स्टो, हॅरिएट बीचर : (१४ जून १८११—१ जुलै १८९६). अमेरिकन कादंबरीकर्त्री. दासप्रथा किंवा गुलामगिरीविरोधी लेखिका म्हणून प्रसिद्ध. जन्म लिचफील्ड, कनेक्टिकट येथे. तिचे वडील लायमन बीचर हे कट्टर इव्हँजे-लिकल, कॅल्व्हिन पंथाचे होते आणि आपल्या मुलांवरही त्या पंथाचे संस्कार ते कसोशीने करत होते. १८३२ च्या ऑक्टोबरमध्ये ते सिनसिनॅटी येथे जाऊन राहिले. तेथे हॅरिएट ची बहीण कॅथरिन हिने ‘वेस्टर्न फीमेल इन्स्टिट्यूट’ म्हणून एक शाळा काढली होती. हॅरिएट त्या शाळेत शिकवू लागली. १८३४ पासून ती वेस्टर्न मंथली मॅगझिन ह्या नियतकालिकासाठी लेखन करू लागली. ‘ए न्यू इंग्लंड स्केच’ ह्या तिच्या कथेसाठी तिला पारितोषिकही मिळाले. १८३६ मध्ये तिचा विवाह कॅल्व्हिन एलिस स्टो ह्यांच्याशी झाला.
संसारातल्या आर्थिक अडचणींना तोंड देत असतानाच तिला दक्षिण अमेरिकेत केंटुकी येथे जाण्याचा योग आला. तेथे असलेली गुलामगिरीची पद्धत तिने पाहिली. निग्रो गुलामांचे दुःखमय आयुष्य पाहून तिच्या मनात गुलामगिरीच्या विरोधी तीव्र भावना निर्माण झाली. १८५० नंतर तिने अंकल टॉम्स केबिन ह्या पुढे जगद्विख्यात झालेल्या, गुलामगिरीविरोधी कादंबरीचे लेखन सुरू केले. वॉशिंग्टन डी. सी. येथून निघणार्या नॅशनल इरा ह्या गुलामगिरीविरोधी नियतकालिकात १८५१-५२ मध्ये ती कादंबरी क्रमशः प्रसिद्ध झाली. १८५२ मध्ये ती दोन भागांत पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. एका वर्षात ह्या कादंबरीच्या तीन लाख प्रती संपल्या.
हॅरिएटच्या ह्या कादंबरीला वाचकांचा एवढा मोठा प्रतिसाद मिळाला, तरी गुलामगिरीच्या पुरस्कर्त्यांकडून ह्या कादंबरीवर प्रखर आणि कडवट टीका झाली. दक्षिण अमेरिकेत तर ती झालीच; परंतु अमेरिकेच्या उत्तरेकडील राज्यांतही ती झाली. ह्या कादंबरीत गुलामगिरीचे चित्रण अत्यंत भडक स्वरूपात रंगविले गेले आहे, हा सार्वत्रिक आक्षेप तेथे घेण्यात आला. अंकल टॉम ह्या गुलामाची ही करुण कहाणी आहे. अंकल टॉम हा एक नीतिमान आणि धर्मपरायण ख्रिस्ती मनुष्य. आरंभी तो शेल्बी नावाच्या एका दयाळू कुटुंबात गुलाम म्हणून राहात असतो; तथापि शेल्बी कुटुंबीयांना काही आर्थिक अडचणी आल्यामुळे ते आपले सर्व गुलाम विकायला निघतात. ह्या प्रसंगी पळून जाण्याची संधी असूनही टॉम आपले मालक अडचणीत येऊ नयेत म्हणून ती संधी घेत नाही. त्यामुळे तो गुलामांच्या एका व्यापार्याला विकला जातो. त्यानंतरच्या जलप्रवासात तो सेंट क्लेअर ह्या व्यक्तीच्या ईव्हा ह्या मुलीचा जीव वाचवतो. त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून सेंट क्लेअर त्याला विकत घेतो. त्या कुटुंबात टॉमचे दिवस सुखाचे जातात; परंतु ईव्हाचे आजारामुळे होणारे मरण आणि सेंट क्लेअरचा अपघातात झालेला मृत्यू ह्यांमुळे टॉमचा त्या कुटुंबाशी संबंध संपतो. त्यानंतर सायमन लेग्री हा क्रूर प्रवृत्तीचा माणूस टॉमला एका लिलावात विकत घेतो. टॉमची धार्मिक श्रद्धेतून आलेली असामान्य सहनशक्ती आणि धैर्य ह्यांमुळे लेग्री भयग्रस्त होतो. त्याच्या त्या मनःस्थितीचा फायदा घेऊन लेग्रीकडे असलेल्या दोन गुलाम स्त्रिया पळून जाण्याचे ढोंग करतात आणि लपून बसतात. त्या कोठे लपल्या आहेत, असे लेग्री टॉमला विचारतो. टॉम सांगण्यास नकार देतो. त्यामुळे संतापलेला लेग्री त्याला चाबकाने फोडतो आणि ह्या मारामुळे टॉम मरण पावतो.
ह्या कादंबरीवर विरोधकांनी जे आक्षेप घेतले त्यांना हॅरिएटने द की टू अंकल टॉम्स केबिन (१८५३) हे पुस्तक लिहून उत्तर दिले. गुलामगिरीच्या संदर्भात तिने जमवलेल्या अनेक कागदपत्रांचा आधार आपल्या उत्तरांच्या समर्थनार्थ दिला. १८५३ मध्ये तिने यूरोपला भेट दिली. इंग्लंडमध्ये तिची प्रशंसा झाली; पण नंतर तेथील लोकमत तिच्या विरुद्ध गेले. त्याला कारण १८६९ मध्ये एका मासिकात प्रसिद्ध झालेला ‘द ट्रू स्टोरी ऑफ लॉर्ड बायरन्स लाइफ’ हा तिचा लेख. ह्या लेखात बायरनचे त्याच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते, असा आरोप तिने केला होता. ड्रेड : ए टेल ऑफ द ग्रेट डिस्मल स्वॉम्प (१८५६) हे पुस्तक लिहून तिने गुलामगिरीच्या पायावर उभ्या राहिलेल्या समाजाचा र्हास चित्रित केला. त्यानंतर तिने केलेल्या लेखनात द मिनिस्टर्स वूइंग (१८५९) ही कादंबरी उल्लेखनीय आहे. तिने काही धार्मिक कविताही लिहिल्या.
हार्टफर्ड, कनेक्टिकट येथे ती निधन पावली.
संदर्भ :
- Birdoff, Harry, The World’s Greatest Hit : Uncle Tom’s Cabin, 1947.
- Forrest, Wilson, Crusader in Crinoline : The Life of Harriet Beecher Stowe, 1941.