दृश्य प्रत :

ताऱ्याची दृश्य प्रत म्हणजे पृथ्वीवरून दिसणारी ताऱ्याची तेजस्विता. रात्रीच्या आकाशात तारा किती तेजस्वी दिसतो, हे प्रामुख्याने ताऱ्याचे पृथ्वीपासूनचे अंतर आणि ताऱ्यांची मूळ तेजस्विता यावर अवलंबून असते. इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकात हिप्पार्कस या ग्रीक शास्त्रज्ञाने ताऱ्यांच्या तेजस्वितेची वर्गवारी केली. साध्या डोळ्यांनी साधारणपणे सर्वात तेजस्वी दिसणारे सर्व तारे पहिल्या प्रतीचे आणि साध्या डोळ्यांना जेमतेम दिसणारे सर्वात अंधुक तारे सहाव्या प्रतीचे अशी त्याने वर्गवारी केलेली होती. पहिल्या आणि सहाव्या प्रतीच्या ताऱ्यांच्या दरम्यान तेजस्विता असणारे तारे, तेजस्वितेच्या उतरत्या क्रमाने दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या प्रतीचे अशी त्यांची विभागणी यात केलेली होती. इ.स. १८५६ मध्ये नॉर्मन पॉगसन या ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञाने हिप्पार्कसच्या या प्रत पद्धतीला गणिताच्या चौकटीत बसवले. फोटोमीटर या उपकरणाच्या मदतीने जेव्हा त्याने ताऱ्याची तेजस्विता मोजली, तेव्हा त्याच्या लक्षात आले की पहिल्या प्रतीचा तारा हा सहाव्या प्रतीच्या ताऱ्यापेक्षा शंभर पट अधिक तेजस्वी आहे. म्हणजेच शंभराचे पाचवे मूळ काढले, तर ते २.५१२ एव्हढे येते. याचा अर्थ पहिल्या प्रतीचा तारा हा दुसऱ्या प्रतीच्या ताऱ्यापेक्षा अडीचपट म्हणजेच २.५ पट तेजस्वी; तसेच दुसऱ्या प्रतीचा तारा हा तिसऱ्या प्रतीच्या ताऱ्यापेक्षा अडीचपट तेजस्वी, अशा प्रकारे ही मोजपट्टी पॉगसनने ० च्या मागे -१… २…आणि ६ च्या पुढे +६…+७… अशी दोन्ही दिशांना वाढवली.  या मोजपट्टीसाठी अभिजित ताऱ्याची दृश्य प्रत शून्य आहे असे गृहित धरून इतर सर्व ताऱ्यांची दृश्य प्रत ठरविण्यात आली. या मोजपट्टीनुसार सूर्याची दृश्य प्रत -२६.७, पौर्णिमेच्या चंद्राची दृश्य प्रत -१२.७, शुक्र ग्रहाची प्रत -४.४, व्याध ताऱ्याची प्रत दृश्य -१.८६, तर हबल दुर्बिणीमधून दिसणाऱ्या सर्वात अंधुक ताऱ्याची प्रत -३० आहे.

समीक्षक : आनंद घैसास.