सर्वगोड , मुक्ता शंकरराव : (१९२२ – २००४). दलित चळवळीतील कार्यकर्ती आणि लेखिका. यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण एस.एस.सी. पर्यंत झाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी टिचर डिप्लोमा केला. मुक्ता सर्वगोड यांचे वडील शेकु साळवे हे भारतीय रेल्वेमध्ये पॅसेंजर ड्रायव्हर होते. त्यामुळे तुलनेने घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. वडील शेकु साळवे हे दलित चळवळीतील खंदे कार्यकर्ते होते. मुक्ता यांच्या लहानपणी घरात चळवळी विषयीची चर्चा होत असे. त्यात लोकांनी महारकी, बलुतेदारी सोडावी, मेलेली जनावरे खाणे बंद करावे, मृत मांस कोणी खाल्ल्यास त्यास समजावून सांगावे, तसेच गावातील गुरं – ढोरं ओढायचे बंद करावे अशा चर्चांनी मुक्ताच्या बालमनावर आंबेडकरी विचारांचे संस्कार झाले.
वडिलांनी शिक्षणाला प्रोत्साहन दिले. ते त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध कार्यक्रमांना सोबत घेऊन जात असत. मनमाड येथे रेल्वेतील महार कामगारांच्या महिला खुल्या अधिवेशनात मुक्ता यांनी भाषण केले, तेव्हा त्या इंग्रजी पाचवी मध्ये शिकत होत्या (१९३८). नंतर मुक्ता यांचे पोलीस इन्स्पेक्टर शंकरराव सर्वगोड यांच्याशी लग्न झाले व त्या मुंबईमध्ये राहायला आल्या. मुंबईतील नायगाव, वरळी, दादर इ. ठिकाणी १९ महिला मंडळे त्यांच्या पुढाकाराने स्थापन झाली. त्या तिथे प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेत. मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय दलित महिला परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनात मुक्ता सर्वगोड यांनी त्यांच्या भाषणातून शिक्षणाचे महत्त्व व स्त्री-पुरुष समतेचा विचार सांगितले (१९४५). दादर नायगाव येथे अस्पृश्य महिलांची सभा आयोजित करून स्त्री संघटना व बाल संगोपनाचे महत्त्व त्या पटवून देत. मुक्ता सर्वगोड यांनी १९४५ च्या सुमारास मलबार हिलवरील बिर्ला हाऊसच्या पटांगणात गांधीजींशी चर्चा केली “हरिजन सेवक संघाचा फंड हरिजनांच्या ताब्यात का देत नाहीत?”, “आंबेकरांबद्दल आपलं मत काय आहे?” इ. प्रश्न गांधीजींना त्यांनी विचारले. दुसऱ्या दिवशी ही बातमी पेपरमध्ये आली परळच्या बी आर टी चाळीतील महिला एकत्र आल्या व म्हणाल्या ‘ही बाई दखनी, आपल्या वळकीची नाय पेपरात आलंय ती गांधीला भेटून आली ही बाई कॉंग्रेसची आहे आपल्या पक्षात मुद्दाम शिरतीय स्पायडीसारखी आणि शेवटी ही बाब काही मंडळींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितली, तेव्हा बाबासाहेब म्हणाले “ती उत्सुकता म्हणून भेटायला गेली होती. शिवाय ती बाई हुशार वाटली”. १९५६ दरम्यान संपुर्ण कुटुंबासह त्या पुण्याला आल्या. पुण्यातील रास्ता पेठेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला त्या प्रसंगी मुक्ता सर्वगोड ह्या त्या समारंभाच्या अध्यक्ष होत्या. पुण्यात त्यांनी बालवाड्या सुरू केल्या. मुलांना मोफत दुधाचा व्यवसाय मिळवून दिला. तसेच ‘गंज पेठेला महात्मा फुले पेठ असे नाव देण्यात आले. त्या फलकाचे अनावरण व वाचनालयाचे मुक्ता सर्वगोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. १९५९ ते १९६५ पर्यंत त्या भारत सेवक समाज या राष्ट्रीय संस्थेच्या पुणे जिल्ह्याच्या मानद संघटक होत्या.
मुक्ता सर्वगोड यांचे मिटलेली कवाडे हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. १९८३ साली ते प्रकाशित झाले. या आत्मचरित्रामध्ये मुक्ता सर्वगोड यांच्या जीवनकहाणी बरोबर तत्कालीन समाज सुधारणा चळवळीचे चित्रण आहे. आंबेडकरी चळवळीचे अत्यंत महत्त्वाचे पैलू या आत्मचरित्रा मधून अधोरेखित झाले आहेत. मुंबई मधील आंबडेकरी चळवळीचा पट या लेखनातून उलगडला आहे. मुंबईतील नायगाव, बीडीडी चाळ, परळ या भागातील चाळ संस्कृती, जातीभेद व प्रांतभेदावर मात करणाऱ्या आंबेडकरी चळवळीचे, कार्यकर्त्यांचे महत्त्वाचे संदर्भ या आत्मचरित्रात आहेत. मुक्ता यांना ‘गोडमावशी’ असे संबोधले जात. एक लेखिका म्हणून त्यांची व्यापक भूमिका या लेखनातून व्यक्त झाली आहे. या आत्मचरित्राकडे दलित लेखिकेचे आत्मचरित्र म्हणून जरी सर्वसामान्य वाचक बघत असेल तरी लेखिका मात्र म्हणते की “मला दलित लेखिका म्हणू नये मी जन्मले ते वातावरण दलित नव्हतं कारण रेल्वेचं जग होतं”. वेशीबाहेरील बहिष्कृत जीवनाचे अनुभव मुक्ता यांच्या वाट्याला आलेले नव्हते ; परंतु लेखिका ह्या महार जातीत जन्मलेल्या असल्यामुळे शाळेत असताना त्यांना अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले. मुक्ता सर्वगोड ह्या शिक्षण घेणाऱ्या पहिल्या पिढीचे नेतृत्व करतात म्हणून त्यांना परंपरिक चौकट मोडताना अपमान सहन करावा लागला. शाळेत जाताना त्यांच्याविषयी ज्या प्रतिक्रिया व्यक्त होत असतं त्या त्यांनी अगदी जशाच्या तशा आपल्या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. वैयक्तिकततेऐवजी दलित स्त्री जीवन, आंबेडकरी चळवळ आणि दलित समूहजीवन या दृष्टीने या आत्मचरित्रास विशेष महत्त्व आहे. मुक्ता सर्वगोड यांचे २००४ साली निधन झाले.
संदर्भ :
- सर्वगोड, मुक्ता, मिटलेली कवाडे, सुगावा प्रकाशन, पुणे, २००८.
- Rege, Sharmila, Writting caste, writing gender : Narrating Dalit Women’s Testimonies, Zubaan Publication, New Delhi, 2006.