बकाणा निंब हा वृक्ष मेलिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मेलिया ॲझॅडिराक आहे. कडू लिंब हा वृक्षदेखील याच कुलातील आहे. बकाणा निंब मूळचा आग्नेय आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील आहे. भारतात तो शेताच्या बांधांवर तसेच बागांमध्ये लावलेला दिसून येतो. उत्तर भारतात तो अधिक प्रमाणात आढळतो. तो जवळपास कडू लिंबासारखा दिसत असल्यामुळे ओळखण्यात संभ्रम होऊ शकतो. बकाणा निंब वृक्षाची फुले जांभळी, तर कडू लिंबाची फुले पांढरी असतात.
बकाणा निंब हा मध्यम आकाराचा वृक्ष असून तो ७–१५ मी. उंच वाढतो. अपवादात्मक स्थितीत तो ४५ मी. उंच वाढल्याचे आढळले आहे. खोडाची साल करड्या तपकिरी रंगाची असते. पाने द्विपिच्छकी किंवा त्रिपिच्छकी, एकाआड एक व सु. ४५ सेंमी. लांब असतात. पर्णिका पिसांसारख्या, वरून गडद हिरव्या तर खालून फिकट हिरव्या असतात. पानांच्या बगलेत परिमंजरी येते. फुले लहान, जांभळट पांढरी आणि सुगंधी असून पावसाळ्याच्या अखेरपासून हिवाळा संपेपर्यंत येतात. फळांना लिंबोळ्या म्हणतात. लिंबोळ्या गोलसर व हिरवट पिवळ्या असून लहान गावठी बोरांसारख्या दिसतात. पिकल्यावर त्या पिवळ्या होतात. फळांत ४-५ बिया असतात.
बकाणा निंब हा वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी उपयुक्त आहे. चहा-कॉफीच्या मळ्यात सावलीकरिता त्याची लागवड करतात. त्याचे लाकूड हलके परंतु मजबूत आणि टिकाऊ असून त्याला कीड लागत नाही. ते खेळणी, सिगार पेट्या, दारूगोळ्याच्या पेट्या, खोकी, कपाटे, शेतीची अवजारे, सजावटीचे सामान, वाद्ये इत्यादींकरिता वापरतात. पाने आणि साल कुटून त्याचा लगदा मासे पकडण्यासाठी करतात. सालीचा काढा कृमिनाशक, ज्वरहारक तसेच सूज कमी करण्यासाठी उपयोगी पडतो. फळे कीटकनाशक असून त्यांचे अतिसेवन केल्यास मनुष्यास विषबाधा होते.