दूरदर्शी: परावर्ती
परावर्ती प्रकारच्या दूरदर्शीमध्ये एक किंवा अधिक वक्र आणि सपाट आरशांच्या आधारे प्रकाश परावर्तित करून तयार झालेली प्रतिमा, भिंगे वापरून बनविलेल्या नेत्रिकेच्या सहाय्याने वर्धित करून पाहता येते.
इसवी सनाच्या सतराव्या शतकात, प्रचलित अपवर्ती दूरदर्शीद्वारे तयार होणाऱ्या प्रतिमांमध्ये असणाऱ्या रंगदोषावर (chromatic aberration) उपाय म्हणून, सर आयझॅक न्यूटन यांनी परावर्ती दूरदर्शीची निर्मिती केली.
मोठ्या आकाराचे परावर्ती आरसे बनविण्याची प्रक्रिया भिंगे बनविण्यापेक्षा तुलनेने सोपी आणि स्वस्त असल्यामुळे, या प्रकारची रचना वापरूनच मोठ्या आकाराच्या आणि पर्यायाने अधिक प्रकाश गोळा करू शकणाऱ्या, त्यामुळे अधिक विभेदनक्षमता (resolving power) असणाऱ्या दूरदर्शी निर्माण करणे शक्य झाले. सुप्रसिद्ध ‘हबल अवकाशीय दूरदर्शी’ (Hubble Space Telescope) ही दूरदर्शी परावर्ती प्रकारांमधीलच एका प्रकारची दूरदर्शी आहे.
न्यूटनच्या परावर्ती दूरदर्शीचा मुख्य आरसा (वस्तु-आरसा किंवा प्राथमिक आरसा) हा अंतर्वक्र आणि अन्वस्तीय (parabolic) प्रकारचा असून या आरशाचा पृष्ठभाग उच्च प्रतीच्या चांदीचा अथवा अॅल्युमिनियमचा पातळ मुलामा (लेप) दिलेला असतो. प्राथमिक आरसा त्यावर पडलेले प्रकाशकिरण दुय्यम आरशावर परावर्तित करतो. दुय्यम आरसा सपाट असून ४५ अंशात तिरपा बसवलेला असतो, त्यामुळे या सपाट दुय्यम आरशावरून प्रकाशकिरण ९० अंशात वळून दूरदर्शीच्या मुख्य नलिकेला लंबरूप बसवलेल्या एका छोट्या नळीच्या दिशेला परावर्तित होतात. या नळीच्या अवकाशात मिळणारी खरी प्रतिमा नळीच्या बाहेरच्या टोकाला बसवलेल्या नेत्रिकेच्या सहाय्याने पाहता येते. =>नेत्रिका विविध प्रकारच्या भिंगांच्या रचनांनी बनवलेल्या असतात. नेत्रिकेच्या सहाय्याने वर्धित पण आभासी प्रतिमा तयार होते, ती पाहता येते.
परावर्ती दूरदर्शीची वर्धनक्षमता ही प्राथमिक आरशाच्या केंद्रांतराच्या समप्रमाणात वाढते. परावर्ती दूरदर्शीमध्ये प्राथमिक आरशाची जागा दूरदर्शीच्या नळीत मागच्या बाजूला असून दुय्यम आरसा त्याच्या समोर विरुद्ध बाजूस असल्याने आणि मिळणारी खरी प्रतिमा आडव्या नळीत तयार होत असल्याने वाढीव केंद्रांतर (focal length) मिळविता येते, त्यामुळे वर्धनक्षमता देखील (अपवर्ती दूरदर्शीच्या तुलनेत) वाढीव मिळते.
मूळच्या न्यूटनच्या परावर्ती दूरदर्शींच्या संरचनेत कालानुरूप विविध बदल झाले असून, त्यानुसार परावर्ती दूरदर्शीचे प्रामुख्याने पुढील प्रकार प्रचलित आहेत:
१. ग्रेगोरियन दूरदर्शी : यामध्ये दोनही आरसे अंतर्वक्र असून विवृत्तीय (elliptical) दुय्यम आरशाच्या पुढ्यात अन्वस्तीय मुख्य आरशाद्वारे प्रतिमा तयार होते. ह्या प्रतिमेला दुय्यम आरसा पुन्हा मुख्य आरशाच्या दिशेनेच परावर्तित करतो, ज्यास मध्यभागी असलेल्या छिद्राद्वारे प्रतिमा मुख्य आरशामागे तयार होते, ती नेत्रिकेच्या सहाय्याने पाहता येते.
२. कासेग्रेन दूरदर्शी : यामध्ये दुय्यम आरसा बहिर्वक्र आणि अपास्तिक A(hyperbolic) असून ग्रेगोरियन दूरदर्शी प्रमाणेच नेत्रिकेची जागा असते. परंतु तयार झालेली प्रतिमा ही ग्रेगोरियन दूरदर्शीप्रमाणे सरळ उभी नसून न्यूटोनियन दूरदर्शीप्रमाणे उलटी असते.
३. कॉडे दूरदर्शी : यात दुय्यम आरशावरून आणखी एका तिसऱ्या सपाट आरशावरून प्रकाशकिरण वळविण्यात येतात. त्यामुळे एकूण नळीचा आकार जेवढा असतो, त्याच्या सुमारे तिप्पट केंद्रांतर मिळवता येते.
कासेग्रेन दूरदर्शीचे श्मिड्त-कासेग्रेन, माक्सूटोव-कासेग्रेन, रिट्चे-कासेग्रेन असे प्रमुख उप-प्रकार आहेत.
समीक्षक : आनंद घैसास