संस्कृत भाषेच्या विश्लेषणाचा आणि वर्णनाचा उगम : वैदिकग्रंथांच्या अचूक उच्चारणाकडे फार पूर्वीपासून काटेकोर लक्ष देण्यात आले आहे. वेदपाठी ब्राह्मण समूह प्रथम भारतीय उपखंडाच्या पश्चिमोत्तर प्रदेशातून आर्यावर्तात आणि पूर्वेकडे मगध – विदेहाकडे पसरले व नंतर त्यापैकी काही दक्षिणेकडे गेले. या भौगोलिक प्रवासात निरनिराळ्या प्रदेशांत स्थायिक होण्याच्या प्रक्रियेत या वेदपाठकांच्या मातृभाषा बदलत गेल्या व मौखिक पद्धतीने रक्षण करून ठेवलेल्या वैदिकग्रंथांच्या भाषेपासून वेदपाठकांच्या मातृभाषेचे अंतर क्रमाक्रमाने वाढतच गेले. हे अंतर जसे वाढले तसे वेदग्रंथांचे उच्चारण चुकीचे होण्याची शक्यता वाढत गेली. वेदग्रंथांचे स्वर नंतरच्या संस्कृत भाषेत आणि प्राकृत व देशभाषांमध्ये केव्हाच लुप्त झाले होते. वैदिक भाषेतील काही काही स्वर आणि व्यंजनेसुद्धा या इतर भाषांमध्ये आढळत नाहीत. आज देखील तोच वेदमंत्र मराठी, तामिळ व बंगाली वेदपाठकांनी म्हटलेला वेगळा वाटतो ; कारण या वेदपाठकांच्या मातृभाषांचा त्यांच्या पठनावर नकळत ठसा उठलेला असतो. असे चुकीचे उच्चारण होऊ नये व शुद्ध उच्चारण व्हावे या हेतूने प्राचीन विद्वानांनी ध्वनींचे विश्लेषण व वर्णन करण्याचे शास्त्र तयार केले व हे शास्त्र प्राचीन शिक्षा व प्रातिशाख्य ग्रंथांत दिसून येते. वैदिक भाषेच्या प्रत्येक ध्वनीचे उच्चारण होताना शरीरात काय काय प्रक्रिया कुठे कुठे होतात आणि या ध्वनींचे गुणधर्म कोणते याचे परिपूर्ण वर्णन या ग्रंथांत आहे. या सर्व प्रयत्नांचे फलरूप म्हणून वैदिक ग्रंथांचे पठन पाठन परंपरेत पूर्णत: जरी नाही तरी बऱ्याच अंशी संरक्षण झालेले आहे. तरी देखील काही प्रमाणात स्थानिक भाषांचा परिणाम वेदपठनावर दिसून येतोच.
वेदांच्या ध्वनिरूपाचे संरक्षण जरी पठन पाठनाच्या मौखिक परंपरेत बऱ्याच प्रमाणात झाले, तरी वेदांच्या अर्थाच्या ज्ञानाचे संरक्षण करण्यात फार अधिक अडचणी आल्या असे दिसते. वेदग्रंथांतील शब्दांच्या अर्थाचे ज्ञान होण्याच्या दिशेने प्राचीन काळी झालेले प्रयत्न यास्काचार्याच्या निरुक्त या ग्रंथात दिसतात. हा ग्रंथ सुमारे इसवीसनापूर्वी पाचव्या शतकात लिहिला गेला असावा. वेदातल्या शब्दांचा अर्थ कसा लावायचा याविषयीची मतमतांतरे यास्काने निरुक्तात उद्धृत केली आहेत. शब्दाच्या अर्थाचा आणि शब्दाच्या उत्पत्तीचा शोध कसा करावयाचा या संबंधीच्या शास्त्राच्या काही प्राथमिक पायऱ्या या ग्रंथातील चर्चेत आहेत. निघण्टु या वेदांतील शब्दांच्या प्राचीन यादीवर यास्काचार्यांनी लिहिलेले निरुक्त हे भाष्य आहे. यास्काचार्य निघण्टूच्या रचनेबद्दल सांगतात की वैदिक सूक्तांचे मूळ द्रष्टे ऋषी यांना विश्वातल्या सर्व वस्तूंच्या तात्त्विक गुणधर्मांचे साक्षात् ज्ञान होते व त्यांना हे जग आणि परलोक यांचेही परिपूर्ण ज्ञान होते. या मूळ ऋषींना त्यांच्या ध्यानावस्थेत वेद दिसले. या मूळ ऋषींनी अशा रीतीने मिळविलेले वेद पुढच्या पिढ्यांना दिले ; परंतु या पुढच्या पिढ्यांना मूळ ऋषींसारखे साक्षात् ज्ञान नव्हते. त्यांनी मौखिक परंपरेने हे वेद त्यांच्या पुढच्या पिढ्यांना दिले. या पुढच्या पिढीतल्या मंडळींनी वेदांच्या रक्षणाविषयीच्या काळजीतून निघण्टु नावाची वैदिक शब्दांची यादी तयार केली. वेदांचे पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरण करण्याच्या या परंपरेत निदान अर्थज्ञानाचा ह्रास कसा होत गेला याचे यास्काने केलेले वर्णन आधुनिक अर्थाने ऐतिहासिक जरी नसले, तरी यास्कासारख्या विद्वानांच्या प्राचीन काळीच या इतिहासा विषयीच्या कल्पना काय होत्या याचे निदर्शन आहे. अशा प्रकारच्या ह्रासाची कल्पना प्राचीन भारतात अनेक परंपरांमध्ये दिसून येते.
पदपाठ तयार करण्यापूर्वी वेदांचा अर्थ समजला पाहिजे असे यास्काला वाटते. शब्दांचे विश्लेषण करून त्यातून त्या शब्दाचा अर्थ शब्दाच्या घटकांच्या अर्थावरून ठरविण्याचा प्रयत्न यास्काच्या निरुक्तात केलेला दिसतो. अशा प्रकारचे व्युत्पत्तीचे काहीसे प्राथमिक प्रयत्न ब्राह्मण ग्रंथातच सुरू झालेले दिसतात. यास्काने हे तंत्र बऱ्याच प्रमाणात शास्त्रीय दिशेने नेले आहे. निघण्टु ही वेदातल्या काही नामांची यादी आहे, आणि त्या नामांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न निरुक्तात आहे. त्यामुळे क्रियापदांच्या अर्थापेक्षा नामांचे अर्थ कसे लावायचे याकडे यास्काचे लक्ष अधिक आहे ; परंतु क्रियापदांचे मूळ असलेल्या धातूंना काही तरी प्रत्यय लावून नामे तयार होतात असे यास्क आणि काही वैयाकरणांचे मत आहे. गार्ग्य नावाच्या आचार्याच्या मते सर्व नामांची उपपत्ती अशा प्रकारे धातूंपासून करता येत नाही. अशी विविध मते या निरुक्तात दाखविली आहेत. यास्काने केलेल्या व्युत्पत्ती-दर्शनाच्या प्रयत्नात काही प्रयत्न नियमात बसणारे वाटतात तर काही अगतिक प्रयत्न वाटतात. पण शेवटी यास्क म्हणतो की काही करून व्युत्पत्ती दाखविलीच पाहिजे, कारण अन्यथा शब्दाचा अर्थ कळण्याचा मार्गच बंद होईल. यास्क म्हणतो की अर्थ न कळता मंत्रपाठ करणे म्हणजे अग्नीवाचून लाकूड पेटवायला पाहाण्यासारखे व्यर्थ आहे. म्हणून वेदांचा अर्थ लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायला हवेत.
संदर्भ :
- Deshpande, Madhav M., Sanskrit & Prakrit Sociolinguistic Issues, Motilal Banarsidass, Delhi, 1993.
- Deshpande, Madhav M., Sociolinguistic Attitudes in India : An Historical Reconstruction, Ann Arbor (USA), Karoma Publishers, 1979.
Key Words: #संस्कृत भाषाविश्लेषणाचा उगम, #संस्कृत व्याकरण, #निरुक्तशास्त्र