटी (१९४६, १९५९), द क्वेश्चन ऑफ जर्मन गिल्ट (१९४६, १९४७), ट्रूथ अँड सिंबल (१९४७, १९५९), द ओरिजिन अँड गोल ऑफ हिस्टरी (१९४९, १९५३), मिथ अँड क्रिश्चॅनिटी (१९५४, १९५८), द फ्यूचर ऑफ मॅनकाइंड (१९५७, १९६१) इत्यादी.

बाझल (स्वित्झर्लंड) येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

 • Miron, Ronny, Karl Jaspers : From Selfhood to Being, Amsterdam, 2012.
 • Salamun, Kurt, ‘Karl Jaspers Conception of the Meaning of Life’, Existenz, 2006.
 • Schilpp, P. A. Ed. The Philosophy of Karl Jaspers, New York, 1957.
 • Thornhill, Chris; Miron, Ronny; Zalta, Edward N. Ed. ‘Karl Jaspers’, The Stanford Encyclopedia of Philosophy, 2020.
 • Wallraff, Charles Frederic, Karl Jaspers : An Introduction to His Philosophy, New Jersey, 2015.
 • गोळे, लीला, अस्तित्ववादी तत्त्वज्ञ, लातूर, २००५.
 • https://plato.stanford.edu/entries/jaspers/
 • https://www.karljaspers.us/

                                                                                                                                                              समीक्षक : डॉ. शर्मिला वीरकर