कोकिन वाकाश्यु : (कोकिनश्यु). हेइआन कालखंडामध्ये केलेले प्राचीन व हेइआन काळात केलेल्या जपानी कवितांचे संकलन. म्हणून त्याच्या नावातच प्राचीन आणि वर्तमान अशा अर्थाच्या कांजी (चिनी अक्षरे) आहेत. त्या कालखंडामध्ये सम्राटांच्या आज्ञेवरून ग्रंथांचे संकलन होत असे. सम्राट उदा ह्यांनी वाका हा काव्यप्रकार संकलित करण्याची आज्ञा दिली. वाका हा काव्य प्रकार म्हणजे जपानी कविता होत. त्यांच्या कालखंडामध्ये मात्र हा उपक्रम पूर्ण होऊ शकला नाही. त्यांच्या पुत्राने सम्राट दाइगोने राजदरबारातल्या चार कवींना हा उपक्रम पूर्ण करण्यास सांगितले. हे चार राजकवी म्हणजे किनो त्सुरायुकी, किनो तोमोनारी, ओशिकोउचिनो मित्सुने व मिबुनो तादामिने होत. त्यांनी इ.स. ९१५ ते ९२० च्या सुमारास ११११ कवितांचे संकलन केले. नारा कालखंडामध्ये कविता लिहिण्यासाठी चिनी लिपीचा उपयोग केला जात असे. हेइआन कालखंडामध्ये जपानी साहित्यावर असलेला चीनचा प्रभाव कमी झाला आणि जपानी साहित्यकृतींची निर्मिती केली गेली.
सम्राटाच्या आज्ञेवरून वाका कवितांचे संकलन केले गेले. वाका कवितांमध्ये छोट्या कविता म्हणजे तांका, मोठ्या कविता म्हणजे च्योका, बुद्धावरच्या कविता म्हणजे बुस्सोसेकिका आणि कवितेचा पहिला भाग वापरुन बनविलेल्या कविता म्हणजे सेन्दोका यांचा समावेश होतो. हळूहळू तांका सोडून बाकीचे प्रकार वापरणे कमी होत गेले आणि वाका म्हणजेच तांका असे समीकरण बनले. तांका मध्ये ५-७-५-७-७ अशी ३१ अक्षरे असतात. ह्या संकलनामध्ये मुख्यत: तांका हा काव्य प्रकार बघायला मिळतो. ह्यांची रचना नारा कालखंडामधील मानयोश्यु ह्या संकलित काव्यग्रंथासारखीच असून कविता २० खंडांमध्ये विभागलेल्या आहेत. त्या मुख्यत: निसर्ग आणि प्रेम ह्या दोन विषयांशी निगडीत आहेत. प्रत्येक खंडामध्ये एकाच विषयावर आधारित कवितांचे संकलन केले आहे. उदाहरणार्थ, पहिल्या खंडामध्ये वसंत ऋतुच्या कवितांना भाग १ असे म्हटले आहे. निसर्ग ही मध्यवर्ती कल्पना असलेल्या ह्या कविता आणि आजच्या हाइकु यामध्ये समान धागा दिसतो. तसेच ह्या कालखंडामधील तांका पुढच्या काळातील कवितांसाठी उपयुक्त ठरल्या आहेत. ह्या संकलनामध्ये वर दिलेल्या कवींव्यतिरिक्त अजून ६ कवींचा हातभार लागला आहे. त्यांना रोक्कासेन असे म्हटले जाते. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – आरिवारानो नारिहिरा, ओनोनो कोमाची, किसेनबोशी, बुनयानो यासुहिदे, सोज्यो हेंज्यो, ओतोमोनो कुरोनुशी.
कोकिन वाकाश्युची प्रस्तावना चिनी लिपी आणि जपानी लिपीमध्ये दिली आहे. प्रस्तावना चिनी लिपीमध्ये देण्याचा नियम होता, तरीही यात पहिल्यांदाच जपानी लिपीमध्ये प्रस्तावना लिहिली आहे. किनो त्सुरायुकिने ह्या जपानी प्रस्तावनेमध्ये कवितांचे समीक्षण कसे करावे, कोणते शब्द वापरावे इ. गोष्टींचा उल्लेख केला आहे. तो पुढच्या साहित्यकृतींच्या समीक्षणासाठी अतिशय मोलाचा ठरला आहे. किनो त्सुरायुकिने वर उल्लेख केलेल्या ६ कवींची वैशिष्टे सुद्धा प्रस्तावनेमध्ये लिहिली आहेत. आपल्या प्रस्तावनेमध्ये त्सुरायुकी म्हणतो कि यामातो(जपानचे पूर्वीचे नाव)च्या कविता म्हणजे मनुष्याच्या हृदयातून उमटलेल्या भावनांची अभिव्यक्ती आहे. ह्या जगामध्ये जगताना माणसाला वेगवेगळ्या घटनांना सामोरे जावे लागते. त्या वेळी जे जाणवते, डोळ्यांना दिसते, कानांना एकू येते, ते सर्व शब्दांच्या माध्यमातून लिहिले जाते. फुलांमध्ये किलबिल करणारा पक्षी, पाण्यात राहणाऱ्या बेडकाचा आवाज, जिवंत माणसे सगळेच कवितारूपी गाणे म्हणत असतात. शक्तीचा वापर न करता जमीन आकाश हलवू शकणे, डोळ्याला दिसत नसलेल्या आत्म्याला हेलावून सोडणे, स्त्री- पुरुष तसेच साहसी सामुराई योद्ध्यांच्या मनाला दिलासा देऊ करण्याची शक्ती या कवितांमध्ये आहे.
“मनुष्य हृदय कधी बदलेल सांगता येत नाही परंतु माझ्या जन्मगावाच्या फुलांचा गंध मात्र पूर्वीचाच आहे.”
अशा आशयपूर्ण कविता यामध्ये आहेत. या संकलनामध्ये व्यवस्थित रचना केलेली दिसते. त्याप्रमाणे प्रत्येक कवितेनंतर खंडाचे नाव, क्रमांक, कविता क्रमांक आणि कवी अथवा कवयित्रीचे नाव अशी सविस्तर नोंद आहे. किनो त्सुरायुकी हा कोकिन वाकाश्युचा महत्वाचा कवी आहे. त्याने केलेल्या कवितांची रचना अतिशय उत्कृष्ट असून शब्दकौशल्य वाखणण्यासारखे आहे. त्याने वापरलेल्या शब्दांमधून त्याची उच्च दर्जाची अभिरुची दिसून येते. किनो त्सुरायुकी हा कवी तसेच लेखक म्हणून पण प्रसिद्ध आहे. ओशिकोउचिनो मित्सुनेच्या कविता सौंदर्यदृष्टी असलेल्या असून त्याच्या शब्दात निसर्ग डोळ्यासमोर उभे करण्याची ताकद आहे. त्याच्या कवितांमधून त्याच्या विद्वत्तेचे आकलन होते. मिबुनो तादामिनेच्या कविता सौम्य आणि शांत असून काव्य रचनेच्या दृष्टीने उत्कृष्ट आहेत. आरिवारानो नारिहिराच्या कवितेमधून भावनांची उत्कटता अनुभवास येते. ओनोनो कोमाची ही अतिशय सुंदर म्हणून प्रसिद्ध असलेली कवयित्री. स्त्री मनाचा सुंदर आविष्कार त्यांच्या कवितेमधून दिसून येतो.
संदर्भ :
- https://www.britannica.com
- https://www.study.com
- https://www.wakapoerty.net
समीक्षक : निसिम बेडेकर