अल्काझी, इब्राहिम : (१८ ऑक्टोबर १९२५ – ४ ऑगस्ट २०२०). आधुनिक भारतीय नाट्यसृष्टीत मूलभूत कार्य करणारे रंगकर्मी आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक. इब्राहिम यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील हे सौदी अरेबियातील मसाल्याचे व्यापारी होते. तर आई मूळची कुवेतची होती. फिरस्तीच्या व्यवसायामुळे हे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. या दांपत्याच्या नऊ अपत्यांपैकी इब्राहिम हे एक होते. इब्राहिम यांच्या घरातील सांस्कृतिक वातावरणामुळे त्यांची नाटकाची आवड जोपासली गेली. त्यांचे शालेय शिक्षण पुणे येथे सेंट व्हिन्सेंट महाविद्यालयातून इंग्रजी माध्यमातून झाले. पण इंग्रजीसोबतच घरातील अरबी भाषा आणि वास्तव्याच्या ठिकाणची मराठी भाषा याही त्यांनी चांगल्या अवगत केल्या. पुढील शिक्षणाकरिता त्यांनी मुंबईच्या सेंट झेविअर्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण पदवीचा अभ्यासक्रम मध्येच सोडून ते नाटकाच्या ओढीने लंडनला गेले. तेथे त्यांनी ‘रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स’ या लंडनमधील संस्थेतून नाट्यशास्त्रातील पदवी घेतली (१९४७). फाळणीनंतर अल्काझींचे कुटुंब पाकिस्तानात गेले. मात्र इब्राहिम अल्काझी लंडनमधून भारतात परतले. ते मुंबईत पद्मसींच्या ‘थिएटर ग्रूप’ या नाट्यसंस्थेत सामील झाले. तेथे त्यांना नाटकासंबंधी अधिक काम करण्याची संधी मिळाली. या संस्थेकडून काही नाटकेही त्यांनी दिग्दर्शित केली. या संस्थेत फूट पडल्यानंतर त्यांनी ‘थिएटर युनिट’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली (१९५४). या संस्थेतर्फे त्यांनी अनेक इंग्रजी व हिंदी नाटकांचे प्रयोग रंगभूमीवर केले. ते भारतातील ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ या समूहातील प्रागतिक विचारसरणीच्या चित्रकारांच्या संपर्कात आले. अल्काझींना त्यांच्या आधुनिक प्रायोगिक नाटकांच्या नेपथ्यामध्ये या मंडळींचे सहकार्य मिळाले.
दिल्लीमध्ये १९५९ मध्ये ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय’ या संस्थेची (National School of Drama) स्थापना झाली होती. या संस्थेचे संचालक म्हणून इब्राहिम अल्काझी यांना बोलाविण्यात आले (१९६२). भारतातील ही राष्ट्रीय स्तरावरील मोठी संस्था म्हणून नावारूपास येण्याकरिता त्यांनी अनेक प्रयत्न केले. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांकरिता तीन वर्षांचा नाट्यपदविका अभ्यासक्रम तयार केला. यामध्ये त्यांनी भारतीय नाट्यशास्त्र आणि पाश्चिमात्य नाट्यसंस्कृती यांची सांगड घातली होती. या कालावधीत त्यांनी संस्थेत अनेक प्रयोग केले. विद्यार्थांकडून त्यांनी संस्कृत आणि इतर भारतीय भाषांमधील नाटके हिंदीमध्ये रूपांतरित करवून घेतली आणि त्याचे प्रयोग केले. भारतीय नाटकांबरोबरच ग्रीक शोकांतिका, तसेच ख्यातकीर्त यूरोपियन रंगकर्मींची नाटके रूपांतरित करून विद्यार्थ्यांकडून बसवून घेतली. बेर्टोल्ट ब्रेख्तलिखित नाटकांचे प्रयोग करण्याकरिता त्यांनी प्रसिद्ध अमेरिकन नाटककार कार्ल वेबर आणि जर्मन नाटककार फ्रिट्झ बेनेव्हिट्झ यांना भारतात बोलावले आणि त्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांकडून नाटके बसवून घेतली. राष्ट्रीय नाट्य विद्यालयात भारतातल्या विविध प्रांतातील विद्यार्थी आपापल्या भाषेतील नाटकांच्या प्रभावासहित तेथे येत असत. त्यांना भारतीय व जागतिक रंगभूमीची ओळख आणि आवाका याचा परिचय करून देण्याचे काम तेथील अभ्यासक्रमामुळे झाले. नाटकांची गुणवत्ता ठरविताना त्याचे मापदंड काय असावेत, त्यांचे मोजमाप कसे करावे याची कार्यपद्धती त्यांनी निश्चित केली. १९७७ मध्ये त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. १५ वर्षे ते या संस्थेचे संचालक होते. पुढे त्यांनी दिल्लीमध्ये त्यांनी पत्नी रोशन यांच्यासोबत ‘आर्ट हेरिटेज’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कलाकृती, संग्रहातील पुस्तके आणि छायाचित्रे जतन केलेली आहेत. तसेच येथे नाट्यप्रशिक्षणाचे कार्यही सुरू ठेवले.
अल्काझींनी जपानी काबुकी या नाट्यप्रकाराचे प्रयोगही भारतात केले. भारतात आणि परदेशातही अनेक नाट्यकार्यशाळा ते घेत असत. भारतीय लोकधर्मी नाट्य आणि आंतरराष्ट्रीय कलात्मक अभिरूची याचा मिलाफ त्यांनी त्यांच्या नाटकांतून केला. दिल्लीत त्यांनी खुल्या रंगमंचावर नाट्यप्रयोग करण्याची सुरुवात केली. त्यांनी दिग्दर्शित केलेली धर्मवीर भारती लिखित अंधायुग (१९५३), मोहन राकेश लिखित आषाढ का एक दिन (१९५८), आणि गिरीश कर्नाड लिखित तुघलक (१९६४) इत्यादी नाटके गाजली. प्रसिद्ध लेखक महेश एलकुंचवारांच्या वाडा नाट्यत्रयीच्या सुरुवातीच्या दोन हिंदी रूपांतरित भागांचे नाट्यप्रयोगही अल्काझींनी केले. त्यांनी पन्नासहून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले. यामध्ये शेक्सपियरच्या अनेक नाट्यरूपांतरांचा देखील समावेश आहे. अल्काझींना चित्रकलेत आणि शिल्पकतेही रस होता. त्यांनी जमवलेल्या आधुनिक चित्र-शिल्पांचे प्रदर्शनही त्यांनी मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीत भरविले होते. संगीतकलेचेही ते चिकित्सक अभ्यासक होते.
अल्काझी यांचा विवाह रोशन अल्काझी (पूर्वाश्रमीच्या रोशन पद्मसी) यांच्याशी झाला. रोशन अल्काझी या नामवंत वेशभूषाकार होत्या. अल्काझींच्या नाटकातील वेशभूषेचा भाग त्या सांभाळत असत. या दांपत्यास दोन मुले. त्यांची मुलगी अमाल अल्लाना या ख्यातनाम वेशभूषाकार आणि नाट्यदिग्दर्शक आहेत. तर त्यांचे सुपुत्र फैसल अल्काझी हे ही ख्यातकीर्त नाट्यदिग्दर्शक आहेत.
अल्काझी यांना अनेक मानसन्मान लाभले. भारत शासनाने त्यांना पद्मश्री (१९६६), पद्मभूषण (१९९१), पद्मविभूषण (२०१०) या पुरस्कारांनी गौरविले. १९८८ साली कालिदास पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता, तसेच त्यांना संगीत नाटक अकादमीची अधिछात्रवृत्तीही देण्यात आली. २००३ मध्ये त्यांना उत्तुंग जीवन कला योगदान पुरस्कार देण्यात आला. ख्यातनाम अभिनेते श्रीराम लागू यांच्या रूपवेध प्रतिष्ठानकडून पहिला ‘तन्वीर सन्मान’ अल्काझी यांना देण्यात आला (२००४).
अल्काझी यांनी अनेक कलाकारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या शिष्यांमध्ये नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, विजया मेहता, बलराज पंडित, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, सुहास जोशी, बी. जयश्री, पंकज कपूर, जयदेव आणि रोहिणी हट्टंगडी, कमलाकर सोनटक्के इत्यादी दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
अल्काझी यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले.