भारतात ब्रह्मकमळ या नावाने प्रामुख्याने दोन वनस्पती ओळखल्या जातात. त्या वनस्पतींची शास्त्रीय नावे एपिफायलम ऑक्सिपेटॅलम आणि सॉसरिया ओब्व्हॅलाटा अशी आहेत.
एपिफायलम ऑक्सिपेटॅलम : ही वनस्पती कॅक्टेसी कुलातील आहे. ती मूळची मध्य अमेरिकेतील असून भारतात तिची लागवड सर्वत्र केलेली दिसून येते. ती एखाद्या वनस्पतीचा किंवा वस्तूचा आधार घेऊन २-३ मी. उंच वाढते. मुळे खोलवर जातात. जुने झालेले खोड गोलसर व राखाडी-हिरवे असते. नवीन खोड चपटे, १–५ सेंमी. रुंद, हिरवे व पानासारखे दिसते. त्याच्या पेरावरील बेचक्यांतून नवीन फांद्या येतात. पाने छोट्या काट्यांमध्ये रूपांतरित झालेली असतात. पानासारख्या दिसणाऱ्या खोडावर पावसाळ्यात मोठी, पांढरी, सुगंधी व एकेकटी फुले येतात. ती मध्यरात्री उमलतात व सूर्योदयापूर्वी मावळतात. म्हणून त्या वनस्पतीला चंद्रकमळ असेही म्हणतात. फुलांच्या नळीचा व त्यांवरील काही बाह्यदलांचा म्हणजेच पाकळ्यांचा रंग लालसर तपकिरी असतो. आतील पाकळ्या नाजूक, लांबट व पांढऱ्या असतात. फुलांचा व्यास १५–२० सेंमी. असतो. पुंकेसर असंख्य असतात. कुक्षीवृंत हिरवट पांढरे किंवा पांढरे असते. फळ मोठे व मांसल असून त्याच्या गरामध्ये बिया असतात. खोडाच्या तुकड्यापासून तसेच बियांपासून पुनरुत्पादन होते. सुंदर व सुवासिक फुलांमुळे तिची लागवड शोभिवंत वनस्पती म्हणून बागेत करतात. फुलातील सुगंध बेंझील सॅलिसिलेट या कार्बनी संयुगामुळे असतो.
सॉसरिया ओब्व्हॅलाटा : ही वनस्पती ॲस्टरेसी कुलातील आहे. ती मूळची हिमालय, उत्तर प्रदेश, दक्षिण म्यानमार आणि नैर्ऋत्य चीन येथील आहे. हिमालयात ती समुद्रसपाटीपासून सु. ४,५०० मी. पेक्षा अधिक उंचीवर आढळते. ती सु. ३० सेंमी.पेक्षा अधिक उंच वाढते. फुले लहान व पांढऱ्या मोठ्या सहपत्रांनी आच्छादलेली असून सहपत्रे बोटीच्या आकाराची असतात. या फुलाला उत्तराखंड राज्याने राज्यफुलाचा दर्जा दिलेला आहे. १९८२ मध्ये भारतीय टपाल खात्याने या फुलाचे तिकीट काढले आहे.
काही वेळा कमळ (निलंबो न्युसीफेरा) या वनस्पतीलाही ब्रह्मकमळ म्हटले जाते.