एक सर्वपरिचित सस्तन प्राणी. स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील फेलिडी (मार्जार) कुलात मांजराचा समावेश केला जातो. सिंह, वाघ व चित्ता हे मार्जार कुलातील वन्य प्राणी आहेत. जगात सर्वत्र मांजरे दिसून येतात. मांजर कोठे व केव्हा माणसाळले गेले हे निश्चितपणे सांगता येत नसले, तरी ईजिप्तमध्ये सु. ३५०० वर्षांपूर्वी ते पहिल्यांदा माणसाळले गेले असावे. अजूनही काही ठिकाणी रानमांजरे आढळतात आणि त्यांच्या शरीराची ठेवण व गुणविशेष घरमांजराप्रमाणे असतात. ग्रीस व चीन या देशांमध्ये इ.स.पू. पाचव्या शतकात घरमांजराचे अस्तित्व होते. भारतातील इ.स.पू. १०० या कालापूर्वीच्या संस्कृत वाङ्मयात मांजराचा उल्लेख आहे. अमेरिकेत १७५० सालच्या सुमारास घरमांजरे प्रथमत: पाळण्यात आली. घरमांजराचे शास्त्रीय नाव फेलिस कॅटस आहे. भारतात घरमांजराशिवाय न माणसाळलेल्या मांजरांपैकी रानमांजर (फेलिस चाऊस) आणि वाळवंटी मांजर (फेलिस लिबिका) या जाती व फेलिडी कुलाच्याच कॅराकल प्रजातीतील वन्यमांजर (कॅराकल कॅराकल) आढळते.
घरमांजराचे सर्वसाधारण वजन २·५–५ किग्रॅ. असते. शरीर (बांधा) रेखीव असून स्नायू बळकट असतात. त्यामुळे ते चांगलेच ताकदवान असते. मांजर चपळ असून त्याची चाल ऐटदार असते. पाठीच्या कण्यातील मणके अस्थिरज्जूऐवजी स्नायूंनी जुळलेले असल्यामुळे ते शरीराची पूर्ण कमान करू शकते. तसेच शरीर लवचिकपणे हालवू शकते. यामुळे उंचावरून खाली पडल्यास किंवा टाकल्यास ते चार पायांवर सुरक्षित उभे राहते. मांजराचा मेंदू शरीराच्या मानाने मोठा असून त्याची पूर्ण वाढ झालेली असते. त्याच्या अंगावरील रोमपुटकांना असलेल्या लहान उत्थानक्षम स्नायूंमुळे ते त्यांचे केस ताठ उभे करून शरीराचे आकारमान फुगवू शकतात.
मांजराच्या दातांची व पंजांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याच्या वरच्या जबड्यात १६ व खालच्या जबड्यात १४ दात असतात. दंतसूत्र पटाशीचे दात ३/३, सुळे १/१, उपदाढा ३/२, दाढा १/१ असे असते. पिलांच्या दुधाच्या दातांची संख्या २४ असते व ते दात वयाच्या पाचव्या महिन्यात पडून जातात. मांजराच्या खालच्या जबड्याचे दोन्ही बाजूंचे सांधे कवटीशी घट्ट जुळलेले असून ते फक्त खालीवर करता येतात. त्यामुळे मांजर दातांनी तुकडे करू शकते; परंतु चावण्यासाठी लागणारी बाजूची हालचाल त्याला करता येत नाही. सुळे लांब व तीक्ष्ण असल्यामुळे ते भक्ष्याला भोसकून घट्ट पकडून ठेवते.
फेलिडी कुलातील सर्व प्राणी टाचा न टेकता बोटांवर चालतात (डिजिटिग्रेड). मांजराच्या पुढच्या पायाला पाच बोटे व मागच्या पायास चार बोटे असतात. बोटांच्या शेवटच्या पेरांवर नख्या असल्यामुळे ती आत-बाहेर काढता येतात. चालताना फक्त बोटे जमिनीला टेकतात. बोटे जेथे जमिनीला टेकतात तेथे मांसल गादीसारखा उंचवटा असतो. त्यामुळे पावलांचा आवाज होत नाही. ते पायांच्या बोटांवर चालते. चालताना किंवा पळताना एकाच बाजूचा प्रथम पुढचा व नंतर मागचा पाय उचलते आणि त्यानंतर मग दुसऱ्या बाजूचा पुढचा व मागचा पाय उचलते. पुढचे पंजे अधिक बळकट असल्यामुळे भक्ष्यावर हल्ला करणे, संरक्षण करणे व झाडावर चढणे अशा कामांसाठी त्यांचा उपयोग होतो.
मांजराच्या नाकपुड्यांवरील व जबड्यावर असणाऱ्या स्पर्श दृढरोमांमुळे म्हणजे चेतातंतूंचा पुरवठा असलेल्या राठ केसांमुळे त्याला अंधारातही स्पर्शामुळे वस्तूंचे ज्ञान होऊ शकते. मांजराला रात्री चांगले दिसते. माणसाला दिसण्यासाठी लागणाऱ्या कमीत कमी प्रकाशापेक्षा सहापटीने कमी असलेल्या प्रकाशातही त्याला चांगले दिसते. याचे एक मुख्य कारण म्हणजे त्यांच्या मोठ्या, खाचेच्या आकाराच्या बाहुल्या. क्षीण प्रकाशात या बाहुल्या मोठ्या होऊन डोळ्याचा बाहेरून दिसणारा भाग पूर्णपणे व्यापतात. दुसरे मुख्य कारण म्हणजे त्याच्या दृष्टिपटलामागे असलेल्या चकास स्तरामुळे आत जाणारा प्रकाश परावर्तित होतो व परत दृष्टिपटलावर पडतो. या चकास स्तरामुळे होणाऱ्या परावर्तनामुळे रात्री मांजरांचे डोळे चकाकतात.
मांजराचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते आणि शिकार करताना ते आवाजापेक्षा वासावर जास्त अवलंबून राहते. त्याचे कान संवेदनक्षम असतात. मांजरे ५५ ते ७,९०० कंप्रतेचा आवाज ऐकू शकतात. माणसाला २०,००० कंप्रतेपर्यंत आवाज ऐकू येतो. मांजरांची श्राव्यातीत आवाज ऐकू येण्याची क्षमता त्यांना उंदरासारख्या कृंतक प्राण्याच्या शिकारीसाठी उपयुक्त ठरते. काही कृंतक एकमेकांशी श्राव्यातीत कंप्रतेच्या आवाजाद्वारे संदेशवहन करतात. मांजर बाह्यकर्णाला असलेल्या ३० स्नायूंच्या साहाय्याने आवाजाच्या दिशेने चपळाईने कान वळवू शकते.
मांजर मुख्यत: मांसाहारी आहे. पाळलेल्या मांजरांचा कल उंदीर, लहान पक्षी व इतर लहान प्राणी मारून खाण्याकडे असतो. ते चोर पावलांनी व दबा धरून आपल्या भक्ष्यावर चपळाईने झडप घालते. म्हणून पक्ष्यांची शिकार करण्यात ते पटाईत असतात. मांजर बुद्धिमान व स्वातंत्र्यप्रिय प्राणी आहे. त्याला एके जागी कोंडून किंवा बांधून ठेवलेले आवडत नाही. रागावले की ते गुरगुरते आणि आपल्यापेक्षा आकारमानाने व शक्तीने मोठ्या असलेल्या प्राण्यांवर त्वेषाने हल्ला करायला मागेपुढे पाहत नाही.
मांजराची वाढ सर्वसाधारणपणे वयाच्या एक वर्षाच्या सुमारास पूर्ण होते. नर (बोका) १० महिन्यांनी व मांजरी ७–१२ महिन्यानंतर प्रजननक्षम होते. ऋतुकाल वर्षातून ४-५ वेळा येतो आणि दर वेळी तो ५ दिवस टिकतो. मांजर, वाघ इ. प्राण्यांमध्ये अंडमोचनाची क्रिया संयोग करताना होते. या काळात मादीचा जेव्हा नराशी संयोग होतो तेव्हा मादीमध्ये अंडमोचन होते. फलन निरनिराळ्या वेळी होऊ शकते. त्यामुळे माजावर आल्यानंतर मांजरीचा एकापेक्षा अधिक बोक्यांशी संयोग झाला, तर एका विणीत निरनिराळ्या नरांपासून पिले जन्माला येऊ शकतात. गर्भावधी ६३–६५ दिवसांचा असतो. एका विणीत मांजरी ४-५ पिलांना जन्म देते. जन्मत: पिलांचे डोळे मिटलेले असतात. ७–१० दिवसांनी त्यांचे डोळे उघडतात. पिले ४–६ आठवडे दूध पितात आणि याच काळात तिचे अनुकरण करून बऱ्याच गोष्टी शिकतात. दोन महिन्यांनी पिले स्वतंत्रपणे वावरू लागतात. पिलांना चार आठवड्यांपर्यंत मांजरीच्या दुधाव्यतिरिक्त इतर खाद्य देण्याची जरूरी नसते. त्यानंतर त्यांना दोन महिन्यांची होईपर्यंत दिवसातून ३ वेळा, चार महिन्यांची होईपर्यंत २ वेळा व त्यानंतर १ वेळा खाद्य देतात. चार महिन्यांपर्यंत ५०–७५ ग्रॅ. व प्रौढाला २५० ग्रॅ. खाद्य लागते. अंड्यातील पिवळा बलक, कच्चे मांस, शिजविलेले मासे, पनीर, चीज, कोंबडीचे मांस इ. मांजरे खातात.
मांजर हा जात्याच स्वच्छ प्राणी आहे. जिभेने चाटून ते आपले अंग नेहमी स्वच्छ राखते. पिले लहान असताना मांजरी त्यांचे अंग चाटून स्वच्छ ठेवते. थंडीवाऱ्याचा त्रास मांजराला सहन होत नाही. म्हणून त्याला राहण्याची जागा उबदार लागते. भटकी मांजरे ८-९ वर्षे जगतात, तर पाळलेली मांजरे १४-१५ वर्षे जगतात.