अफजलखान मुहम्मदशाही : (? – १० नोव्हेंबर १६५९). विजापूरच्या आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार व सेनानी. त्याच्या पूर्वायुष्याची फारशी माहिती ज्ञात नाही; तथापि तो सामान्य कुळात जन्माला आला असावा, असे उपलब्ध पुराव्यांवरून दिसते. त्याचा उल्लेख ‘भटारीʼ किंवा ‘भटारणीʼ जातीतील असा कागदोपत्री आढळतो.
सुरुवातीस म्हणजे इ. स. १६३८-३९ दरम्यान रणदुल्लाखान या मातब्बर आदिलशाही सरदाराचा तो सरनोबत म्हणून त्याच्या नोकरीत होता. त्याच्या विश्वासातील अधिकारी असल्यामुळे ‘परवानगी खान अफजलखानʼ असा त्याचा उल्लेख रणदुल्लाने वाई परगण्याच्या कारकून व देशमुखांना २१ ऑगस्ट १६३८ आणि ३१ मार्च १६३९ रोजी पाठविलेल्या पत्रांत केला आहे. म्हणजे ‘अफजलखानाच्या परवानगीनेʼ असा त्या शेऱ्याचा अर्थ आहे. या सुमारास रणदुल्लाखानाकडे वाईचा मोकासा (जहागीर) होता.
रणदुल्लाखानाच्या नेतृत्वाखाली आदिलशाही फौजा कर्नाटकातील हिंदू सत्ताधीशांना जिंकण्यासाठी शहाजीराजे, अफजलखान वगैरे मातब्बर सरदारांसोबत इ. स. १६३८-१६४८ दरम्यान गुंतल्या होत्या. या मोहिमेत ज्या स्वाऱ्या करण्यात आल्या, त्यांत त्यांपैकी शिरे, बसवपट्टण, चिकनायकनहळ्ळी, बेलूर, तुंकूर, बिदनूर, श्रीरंगपट्टम व तमिळनाडूतील वेल्लोर व जिंजी ही महत्त्वाची संस्थाने होती. या स्वाऱ्यांत अफझलखान रणदुल्लाखानाच्या हाताखाली असला, तरी स्वतंत्रपणे त्याने चिकनायकनहळ्ळी आणि बेलूरचा किल्ला भुयारांद्वारे सुरुंग पेरून राजा व्यंकटपतीकडून हस्तगत केला. शिवाय तुंकूरचा किल्लाही मिळविला. रणदुल्लाखानाने त्यास शिरे येथील किल्ला घेण्यास पाठविले. त्याचा मालक कस्तुरीरंग नायक याने अफजलखानाच्या वेढ्यास प्रथम दाद दिली नाही. नंतर त्याने तहाची याचना केली. वाटाघाटीसाठी खानाने त्यास अभिवचन देऊन भेटीस बोलाविले, मात्र भेटीच्या प्रसंगी विश्वासघात करून अफजलखानाने त्याचा शिरच्छेद केला आणि किल्ला व संपत्ती घेऊन प्रयाण केले. या घटनेमुळे खान अत्यंत विश्वासघातकी असल्याचा दुर्लौकिक सर्वत्र पसरला.
अफझलखानाने जिंजीच्या अभेद्य किल्ल्याच्या लढाईत विजय संपादन केला (१६५४). तत्पूर्वी कनकगिरीचा पाळेगार आपाखान याने बंडखोरी केली होती. तिचे पारिपत्य करण्यासाठी आदिलशहाने अफजलखानास पाठविले होते. त्या प्रसंगी खानाने संभाजी या छ. शिवाजींच्या ज्येष्ठ भावास पुढे पाठविले. त्यात तोफेचा गोळा लागून संभाजी मरण पावले (१६५४). ही खानाने बुद्धिपुरस्सर केलेली खेळी होती; कारण तत्पूर्वी शहाजीराजांना राजद्रोहाच्या कारणास्तव (कुत्बशाहीत जाण्याचा बेत केला म्हणून) मुस्ताफाखानाने २५ जुलै १६४८ रोजी अटक केली होती. जिंजी काबीज केल्यानंतर तेथील सर्व संपत्ती ८९ हत्तींवर लादून खान-इ-खानाने ती कैद केलेल्या शहाजीराजांसह अफजलखानाबरोबर विजापूरला पाठविली. औरंगजेबाने इ. स. १६५६ मध्ये कुत्बशाहीवर आक्रमण केले, तेव्हा कुत्बशाहीस मदत करण्यासाठी पाठविलेल्या आदिलशाही फौजेचे नेतृत्व अफजलखानाकडे होते. अफजलखानाचा पराक्रम व कर्तृत्व पाहून आदिलशहाने त्याला कर्नाटकची सुभेदारी दिल्याचा उल्लेख अनुक्रमे १२ फेब्रुवारी १६५८ व १६ मे १६५८ च्या गदग परगण्याच्या देसायांना व कोनेरी नायकास पाठविलेल्या पत्रांत आहे. शिवाय तो मुदगल मामलतचा सरहवालदार होता. त्याच्याकडे शिरोळे परगण्याचा इ. स. १६४५-१६५५ दरम्यान मोकासा असल्याचा उल्लेख त्याने १८ ऑगस्ट १६४५ रोजी तेथील कारकुनास पाठविलेल्या पत्रात आहे. वाई परगण्याच्या कारकुनांना तसेच देशमुखांना परगण्यातील इनामांविषयी पाठविलेली अनेक पत्रे उपलब्ध असून त्यावरून १६४९ ते त्याच्या मृत्यूपर्यंत (१६५९) त्याच्याकडे वाई परगण्याचा मोकासा होता.
अफजलखानाने वाईचा मोकासा मिळताच प्रथम जावळी खोरे काबीज करण्यासाठी खटपट सुरू केली; कारण त्या खोऱ्याचा देशमुख दौलतराव मोरे आदिलशाहीशी फटकून वागत होता. पण तो १६४८ मध्ये निपुत्रिक मरण पावला, तेव्हा देशमुखीसंबंधी तंटे उद्भवले. त्याचा फायदा शिवाजी महाराजांनी घेतला. दौलतरावाच्या पत्नीने शिवथरकर मोऱ्यांपैकी येसाजी (यशवंत) नावाचा मुलगा दत्तक घेतला. त्याचा कारभार त्यांच्या आप्तांपैकी हणमंतराव मोरे पाहत असे. महाराजांचे सर्वतोपरी सहकार्य त्यांना होते; तथापि अफजलखान येताच या दोन मोऱ्यांनी महाराजांशी वैर करून खानाशी संधान बांधले. तेव्हा शिवाजींनी सिलिमकर देशमुखांच्या मदतीने पुढे मोऱ्यांचा पराभव करून येसाजीस ठार मारले आणि जावळी खोरे व त्यांची राजधानी रायरी (रायगड) किल्ला घेतला (१५ जानेवारी १६५६).
छ. शिवाजींच्या महाराष्ट्रातील हालचालींची माहिती घेण्यासाठी अफजलखानास विजापुरास नोव्हेंबर १६५८ मध्ये बोलाविले. महंमद आदिलशाह ४ नोव्हेंबर १६५६ रोजी मरण पावल्याने त्याचा अज्ञान मुलगा अली गादीवर आला होता. महंमद आदिलशहाची बायको बडी साहेबीण हिच्याकडे राज्यकारभाराची सूत्रे होती. तिने अफजलखानास शिवाजीराजांना पकडून आणण्यासंबंधी वाटाघाटी केल्या. खानाने ती कामगिरी मोठ्या उत्साहाने स्वीकारली आणि छ. शिवाजींना जिवंत अगर मृत पकडून आणण्याची प्रतिज्ञा केली. त्याप्रमाणे तो बारा हजार निवडक फौजेसह १६५९ च्या सप्टेंबरमध्ये विजापुरातून निघाला. तो पंढरपूर, माणकेश्वर, करकंब, भोसे, शंभुमहादेव, मलवडी या मार्गे रहिमतपूरला आला. वाटेत दहशत बसावी म्हणून त्याने काही हिंदू मंदिरे व देवदेवता उद्ध्वस्त केल्या; पण पंढरपूर व तुळजापूर येथील मूळ मूर्ती त्याच्या हाती पडल्या नाहीत. वाटेत त्याने फलटणच्या बजाजी निंबाळकर यांना पकडून त्यांस धर्मांतरास उद्युक्त केले. या सर्व हकिकती महाराजांना गुप्तहेरांमार्फत कळत होत्या. पुण्याकडील मैदानी प्रदेशात खानाशी सामना करणे श्रेयस्कर नाही, हा विचार करून ते प्रतापगडावर येऊन राहिले. खानास हे कळताच त्याने वाईस मुक्काम ठोकला. हा परिसर त्याच्या उत्तम परिचयाचा होता. वाईस कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता. खानाने त्यास महाराजांकडे पाठविले. महाराजांना वाई येथे आपल्या भेटीस आणावे, असा खानाचा बेत होता. महाराजांजवळ पंताजी गोपीनाथ बोकील हा एक हुशार व धोरणी गृहस्थ होता. त्यांनी त्यास कृष्णाजीबरोबर खानाकडे शिष्टाईसाठी रवाना केले. दरम्यान महाराजांनी गुप्तहेरांकरवी खानाचा उद्देश जाणून घेतला. त्यांनी खानास निरोप धाडला की, ‘‘एवढ्या मोठ्या सैन्याशी सामना करण्याची ताकद माझ्यात नाही. झालेले अपराध पोटात घालून खान जीवदान देतील, तर मी आपल्या ताब्यातील सर्व मुलूख सोडून देण्यास तयार आहे.’’ या नम्र निरोपामुळे खानास मोहीम फत्ते होणार, असे वाटले. वाई प्रांताची माहिती असल्यामुळे त्या डोंगराळ व जंगलमय प्रदेशात लढाई सुरू केल्यास फौजेची हानी तर होईलच; शिवाय गनिमी काव्यापुढे आपला टिकाव लागणार नाही; म्हणून सौम्योपचारांनी किंवा दगाबाजीने शिवाजीराजे हस्तगत होतील, तर बरे, असे त्याने ठरविले आणि प्रतापगडाच्या खाली दोघांनी भेटण्याचे ठरले. त्याचे सैन्य वाईपासून महाबळेश्वरपर्यंत पसरले होते. महाराजांनी आपली फौज जंगल व दऱ्याखोऱ्यांतून लपवून ठेवली होती. महाराजांचा हा डावपेच खानास कळला नाही. युद्धावाचूनच शिवाजी आपल्या हातात येतील, या भ्रमात तो राहिला. दोघेही परस्परांच्या हेतूंविषयी साशंक होते, असे विविध साधनांवरून दिसते. महाराजांनी वाईहून प्रतापगडाकडे जाताना खान व त्याच्या सरंजामाची बडदास्त राखली. खानाने सर्व जड अवजारे वाईस ठेवली होती. ठरलेल्या वेळी दोघांनी बरोबर दहा शरीररक्षक आणावेत व ते शामियान्याबाहेर राहतील आणि प्रत्यक्ष शामियान्यात दोघांचे वकील व दोन रक्षक असावेत, असे ठरले. १० नोव्हेंबर १६५९ रोजी दोघांची भेट झाली. भेटीपूर्वी दोघांनी आपल्या तलवारी रक्षकांकडे दिल्या. दोघांपाशी खंजिरी होत्या. खानाने महाराजांना घट्ट आलिंगन दिले. त्या क्षणी महाराजांनी वाघनखे त्याच्या पोटात खुपसली आणि त्याच्या मिठीतून सुटका करून घेऊन कट्यारीने वार केला. संभाजीराजांच्या दानपत्रात महाराजांनी बिचवा खुपसल्याचा उल्लेख आढळतो. या भेटीत खान मारला गेला आणि त्याच्या शरीररक्षकांनी केलेला प्रतिकार महाराजांच्या रक्षकांनी मोडून काढला. महाराजांनी भेटीपूर्वी ठरल्याप्रमाणे सैन्याला इशारा दिला आणि अफजलखानाच्या बेसावध सैन्याची दाणादाण उडवून दिली.
अफजलखान क्रूर व कटकारस्थानी असल्याचे उल्लेख काही पत्रांतून व त्याच्या पूर्व आयुष्यातील घडामोडींवरून निदर्शनास येते. वेंगुर्ल्याहून पाठविलेल्या एका डच पत्रात (५ मे १६६०) म्हटले आहे की, ‘शिवाजीविरुद्ध स्वारीस निघताना खानाने आपण जिवंत परत येणार नाही, अशी शंका वाटून स्वत:च्या साठ-सत्तर स्त्रियांना ठार मारले.ʼ ही आख्यायिका त्याचा क्रूरपणाच सूचित करते. तो कपटी होता, हे त्याने राजा कस्तुरीरंगाचा अविश्वासाने शिरच्छेद केला त्यावरून स्पष्ट होते. त्याची दगाबाजीच महाराजांच्या ज्येष्ठ बंधूंच्या – संभाजींच्या – मृत्यूला कारणीभूत झाली, असे काही बखरकार म्हणतात. शहाजीराजांच्या अटकप्रकरणातही त्याच्या कटकारस्थानाचे धागे काही चरित्रकारांना दिसतात. चौलची हिंदू मंदिरे पाडण्याचा हुकूम त्याने दिल्याचा उल्लेख समकालीन पोर्तुगीज पत्रांत आहे. अफझलपूरच्या त्याच्या शिलालेखात ‘कातील-इ-मुतमर्दिदानʼ व ‘काफिरान’ म्हणजे बंडखोरांची व काफिरांची कत्तल करणारा आणि ‘‘शिक्नन्दा-इ-बुतान’’ म्हणजे मूर्ती फोडणारा अशी विशेषणे त्याला लावली आहेत. विजापूरहून वाईला येताना त्याने अनेक मंदिरे पाडली व काही मूर्ती फोडल्या. असे असूनही लष्करी कर्तबगारीबरोबर प्रशासकीय कामात तो वाकबगार असल्याचे काही दाखले मिळतात. त्यांत बेगम तलावाचे पाणी त्याने मातीच्या नळाद्वारे विजापुरात खेळविण्याचे काम आपल्या देखरेखीखाली केल्याचा उल्लेख अंडू मशिदीजवळच्या फार्सी शिलालेखात (२२ नोव्हेंवर १६५२) आढळतो. आदिलशाही पत्रांत त्याच्या नावामागे ‘फर्जंद रशीद’ (शहाणा मुलगा) अशी उपाधी आहे; तर अन्यत्र ‘मुहम्मदशाही’ (आदिलशाहीचा सुपुत्र) असा उल्लेख आहे. वाईच्या सुभेदारी काळात त्याने अनेक भटभिक्षुकांची धर्मादाय व जुनी वतने चालू ठेवली. काही निवाड्यांत मुसलमानांविरुद्धही निकाल दिल्याचे आढळते. इ. स. १६४८ पासून अफझलखानाकडे वाई परगणा मोकासा म्हणून होता. या संदर्भातील त्याने वाई परगण्यातील कारकुनांना पाठविलेली अनुक्रमे १९ जून, २० जून आणि २१ जून १६४९ या तारखांची पत्रे उपलब्ध आहेत. तसेच त्याच्याकडे शिरवळ परगण्याचाही मोकासा होता, हे त्याने १८ ऑक्टोबर १६५६ रोजी मल्हारजी देशमुख व महादजी देशकुलकर्णी यांना लिहिलेल्या पत्रांवरून दिसते. त्यात खान लिहितो, ‘‘आमच्याकडे मोकासा आल्यापासून आमच्या बाजूने जुलूम वा थोडीसी तसवीस होत नसता काय म्हणून मामुरी होत आहे.’’
संदर्भ :
- Sarkar, Sir Jadunath House Of Shivaji, Calcutta, 1940.
- आपटे द. वि.; दिवेकर स. म. शिवचरित्र प्रदीप, पुणे, २०१० (आवृत्ती).
- कवींद्र परमानंद गोविंद, संपा. दिवेकर स. म. श्रीशिवभारत, पुणे, २०१८ (आवृत्ती).
- कुलकर्णी, अ. रा. जेधे शकावली-करीना, पुणे, १९९९.
- पुरंदरे, ब. मो. राजा शिवछत्रपती, पुणे, २०१४
- सभासद, कृष्णाजी अनंत संपा. हेरवाडकर, र. वि. शिव-छत्रपतींचे चरित्र सभासद बखर, पुणे, २००२.
समीक्षक – गो. त्र्यं. कुलकर्णी