आलंबन या शब्दाचा सामान्य अर्थ म्हणजे ज्याच्या आश्रयाने वस्तू स्थिर राहते, ते स्थान होय. योगदर्शनामध्ये ‘ध्यान किंवा समाधीमध्ये चित्त ज्या विषयावर एकाग्र असते’, त्या विषयाला आलंबन अशी संज्ञा आहे.

समाधि ही दोन प्रकारची सांगितलेली आहे – सम्प्रज्ञात व असम्प्रज्ञात. असम्प्रज्ञात समाधीमध्ये सर्व वृत्तींचा निरोध होतो, त्यामुळे चित्ताला कोणतेच आलंबन नसल्यामुळे कोणत्याही विषयाचे ज्ञान होत नाही. परंतु, सम्प्रज्ञात समाधीमध्ये सत्त्वगुणाच्या प्रभावामुळे चित्त एखाद्या विशिष्ट विषयावर स्थिर होते व ते ज्या विषयावर एकाग्र आहे त्या विषयाचे यथार्थ व संपूर्ण ज्ञान (सम्प्रज्ञान) पुरुषाला (आत्म्याला) प्राप्त करवून देते. ज्या विषयावर चित्त एकाग्र होते, त्या विषयाला सम्प्रज्ञात समाधीचे आलंबन असे म्हणतात.

सम्प्रज्ञात समाधीचे वितर्क, विचार, आनन्द आणि अस्मिता या रूपांनी चार भेद होतात. कोणताही साधक साधनेच्या प्रारंभीच्या काळात पुरुष किंवा प्रकृति अशा सूक्ष्म आलंबनांवर ध्यान करू शकत नाही. कारण, अशा सूक्ष्म विषयांवर स्थिर होण्याची योग्यता तेव्हा चित्तामध्ये नसते. त्यामुळे क्रमश: ध्यानाचे आलंबन स्थूल विषयापासून सूक्ष्म विषयापर्यंत नेत योगी चैतन्यस्वरूप पुरुषाला ध्यानाचे आलंबन बनवतो. सुरुवातीला वितर्क समाधीमध्ये स्थूल विषय म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेला विषय चित्ताचे आलंबन असतो. विचार समाधीमध्ये सूक्ष्म तन्मात्र आलंबन असतात. आनन्द समाधीमध्ये ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, मन, अहंकार व बुद्धी यांपैकी कोणतेही एक तत्त्व चित्ताचे आलंबन असते. अस्मिता समाधीमध्ये बुद्धीशी संयोग असलेला चैतन्यस्वरूप पुरुष हा ध्यानाचे आलंबन असतो. अशाप्रकारे चित्त वेगवेगळ्या विषयांना ध्यानाचे किंवा समाधीचे आलंबन बनवते.

क्षिप्त, मूढ आणि विक्षिप्त या तीन अवस्थांमध्येही चित्ताच्या वेगवेगळ्या वृत्ती असतात. परंतु, या अवस्थांमध्ये चित्त ज्या विषयांचा आकार घेते, त्यांना आलंबन असे म्हणत नाहीत. कारण क्षिप्त अवस्थेत रजोगुणाचे आधिक्य असते, त्यामुळे चित्त कोणत्याही विषयावर स्थिर होत नाही. तसेच मूढ अवस्थेत तमोगुणाचे आधिक्य असते त्यामुळे चित्त वस्तूचे यथार्थ ज्ञान करवून देत नाही. विक्षिप्त अवस्थेमध्ये रजोगुण व कधी कधी सत्त्वगुणाचे आधिक्य असते. त्यामुळे क्वचित चित्त स्थिर होते, परंतु या अवस्थेतही चित्त ज्या विषयाचा आकार घेते त्या विषयाला आलंबन म्हणत नाहीत. कारण चित्ताची होणारी स्थिरता ही प्रासंगिक असते. केवळ एकाग्र अवस्थेत ज्या विषयावर चित्त स्थिर होते, त्यालाच आलंबन असे म्हणतात.

पहा : असम्प्रज्ञात समाधि, चित्त, चित्तभूमी, सम्प्रज्ञात समाधि.

समीक्षक : कला आचार्य