संधिपाद संघाच्या ओडोनेटा गणातील एक कीटक. या गणात ११ कुले आहेत. जगभरात त्यांच्या सु. ५,५०० जाती असून त्यांपैकी सु. ५०० जाती भारतात आढळतात. त्यांचे डिंभ जलचर असल्यामुळे ते तलाव, ओढे, डबकी किंवा पाणथळ जागांच्या आसपास तसेच झाडाझुडपांवर वर्षभर आढळतात. ‘चटकचांदणी’ नावानेही चतुर हा कीटक ओळखला जातो.
चतुर (क्रोकोथेमिस एरिथ्रा)

चतुराचे शरीर रंगाने हिरवे व सु. १९ मिमी. लांब असून त्याचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग असतात. डोक्यावर दोन लहान शृंगिका व मोठ्या मण्यासारखे दोन संयुक्त डोळे असतात. डोक्याचा अर्ध्याहून अधिक भाग डोळ्यांनी व्यापलेला असतो. दोन्ही डोळ्यांत मिळून सु. ३०,००० नेत्रिका असतात. प्रत्येक नेत्रिकेत एक भिंग असते. त्यामुळे चतुराला निरनिराळ्या बाजूंचे दिसते. मुखांगे चावण्यासाठी व चघळण्यासाठी उपयुक्त असतात. वक्ष तीन खंडांचे बनलेले असून त्यावर पायांच्या तीन जोडया आणि पंखांच्या दोन जोडया असतात. पाय लालसर असून त्यावर बारीक काटे असतात. पायांचा उपयोग आधाराला पकडून बसण्यासाठी होतो. मात्र, चालण्यासाठी त्यांचे पाय अनुकुलित झालेले नाहीत. पंख पातळ, जाळीदार व पारदर्शी असतात. प्रत्येक पंखाच्या वरच्या बाजूच्या कडेवर एक खाच व टोकाकडे गडद ठिपका असतो. झाडावर किंवा जमिनीवर बसताना चतुर आपले पंख पसरून बसतो. उदर अरुंद, सडपातळ, दंडाकार व फिकट पिवळ्या रंगाचे असून दहा खंडांनी बनलेले असते. मादीचे उदर तुलनेने रुंद असून त्याच्या टोकाला दंडगोलाकार उपांगे असतात.

हवेतल्या हवेत भक्ष्य पकडणारा चतुर हा एकमेव कीटक आहे. उडताना ते पायांची टोपलीसारखी संरचना तयार करतात आणि त्याद्वारा चिलटे, मिज माश्या व डास यांसारखे लहान कीटक पकडतात. मोठे चतुर डास, गोमाशी व घोडामाशी यांना खात असल्यामुळे त्यांना उपयुक्त कीटक मानतात. नर-मादी सोबत हवेत उडतात आणि उडत असताना समागम करतात. चतुराची मादी पाण्याजवळ, बहुधा तरंगणाऱ्या किंवा कोवळ्या वनस्पतीवर अंडी घालते. त्यांच्या काही जातीच्या माद्या पाण्याखाली जाऊन सुरक्षित जागी अंडी घालतात. एका वेळेस ती शेकडो ते हजारो अंडी घालते. १ ते ३ आठवडयात अंड्यातून अर्भक बाहेर येते. त्यांचे शरीर जाड असून डोके आणि तोंड मोठे असते; परंतु पंख नसतात. त्यांचे भक्ष्य पाण्यातील कीटक, अळ्या, लहान मासे व डिंभ हे आहे. अर्भकाच्या मुखांगातील खालच्या ओठाचे रूपांतर काटेरी जबड्यात झालेले असून त्याची लांबी शरीराच्या अर्ध्या भागाएवढी असते आणि त्याद्वारे भक्ष्य पकडले जाते. श्वासनाल कल्ल्यांद्वारे त्यांचे श्वसन घडते. अर्भकावस्था काही आठवड्यांपासून पाच वर्षांपर्यंत असते. १० ते १५ विकासावस्थांतून गेल्यानंतर शेवटची कात टाकल्यावर प्रौढ चतुर पाण्यातून बाहेर येतो. प्रौढ चतुर काही आठवडे ते काही महिने जगतात.

टाचणी चतुर (सेरिॲग्रिऑन सेरिनोरूबेलम)

जगातील जलद कीटकांपैकी ते एक मानले जातात. प्रौढ चतुर ताशी ६१ किमी. वेगाने उडू शकतो. कीटकांच्या इतिहासात सुरुवातीस चतुर आढळले असून सु. ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील जीवाश्मात चतुर आढळले आहेत. ‘मेग्यॅन्यूरा’ प्रजातीच्या चतुराच्या पंखांची लांबी एक मी. पर्यंत होती. ही प्रजाती लुप्त झाली आहे.

भारतात पिवळ्या-लाल बुंदक्यांचे किंवा छोटया ठिपक्यांचे व सूक्ष्म जाळीदार पंखांचे चतुरदेखील आढळतात. नाजूक शरीराच्या व लाल-पिवळ्या रंगांच्या या चतुरांना टाचणी (डॅम्सेल फ्लाय) म्हणतात.