क्षहरात वंशाचा राजा नहपान याचा प्रसिद्ध प्राचीन कोरीव लेख. महाराष्ट्रातील नाशिक शहरापासून सु. ९ किमी. अंतरावर नैर्ऋत्य दिशेला त्रिरश्मी टेकडीवरील असलेल्या पांडव लेणी समूहात हा अभिलेख आहे. येथील लेणी क्र. १० मध्ये व्हरांड्याच्या मागील भिंतीवर छताच्या खाली पाच ओळींत कोरलेला हा अभिलेख दिसून येतो. दानपत्रात किंवा प्रस्तरलेखात राज्यकर्त्याच्या नावाने लेख लिहिण्याची तत्कालीन पद्धत असल्यामुळे राजा नहपानाचे नाव लेखात आले आहे. त्यामुळे हा लेख नहपानाचा जावई ऋषभदत्ताने (उषवदात) कोरविला असला, तरी नहपानाच्या नावाने ओळखला जातो. लेख ब्राह्मी लिपित असून अक्षरांचे वळण घवघवीत व ठाशीव स्वरूपाचे आहे. लेखाची अक्षरे जाड असून पूर्वी गोलाकार असलेली अक्षरे कोनयुक्त व कोनयुक्त अक्षरे गोलाकार बनली आहेत. एकूण लिपीचे स्वरूप डौलदार आहे.

नहपान विहार, पांडव लेणी, नाशिक.

लेणी क्र. ३८ च्या लेखावरून हा लेख शक संवत् ४२ (इ. स. १२०-२१) मध्ये कोरला गेला असावा, असे वा. वि. मिराशी यांचे मत आहे. त्यांनी अक्षरांच्या आकारावरून व भाषेवरून असे अनुमान काढले आहेत की, हा सर्व लेख एकदम कोरला गेलेला नव्हता. पहिल्या दोन ओळी व तिसऱ्या ओळीचा पहिला तीन-चतुर्थांश भाग मोठ्या अक्षरांत असून तो हे लेणे खोदून झाल्यावर लागलीच कोरलेला असावा. नंतर पहिल्या परिशिष्टाचा लेख थोड्या लहान अक्षरांत कोरला आहे. नंतर त्यापेक्षाही लहान अक्षरांत कोरलेल्या दुसऱ्या परिशिष्टात ऋषभदत्ताने त्या लेण्यात राहणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या भोजनाकरिता दिलेल्या एका शेताच्या दानाचा उल्लेख आहे. ही परिशिष्टे पहिल्या लेखानंतर दोन-तीन वर्षांत कोरविली असावी, असे त्यांनी नमूद केलेले आहे.

लेखाच्या भाषेवर प्राकृताची छाप आहे. ऋषभदत्त या नावातील ‘ऋ’ च्या जागी ‘उ’ झाला व ‘ष’ च्या जागी ‘स’ झाला. लेखाच्या पहिल्या भागाची भाषा काही अंशी अशुद्ध असलेली संस्कृत असून वाक्यरचना तृतीय पुरुषी आहे. नंतरचे पहिले परिशिष्ट प्राकृतात असून त्यातील वाक्यरचना प्रथम पुरुषी आहे. दुसरे परिशिष्टही प्राकृतात आहे, पण त्यातील वाक्यरचना पुनः तृतीय पुरुषी आहे.

या लेखात निरनिराळ्या तीर्थस्थानी ब्राह्मण व भिक्षूंना दिलेली भोजने व दाने तसेच लोककल्याणकारी कामांचा उल्लेख आहे. नहपानाने दुसऱ्या शतकाच्या प्रथमार्धात महाराष्ट्रावर राज्य केले. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लोकोपयोगी सार्वजनिक कामेही केली. काही कामे त्याने केली, तर काही कामे त्याने आपल्या जावयाकडून करविली.

लेणी क्र. १० मधील नहपानाचा कोरीव लेख, पांडव लेणी, नाशिक.

पहिल्या लेखाचा उद्देश नहपानाचा जावई व दीनीकाचा पुत्र ऋषभदत्त याने गोवर्धन नगराच्या त्रिरश्मी पर्वतात प्रस्तुत लेणे व त्यासाठी पाण्याची टाकी खोदविली, हे नमूद करण्याचा आहे. ऋषभदत्ताने केलेल्या धर्मकृत्यांचा उल्लेख केला असून त्यास ‘धर्मात्मा’ संबोधले आहे. त्याने तीन लाख गायी दान दिल्या; बार्णासा नदीच्या काठी सुवर्णदान केले व घाट बांधला; देव व ब्राह्मणांना सोळा गावे दान दिली; व प्रतिवर्ष लक्ष ब्राह्मणांना भोजन घालत आलेला आहे; प्रभास या पवित्र तीर्थी ब्राह्मणांचे आठ भार्यांशी विवाह लावून दिलेले आहेत; भरुकच्छ, दशपुर, गोवर्धन व शूर्पारक येथे चौसोपी घरे निवासाकरिता दान दिली; उद्याने, तलाव व विहिरी निर्माण केल्या; इबा, पारदा, दमण, तापी, करबेणा आणि दाहनुका या नद्या पार करण्याकरिता धर्मार्थ तरींची सोय केली; या नद्यांच्या दोन्ही काठांवर धर्मशाळा बांधल्या व पाणपोया घातल्या आणि पिंडीतकावड, गोवर्धन, सुवर्णमुख, शोर्पारग आणि रामतीर्थ येथे संन्याशांना (भिक्षुसंघांना) नानंगोल गावातील बत्तीस हजार नारळीची झाडे दान दिली.

पहिल्या परिशिष्ट लेखात ऋषभदत्त सांगतो की, भट्टारकाच्या (नहपान) आज्ञेवरून मी वर्षाऋतूमध्ये मालयांनी वेढा घातलेल्या उत्तमभद्रांना सोडविण्याकरिता चालून गेलो. माझ्या स्वारीच्या निर्घोषाने ते मालय पळू लागले; तेव्हा त्यांना पकडून मी त्यांना उत्तमभद्र क्षत्रियांच्या ताब्यात दिले. नंतर मी पुष्कर क्षेत्री जाऊन स्नान केले आणि तीन सहस्र गायींचे आणि एका गावाचे दान दिले.

दुसऱ्या परिशिष्टात ऋषभदत्ताने वाराहीपुत्र अश्विभूती या ब्राह्मणाकडून त्याच्या पित्याच्या मालकीचे गोवर्धन नगराच्या ईशान्य दिशेस असलेले एक शेत चार हजार कार्षापण नाणी देऊन विकत घेतले आणि ते आपल्या लेण्यात राहणाऱ्या चारी दिशांच्या भिक्षूंच्या मुख्य आहाराकरिता दान दिले, असे सांगितले आहे.

प्रस्तुत लेखात अनेक नद्यांचे व स्थळांचे उल्लेख आलेले आहेत. भगवानलाल इंद्रजी यांनी बहुतेक नावांचे आधुनिक पर्याय सुचविले आहेत. बार्णासा नदी ही सध्याची बनास, इबा ही अंबिका, पारदा ही पार, दमण ही दमणगंगा, करबेणा ही कावेरी असावी, असे भगवानलाल यांनी सुचविले आहे. मिराशींच्या मते दाहानुका ही मुंबईच्या उत्तरेकडील डहाणू जवळची खाडी असावी.

स्थळांच्या उल्लेखांपैकी प्रभास (काठेवाडातील सध्याचे प्रभास), भरुकच्छ (भडोच), दशपुर (माळव्यातील मंदसोर), शोपरिग (सोपारा), पोक्षर (पुष्कर) यांचा उल्लेखही या लेखात येतो. तसेच लेखात नहपान आणि दीनीक ही शक नावे आली असून उषवदात हे नाव मात्र भारतीय आहे. लेखात कार्षापणाचा उल्लेख असून ४००० हा अंक आकड्यात लिहिला आहे.

संदर्भ :

  •  West E. W. & West, A. A., Nashik Cave Inscriptions, Bombay, 1862.
  • Senart, E., Epigraphia Indica (Vol. VIII), New Delhi, 1981.
  • Gazetteer of the Bombay Presidency (Nashik), Vol. XVI, Government Central Press, Bombay, 1883.
  • गोखले, शोभना, पुराभिलेखविद्या, पुणे, २००७.
  • मिराशी, वासुदेव वि. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख, मुंबई, १९७९.

                                                                                                                                                                                                                                समीक्षक : श्रीनंद बापट