व्याख्या व स्वरूप : ‘संरक्षण अर्थशास्त्र’ ही तुलनेने अर्थशास्त्राची एक नव विकसित विद्याशाखा आहे. अर्थशास्त्रीय सिद्धांत, तत्त्वे व साधने यांच्या आधाराने संरक्षण, नि:शस्त्रीकरण आणि शांतताविषयक बाबींचे ज्यात विश्लेषण केले जाते, त्याला ‘संरक्षण अर्थशास्त्र’ असे म्हणतात.

संरक्षण अर्थशास्त्र हे आर्थिक व्यवस्थापनाशी संबंधित असून त्यात संरक्षण खर्चाची तरतूद, परिणाम, युद्धकाळातील अर्थ व्यवस्थापन आणि शांतता काळातील संरक्षण अंदाजपत्रक इत्यादींशी ते निगडित असते.

मूलत: संरक्षण अर्थशास्त्रात संरक्षणविषयक बाबींच्या विश्लेषणासाठी आर्थिक तत्त्वांचे उपयोजन केले जाते आणि त्यासाठी सूक्ष्म वा समग्र अर्थशास्त्र हे निवडीचे शास्त्र असल्याने संरक्षण अर्थशास्त्रातून व्यापक आणि संरक्षणाच्या स्पर्धात्मक पर्यायांच्या निवडीचा अभ्यास केला जातो. त्यामुळेच यात शुद्ध अर्थशास्त्रीय समस्येपासून गणिती अर्थशास्त्रीय प्रारूप निर्मितीपर्यंतचा विचार केला जातो.

संरक्षण अर्थशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात अगदी अॅडम स्मिथ यांच्यापासून झाल्याची दिसते. स्मिथ यांनी त्यांच्या वेल्थ ऑफ नेशन्स (१७७६) या ग्रंथात संरक्षण खर्चाच्या अर्थव्यवस्थेतील परिणामांचा ऊहापोह केला आहे. या विषयाचे आधुनिक काळातील विश्लेषण आर्थिक दृष्टीकोनातून प्रा. हीथ व मॅकीन यांनी त्यांच्या द इकॉनॉमिक्स ऑफ डिफेन्स इन न्यूक्लिअर एज (१९६०) या ग्रंथामध्ये केलेले असून त्यात अनेक अर्थशास्त्रज्ञांनी पुढील काळात भर घातलेली आहे.

संरक्षणाचे आर्थिक विश्लेषण हे नेहमीच अवघड आणि क्लिष्ट असून त्याची अनिवार्य गरज नसल्याने अल्प विकसित देशांमध्ये या विषयासंबंधी फारशी चर्चा नाही; तथापि विकसित पाश्चिमात्य देशांत संरक्षण अर्थशास्त्राची स्वतंत्र विद्याशाखा मान्यता प्राप्त झाली असून त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन व लेखन होत असल्याचे दिसते आहे.

अर्थशास्त्र हे मूलत: संसाधनाचे कार्यक्षम वाटप आणि विवेकी पद्धतीने संसाधन वापराच्या निवडीशी संबंधित असून त्यांचा काटकसरीने पर्याप्त वापर कसा करावा हे ते सुचविते. याचाच आधार घेऊन संरक्षण अर्थशास्त्रात संरक्षण व बिगर संरक्षण क्षेत्रांतील वाटपांचा विचार केला जातो. आधुनिक काळात सर्वच देशांमधील संशोधन संरक्षण क्षमता निर्मितीसाठी वापरली जात असल्याने हा अभ्यास विषय महत्त्वपूर्ण ठरत आहे.

संरक्षण सिद्धतेची निवड करताना धोरणकर्त्यांना अर्थशास्त्रीय पर्यायी तत्त्वांचा (Principal of Substitution) विचार करून किमान खर्च व कमाल कार्यक्षमता संयोग असणारी पद्धती/शस्त्रास्त्र यांचा पर्याय निवडला जातो.

संरक्षण दलाचे बहुतांशी कामकाज मक्तेदारी अशा संरचनेत केले जाते. पण सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात त्यातील स्पर्धात्मकता वाढत आहे. दहशतवादासारख्या नवीन समस्या मोठे स्वरूप धारण करीत आहेत आणि त्यातूनच अनेक समस्यांसाठी संरक्षण आर्थिक तत्त्वांचा वापर आवश्यक ठरत आहे.

संरक्षण अंदाजपत्रके  – आकार, उत्पादनाचा खर्च, परिणामकारकता, तांत्रिक परिणामकारकता,  शस्त्रव्यापार, शस्त्रास्त्र स्पर्धा बाजार, संरक्षण उद्योग रचना, दहशतवादी वर्तन पद्धती, संरक्षण खर्चाचे आर्थिक परिणाम, खेळ सिद्धांत, धोरणात्मक व्यूहरचना इ. अर्थशास्त्रीय साधने मोठ्या प्रमाणात वापरली जाताना दिसून येतात.

संदर्भ :

  •   Hartley, Keith; Sandler, Todd, Eds. Economics of Defencs, Cheltenham, 2001.
  •  Hitch, J. Charles; Mckean N. Roland, The Economics of Defence in Nuclear Age, Cambridge, 1967.
  •  Katoch, Rajan, Defence Economics : Core Issues in Strategic Analysis vols. 30, no. 2, 2006.
  •  Kennedy, Gavin, Defence Economics, London, 1994.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा