खरे, नारायण मोरेश्वर : (? १८८९ – ६ फेब्रुवारी १९३८). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संगीतकार व संगीतशास्त्रावरील साक्षेपी लेखक. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील तासगाव येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी बालवयातच ते मिरज येथे आले. त्यांच्या गोड आवाजामुळे लहानपणापासूनच त्यांना कीर्तनास बोलवीत. पुढे त्यांना याकरिता मिरज संस्थानाच्या दरबाराकडून मासिक शिष्यवृत्ती मिळाली. विद्यालयीन शिक्षण घेत असताना शालांत परीक्षेच्या दरम्यान विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांचा आवाज पलुस्करांना भावला आणि त्यांच्या पालकांच्या संमतीने नारायण खरेंना घेऊन ते मुंबईला आले. तेथे त्यांचे गांधर्व महाविद्यालयात रीतसर शिक्षण सुरू झाले आणि नऊ वर्षांचा अभ्यासक्रम अवघ्या चार वर्षांत पूर्ण करून ते संगीत प्रवीण परीक्षा उत्तीर्ण झाले.
नारायण खरे यांची गांधर्व महाविद्यालयात आचार्यपदी नियुक्ती करण्यात आली (१९१२). अध्यापनाबरोबरच त्यांची संगीतसेवा-रियाज चालू असताना या सुमारास महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात परत आले होते (१९१५). त्यांनी अहमदाबाद येथे साबरमती आश्रमाची स्थापना केली होती. सत्याच्या शोधामध्ये संगीताचा उपयोग चांगला होऊ शकेल, या विचाराने त्यांनी विष्णु दिगंबरांना एका सात्त्विक कलाकाराला पाठविण्याची विनंती केली, तेव्हा पलुस्करांनी आपल्या या गुणवान व संगीतज्ञ अध्यापकास अहमहाबादला पाठविले. खरे यांनी आश्रमामध्ये संगीतमय वातावरण निर्माण करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. दररोजच्या प्रार्थनांचे नियोजन त्यांनी कुशलतेने केले. तेथील प्रार्थनांचे संकलन करून त्यांनी आश्रम भजनावली हे पुस्तक लिहिले. त्यात सुमारे ४०० भजनांचा संग्रह आहे. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. १९२० साली अहमदाबाद येथे स्थापन झालेल्या गुजरात विद्यापीठाच्या संगीतविभागासाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अहमदाबादमध्ये २६ नोव्हेंबर १९२२ रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रीय संगीत मंडळ या संस्थेच्या प्रमुखपदी डॉ. हरिप्रसाद देसाई यांची निवड करण्यात आली; तर मंत्रीपदी नारायण खरे यांची नियुक्ती करण्यात आली. सौराष्ट्र-गुजरातमधील लोकसंगीत एकत्रित करून त्यांनी लोकसंगीत हे पुस्तक प्रकाशित केले. शिवाय गांधीजींच्या प्रभावामुळे त्यांनी संगीतसेवेबरोबरच स्वातंत्र्य आंदोलनातही काम केले. १९३० च्या मार्च महिन्यातील दांडीयात्रेत सहभागी झालेल्या पहिल्या ८० जणांच्या तुकडीमध्ये खरे अग्रस्थानी होते. विष्णु दिगंबरांच्या निधनानंतर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ (१९३१) या संस्थेच्या प्रथम अध्यक्षपदी खरे यांची निवड झाली. १९३५ साली खरे यांनी अहमदाबाद येथे ‘गांधर्व महाविद्यालय’ स्थापन केले. लहान मुलांसाठी बालाविनोद संगीत रागदर्शन याचे तीन भाग त्यांनी प्रकाशित केले. त्यांनी रागांग वर्गीकरणाची स्वतंत्र पद्धत निर्माण केली. त्यांनी सर्व रागांचा सूक्ष्म अभ्यास करून ३० स्वरसमुदायांची निवड करून सर्व रागांचे विभाजन ३० रागांगांमध्ये केले.
नारायण खरे यांचा विवाह लक्ष्मीबाई यांच्याशी झाला होता. त्यांना रामचंद्र व माधुरी अशी दोन अपत्ये.
ऐन उमेदीत हरिपुरा (गुजरात) येथे त्यांचे निधन झाले. उत्तम संगीतज्ञ आणि श्रेष्ठ नीतिमत्ता असलेला असा कलाकार पुन्हा होणार नाही. असे उद्गार महात्मा गांधींनी त्यांच्या निधनप्रसंगी काढले. उच्च दर्जाचे संगीत ज्ञान, भरीव संस्थात्मक कार्य, अजोड देशभक्ती आणि संगीत प्रसाराच्या कार्यासाठी वाहून घेण्याची मन:पूर्वक धडपड ही वैशिष्ट्ये असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
भाषांतरकार – सुधीर पोटे
समीक्षक – सु. र. देशपांडे
#अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ
Panditji had three children. Ramachandra, Mathuri and vasant. The youngest son Vasant passed away just before dandi Yatra. Gandhiji suggested panditji not to join yatra but with the permission of his wife Laxmibai he became a part of the great yatra..
आपण ही नोंद वाचल्याबद्दल धन्यवाद. कृपया आपण दिलेल्या माहितीचा संदर्भ कळवावा. जेणेकरून ही माहिती नोंदीत समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेता येईल.