मुनशी, उदीराज : उदयराज. मोगल सरदार रुस्तमखान आणि मिर्झाराजा जयसिंह यांच्या हाताखालील एक विश्वासू चिटणीस. तो आपल्या अंगीभूत कौशल्याने आणि फार्सी भाषेवरील प्रभुत्वाने पुढील काळात मिर्झाराजांचा अत्यंत विश्वासू सेवक आणि सल्लागार झाला. उत्तम राजकीय समज, समयसूचकता आणि मोगल साम्राज्याविषयीची निष्ठा हे उदीराजचे खास गुण म्हणता येतील. मिर्झाराजांच्या दख्खन मोहिमेतील आणि पुरंदरच्या तहातील अनेक निर्णयांवर उदीराजचा प्रभाव दिसून येतो. पुरंदरच्या तहाचा खर्डा आणि तत्संबंधीचा बादशाहबरोबरचा पत्रव्यवहार त्यानेच केला होता. उग्रसेन कच्छवाहाच्या जोडीने त्याने हे कार्य केल्याचे दिसून येते. पुरंदरच्या तहात महाराजा जयसिंहांच्या मुत्सद्देगिरीत उदीराज मुनशीचा वाटा मोठा आहे. एवढेच नव्हे, तर दक्षिणेकडील स्वारीतील घटनाक्रमात त्याचा सहभाग महत्त्वाचा होता. उदीराज संपूर्ण दख्खन मोहिमेत जयसिंहांच्या वतीने पत्रव्यवहार करताना आढळतो. मिर्झाराजांच्या वैयक्तिक जीवनातही त्याचे स्थान आढळते. उदीराजने मिर्झाराजा जयसिंहांसाठी केलेला पत्रव्यवहार विस्तृत असून त्यांत पुढील पत्रांचा समावेश होतो : १. थत्ता मोहिमेतील जयसिंहांचा पत्रव्यवहार, २. जयसिंहांनी औरंगजेबाला पाठवलेली पत्रे, ३. दिल्लीच्या तख्तासाठी झालेले युद्ध आणि मिर्झाराजांनी केलेला दारा शुकोहचा पाठलाग यांदरम्यान पाठवलेली पत्रे, ४. छ. शिवाजी महाराज आणि विजापूर मोहिमेतील लिहिलेली पत्रे, ५. जयसिंहांनी शाहजहानच्या मुलांना पाठवलेली पत्रे, ६. जयसिंहांनी औरंगजेबाच्या मुलांना पाठवलेली पत्रे, ७. रुस्तमखानाने नवाब सादुल्ला, मुअज्जम या सरदारांना पाठवलेली पत्रे, ८. जयसिंहांनी औरंगजेबाच्या काही सरदारांना पाठवलेली पत्रे, ९. जयसिंहांनी दख्खनेतील काही सरदारांना पाठवलेली पत्रे, १०. जयसिंहांनी आदिलशाह आणि कुतुबशहा यांना पाठवलेली पत्रे, ११. जयसिंहांनी दख्खनेतील मोगल वकिलांना पाठवलेली पत्रे, १२. जयसिंहांनी रामसिंह आणि इतर मुलांना पाठवलेली पत्रे.
वरील विस्तृत पत्रव्यवहारांतून उदीराजच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश पडतो. छ. शिवरायांची आग्राभेट आणि तेथून सुटका या घटनांनी मिर्झाराजा जयसिंह आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर मोगली संकटाचा पहाडच कोसळला. त्यांचा ज्येष्ठ पुत्र रामसिंह याची मनसब रद्द करण्यात आली आणि मिर्झाराजांना तातडीने उत्तरेत दाखल होण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. या संकटप्रसंगांतही उदीराज मिर्झाराजांसोबतच त्यांचा पत्रव्यवहार सांभाळताना दिसतो. अपमानित मिर्झाराजांना २८ ऑगस्ट १६६७ रोजी बुऱ्हाणपूरनजीक अचानक मृत्यू आला. उदीराजनेच मिर्झाराजांना विषप्रयोग करून ठार मारल्याचा संशय मिर्झाराजांच्या मुलांना आला. त्यामुळे मुलगा किरतसिंह आणि इतर राजपूत सरदार उदीराजच्या जिवावर उठले. या घटनेची वेळीच कल्पना आल्याने उदीराजने बुऱ्हाणपूरच्या मुस्लिम सुभेदाराच्या आश्रयाने इस्लाम धर्माचा स्वीकार करून आपला जीव आणि मालमत्ता वाचवली. सन १६६७ च्या ऑक्टोबरमध्ये औरंगजेब बादशाहने त्याला ‘तालेयारखानʼ पदवी देऊन गौरविले. मिर्झाराजांच्या मृत्युप्रकरणात उदीराज मुनशीचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध असल्याचे पुरावे कागदोपत्री उपलब्ध नाहीत; पण औरंगजेबाने त्याचा केलेला गौरव संशय सूचित करतो. उदीराज सर्व दफ्तर आपल्या सोबतच बाळगत असे. त्याच्या सर्व नकला, हस्तलिखिते, कच्चे खर्डे आणि पत्रव्यवहाराचे संकलन त्याचा मुलगा हिमायतयार याने उदीराजच्या मृत्यूनंतर (१६ जून १६७५) इन्शा-ए-हफ्त-अंजुमन या नावाने लिहून काढले (१६९८-९९).
उदीराजच्या हस्तलिखितांचा शोध इतिहासकार सर जदुनाथ सरकार (१० डिसेंबर १८७०–१९ मे १९५८) यांनी घेतला. या हस्तलिखितांच्या बनारस, दिल्ली आणि पॅरिस अशा तीन नकला उपलब्ध असून जदुनाथ सरकारांनी ही तीनही हस्तलिखिते हस्तगत करण्यात यश मिळविले. सध्या ही हस्तलिखिते कोलकाता येथील राष्ट्रीय ग्रंथालयात हफ्त अंजुमन (सात संग्रह) या नावाने संग्रहित आहेत.
संदर्भ :
- Sarkar, Sir Jadunath, House Of Shivaji, Calcutta, 1955.
- Sarkar, Sir Jadunath, Shivaji and his times, Calcutta, 1955.
- Sarkar, Jagadish Narayan, Trans., Military Despatches Of A Seventeenth Indian General, Calcutta, 1969.
समीक्षक – गो. त्र्यं. कुलकर्णी
Best