साठे, शंकर भाऊ : (२६ ऑक्टोबर १९२५ – ११ मार्च १९९६). महाराष्ट्रातील शाहीर व साहित्यिक. अण्णाभाऊ साठे यांचे कनिष्ठ बंधू म्हणून शंकर भाऊ साठे हे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. तसेच ते शाहीर व साहित्यिक म्हणूनही सुपरिचित आहेत. वाटेगाव जि. सांगली येथे शंकरभाऊंचा साठे कुटुंबात जन्म झाला. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले नाही. अण्णाभाऊ साठे यांच्याकडून लेखनप्रेरणा घेऊन फुले-शाहू-आंबेडकरांच्या साहित्य व चळवळीचा वसा व वारसा अण्णाभाऊंच्या नंतर शंकर भाऊंनी चालवला. शंकर भाऊंनी १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.
लाल बावटा व अण्णाभाऊ साठे कला पथकातून त्यांनी शाहीर म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांबरोबरच भारताच्या बहुतांशी भागात समाज परिवर्तनासाठी जनजागृती केली. साहित्यलेखन, अंधश्रध्दानिर्मूलन, अस्पृश्यता निवारण, दारूबंदी इत्यादी प्रबोधनात्मक उपक्रमाबरोबरच भारतीय कम्प्युनिष्ट पक्ष, काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष इत्यादी संस्थांशी त्यांचा जवळून संबंध आला.
माझा भाऊ अण्णाभाऊ (१९८०) हे त्यांचे आत्मकथनात्मक चरित्र प्रसिध्द आहे. अण्णाभाऊंचे जीवन आणि कार्य समजून घ्यायला हे आत्मपर लेखन महत्त्चाचे आहे. एकच काडतूस (१९८४), सूड (१९८५), सगुणा (१९८६), घमांडी (१९८६), सावळा (१९८६),जग (१९८६), लखू (१९८७), बायडी (१९९१), सुगंधा (१९९१), बाजी (१९९१), काळा ओढा इत्यादी कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यापैकी शामगाव या कादंबरीची काही पाने जिर्णावस्थेत उपलब्ध आहेत. यातील दोन कादंबऱ्यांची माहिती उपलब्ध नाही. शंकर भाऊंनी अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीवर आधारीत फकिरा या मराठी भाषेतील चित्रपटात फकिराच्या एका दरोडेखोर साथीदाराची भूमिका केली होती. शंकरभाऊंनी केवळ मनोरंजनासाठी, दैववादी, कर्मकांडावर आधारीत लेखन न करता वास्तववादी, सामान्य माणसांच्या कार्यकर्तृत्वावर लिहिले. अन्यायाविरूध्द बंड करणाऱ्या, प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न, लढावू माणसांवर, त्याच्या जीवननिष्ठेवर लिहिले. अन्यायाची चीड, शोषितांच्या विषयी हृदयात आपुलकी, वास्तव कथानक, प्रभावी घटना-प्रसंग, विचारप्रवण संवाद, विषम समाजव्यवस्थेवर घणाघाती प्रहार, हे त्यांच्या कादंबरी लेखनाचे विशेष नोंदवता येतील. त्यांनी रेखाटलेल्या नायक-नायिका ह्या बंडखोर, कष्टाळू, धाडसी, करारी बाण्याच्या, आपल्या भावनांना आवर घालणाऱ्या तसेच मानवी जीवनमूल्ये जोपासणाऱ्या आहेत.
संदर्भ : गायकवाड शरद, अण्णाभाऊंचा भाऊ शंकर भाऊ साठे, कोल्हापूर, २०१७.