बडे गुलाम अलीखाँ : ( २ एप्रिल १९०२ – २३ एप्रिल १९६८ ). अखिल भारतीय कीर्तीचे पतियाळा घराण्याचे प्रख्यात गायक. त्यांचा जन्म लाहोर, पाकिस्तान येथे झाला. त्यांचे घराणे गायकवादकांचे असून ते मूळ कसूर (जि.लाहोर) गावचे राहणारे होते. पतियाळा घराण्याच्या आकर्षक व विविध अंगानी परिपूर्ण अशा गायकीचा परिचय भारतात सर्वत्र करून देण्यात बडे गुलाम अलीखाँचा वाटा फार मोठा आहे. त्यांचे वडील अलीबक्ष व चुलते कालेखाँ हे दोघेही पतियाळा घराण्याचे प्रसिद्ध गायक फतेह अली यांचे शिष्य. अलीबक्ष गायनही करीत व दिलरूबाही उत्तम तऱ्हेने वाजवीत असत. अलीबक्ष काश्मीरच्या महाराजांच्या दरबारी गायक होते. बडे गुलाम अलीखाँ व त्यांचे कनिष्ठ बंधू बरकत अलीखाँ हे दोघेही वडिलांजवळच संगीताचे पहिले पाठ शिकले. १९१९ मध्ये लाहोर संगीत संमेलनात त्यांनी पहिल्यांदा जाहीर गायन केले. गुलाम अलीखाँ यांचा आवाज गोड व ग्रहणशक्ती तीव्र असल्यामुळे ते वयाच्या विसाव्या वर्षांपासूनच उत्तम तऱ्हेने गाऊ लागले. त्यानंतर कोलकाता व अलाहाबाद येथील संगीत संमेलनातील त्यांचे सादरीकरण गाजले. स्वतंत्र मैफली करून, गायक म्हणून त्यांना १९२७ नंतर कीर्ती मिळू लागली.
पंजाबमधील तसेच कोलकाता येथील संगीत परिषदांमध्ये १९४०-४२ पर्यंत बडे गुलाम अलीखाँ यांनी चांगलेच नाव कमाविले. १९४४ साली भरलेल्या ‘विक्रम संगीत परिषदे’त त्यांनी आपल्या कलेने मुंबईकरांना थक्क करून सोडले. देशाच्या फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले होते; मात्र पुन्हा ते भारतात परतले व मुंबईत येऊन राहिले. ख्याल, ठुमरी, भजने इ. प्रकार सारख्याच समर्थपणाने व गोडव्याने गाणारे सर्वढंगी व अद्वितीय गायक म्हणून त्यांची कीर्ती सर्व देशभर पसरली. विशेषतः पंजाबी ढंगाचे ठुमरी गायक म्हणून त्यांचा खास लौकीक होता. ‘सबरंग’ या टोपणनावाने त्यांनी अनेक ख्याल व ठुमऱ्या रचल्या. त्यांनी मुगले आझम या चित्रपटात गाण्यासाठी त्या काळातील सर्वाधिक पार्श्वगायनाचे मानधन घेतले होते. त्यांनी गायलेल्या का करू सजनी आए ना बालम, याद पिया की आए, प्रेम जोगन बनके, नैना मोरे तरस रहे, कंकर मार जाए या ठुमरी खूप लोकप्रिय झाल्या.
आवाजाचा लगाव, सुरेलपणा व भरदारपणा, गायकीतील सौंदर्य व लोच, तरल कल्पकता, नावीन्य, विविधता आणि भावनाप्राधान्य ही बडे गुलाम अलीखाँ यांच्या गायनाची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये होती. १९५७ साली त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले. त्यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले. संगीत नाटक अकादमीने त्यांना पुरस्कार दिला व भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन गौरविले (१९६२). त्यांचे सुपुत्र मुनव्वर अलीखाँ हे देखील नामवंत गायक होते.
बडे गुलाम अलीखाँ १९६१ साली अर्धांगवायूच्या विकाराने आजारी पडले आणि पुढे सात वर्षांनी हैदराबाद येथे त्यांचे निधन झाले. भारतीय टपाल खात्याने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण केलेले आहे.
संदर्भ :
- देवधर, बी.आर, थोर संगीतकार, मुंबई, १९७३.
समीक्षण : सुधीर पोटे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.