अग्निहोत्री, द. ह. : ( ०३ जुलै १९०२ – २२ नोव्हेंबर १९९० ). कोशकार, भाषाशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक. एम.ए. बी.टी.आणि पी.एच्.डी. हे उच्चशिक्षण प्राप्त केल्यानंतर त्यांनी अमरावती, बुलढाणा, नेर (परसोपंत) येथे विविध महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालयात (आजचे लोकमान्य टिळक महाविद्यालय) १९६१ ते १९६५ या काळात ते प्राचार्य होते. द. ह.अग्निहोत्री यांची ग्रंथनिर्मिती – मराठी वर्णोच्चार विकास (१९६३), महाराष्ट्र संस्कृतीचे तात्त्विक अधिष्ठान (१९७७), अभिनव मराठी – मराठी शब्दकोश  खंड एक ते पाच (१९८३ ते १९८५).

मराठी वर्णोच्चार विकास  या त्यांच्या पीएचडीच्या प्रबंधाचे १९६३ मध्ये विदर्भ साहित्य संघाने ग्रंथरूप प्रकाशित केले. त्यानंतर १९७७ मध्ये महाराष्ट्र संस्कृतीचे तात्त्विक अधिष्ठान  हा त्यांचा ग्रंथ नागपूर येथील सुविचार प्रकाशन मंडळाने प्रकाशित केला. द.ह.अग्निहोत्री यांचा मराठी वर्णोच्चार विकासावरील प्रबंध ही मराठीतील भाषाशास्त्र विषयक साहित्याला एक उपयुक्त देणगी होय असे मत वि.भि. कोलते यांनी या ग्रंथाविषयीच्या अभिप्रायात नमूद केले आहे. मराठी वर्णमालेतील अ पासून ज्ञ पर्यंत अनेक वर्णांच्या उच्चाराचा यादवकाळापासून आधुनिक काळापर्यंतचा विकास या ग्रंथात सप्रमाण दाखविलेला आहे. त्यासाठी सुमारे सात हजार शब्दांचे विश्लेषण केले आहे. या ग्रंथात मराठी भाषेची ध्वनिशिक्षा, मराठीतील आघात व मराठीची ध्वनिव्यवस्था या तीन गहन विषयांवर प्रथमच सविस्तर साधार चर्चा केली असून मराठीतील स्वरांचे व्यंजनांचे उच्चारदृष्ट्या वर्गीकरण-विश्लेषण केलेले आहे. मराठी भाषेचा फारसी, इंग्रजी या भाषांसह गुजराती, हिंदी, ओडिया, तेलुगू ,कन्नड या भाषांशी आलेल्या संबंधाविषयीचेही विश्लेषण या ग्रंथात केले आहे. ग.त्र्यं देशपांडे यांनी, हा ग्रंथ व्युत्पत्तिशास्त्रातील एका अंगाशी प्राधान्याने संबद्ध आहे. प्रचलित भारतीय भाषांतील शब्दांच्या व्युत्पत्तीचा शास्त्रीय विचार करताना दोन शाखा होतात. अर्थापभ्रंश ही एक शाखा व रूपापभ्रंश ही दुसरी शाखा. आतापर्यंतचे मराठीतील व्युत्पत्तिग्रंथ प्राधान्याने अर्थापभ्रंश या शाखेत मोडतात. अग्निहोत्री यांचा प्रस्तुत ग्रंथ सर्वस्वी रूपापभ्रंश या शाखेत मोडणारा आहे. मराठीपुरता तरी या शाखेचा हा पहिलाच ग्रंथ आहे, असे या ग्रंथाचे वैशिष्ट्य अभिप्रायात नमूद केले आहे. हा ग्रंथ भाषाशास्त्र, बोलींचा असल्यास, व्युत्पत्तींचे व शब्दांचे अध्ययन यांकरिता महत्त्वाचे संदर्भ देणारा आहे. मराठी वर्णोच्चाराचा विकास स्थलपरत्वे आणि कालपरत्वे कसा झाला ते या ग्रंथात सप्रमाण व साधार नमूद केले आहे. महाराष्ट्र संस्कृतीचे तात्त्विक अधिष्ठान या ग्रंथात इतिहासपूर्व प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या महाराष्ट्र संस्कृतीच्या स्वरूपाची, विकासाची, जडणघडणीची मीमांसा केली आहे. या ग्रंथात एकूण आठ प्रकरणे असून या प्रकरणांत इ.स.पूर्व पाच हजार वर्षांपासून ते १९४७ पर्यंतच्या काळातील महाराष्ट्र प्रदेश, त्याचा इतिहास, त्याची संस्कृती आदींच्या विकासाची, जडणघडणीची पाहणी व विश्लेषण केले आहे. मराठी समाजजीवनाच्या सांस्कृतिक जडणघडणीचे तात्त्विक अधिष्ठान शोधणारा हा ग्रंथ होय.

अभिनव मराठी – मराठी शब्दकोशाचे पाच खंड आहेत. हा कोश व्हिनस प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. शब्दांचे प्रचलित प्रमाण उच्चार, शब्दांची व्युत्पत्ती, व्याकरण विशेष, अर्थ, अशी मीमांसा केली आहे. एकूण २६ परिशिष्टे असणाऱ्या या शब्दकोशाच्या पहिल्या खंडात ‘आदर्श मराठी शब्दकोश कसा असावा’, ‘प्रमाणित मराठी शब्दांचे उच्चार’, ‘मराठीच्या प्रमुख बोली व त्यांची वैशिष्ट्ये’  हे तीन निबंध आहेत. शब्दांचे प्रचलित व प्रमाण उच्चार त्यांची व्युत्पत्ती व व्याकरणविशेष, शब्दांचे विविध संदर्भानुसार अर्थ, विविध बोलींतील शब्दांचे अर्थ असे अनेक संदर्भांचे विश्लेषण या अभिनव मराठी मराठी शब्दकोशात केले आहे. हा अभिनव शब्दकोश भाषा आणि साहित्याच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे. अग्निहोत्री यांचे मराठी वर्णोच्चार विकास, व्युत्पत्तिशास्त्र, शब्दांचे अर्थ व व्याकरणविशेषांचे विश्लेषण हे भाषाशास्त्रीय कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. तसेच वेदकालापासून आधुनिक काळापर्यंतच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यावरणाचा त्यांनी घेतलेला साधार वेध आणि संस्कृतिविषयक तत्त्वांचे विश्लेषण समाजविज्ञान, संस्कृतीशोध आदी ज्ञानशाखांच्या संदर्भात महत्त्वाचे आहे.

संदर्भ : गणोरकर, प्रभा, डहाके, वसंत, आबाजी आणि अन्य (संपा), संक्षिप्त मराठी वाङमयकोश (१९२०-२००३), मुंबई, २००४.