माधवलता ही वनस्पती मालपीगीएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव हिप्टेज बेंगालेन्सिस आहे. हिप्टेज मॅदब्लोटा या शास्त्रीय नावानेही ती परिचित आहे. मराठीमध्ये माधवी आणि हळदवेल या नावांनीही ती ओळखली जाते. एखादे काष्ठीय झुडूप किंवा वेलीप्रमाणे माधवलता वाढते. ती मूळची भारत आणि फिलिपीन्स देशांतील असून ऑस्ट्रेलिया व मॉरिशस या देशांत तणासारखी वाढलेली आढळते. सुगंधी वनस्पती म्हणून ती प्रसिद्ध असून वेलीला येणाऱ्‍या पांढऱ्‍या सुगंधी फुलांसाठी तिची लागवड बागांमध्ये करतात.

माधवलता (हिप्टेज बेंगालेन्सिस) : (१) पाने व फुलोऱ्यातील फुलांसह वेल, (२) फळे असलेली फांदी

माधवलता वेल आधाराने ५–८ मी. उंच वाढते. तिच्या कोवळ्या भागांवर पांढरी किंवा पिवळी लव असते. पाने साधी, चिवट व समोरासमोर असून ती लांब भाल्याप्रमाणे असतात. पाने सु. २० सेंमी. लांब व सु. ८ सेंमी. रुंद असून त्याचा देठ १ सेंमी. लांब असतो. फुले वर्षभर येत असून फुलोरा पानांच्या बगलेतून येतो. फुले पांढरी, सुगंधी व लहान असून उभ्या मंजरीवर येतात. निदलपुंज संयुक्त, पाच दलांचा व लांब नलिका आकाराचा असतो. नळीच्या मुखाशी पाच मुक्त पाकळ्यांचा दलपुंज असतो. दलपुंजाच्या पाकळ्या पांढऱ्‍या किंवा गुलाबी रंगाच्या असून त्यावर पिवळ्या खुणा असतात. फुलात १० पुंकेसर असून त्यांपैकी एक लांब असतो. शुष्कफळ एकबीजी असून त्याला तीन पंख असतात. ते खाली पडताना गिरक्या घेत खाली पडते. बी एकच असून गोलसर असते.

माधवलता वेलीची पाने, फुले आणि फांद्या सुगंधी, कडू व शीतल असतात. जुनाट संधिवात, त्वचारोग आणि दमा यांवर पाने उपयुक्त असतात. पानांचा रस कीटकनाशक असून तो खरजेवरही लावतात. सालीत टॅनीन व हिप्टॅजीन ग्लुकोसाइड असते. छाटणी करून या वेलीची रचना झुडपासारखी करता येते. जनावरे तिची पाने खातात.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा