बालकांचे चिकित्सालय प्रामुख्याने शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांकरिता विकसित केले गेले आहे. यामध्ये रोगनिवारक, प्रतिबंधात्मक आणि प्रोहात्सन देणारी आरोग्य सेवा यांचे उत्कृष्ट संयोजन केले आहे. पाच वर्षाखालील बालकांचे केंद्र हे बाल आरोग्य विभाग आणि प्रसूतिपूर्व चिकित्सालयांच्या (Antenatal Clinics) सहकार्याने चालविले जाते.
या चिकित्सालयांत सामाजिक आरोग्य परिचारिकेमार्फत अत्यंत महत्त्वाच्या अशा खालील भूमिका पार पाडल्या जातात.
१) पाच वर्षाखालील बालकांची आजारपणातील काळजी (Care in Clinic) :
- केंद्रात आलेल्या बालकांचे श्वसन, नाडी, वजन, उंची व ताप मोजणे तसेच डोके व दंडाचा घेर घेणे आणि त्याची नोंद ठेवणे.
- केंद्रात आलेले बालक स्वच्छ राहतील याची काळजी घेणे. बालकाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग झालेला नाही याची खात्री करणे व असल्यास वैद्यकीय अधिक्षकांच्या सल्ल्याने आवश्यक ते उपचार करणे.
- बालकांना सर्दी, ताप, खोकला किंवा इतर आजार असल्यास तातडीने वैद्यकीय अधिकार्यांना माहिती देणे व योग्य ते उपचार करणे.
- प्रत्येक बालकासाठी विहित केलेली औषधे त्या त्या वेळी बालकाला देऊन त्याच्या नोंदी ठेवणे.
२) प्रतिबंधात्मक उपाययोजनांची (Preventive Care) अंबलबाजवणी :
- पाच वर्षाखालील बालकांचे लसीकरण या संदर्भात माहिती अद्यावत करणे.
- लसीकरण सत्रासाठी सामाजिक सभासदांशी चर्चा करून सर्वांच्या सोयीच्या जागा व वेळा निश्चित कराव्यात.
- क्षय (TB), घटसर्प, डांग्या खोकला, गोवर आणि इतर रोगासंबंधी बालकांना लसीकरण देण्याचे कार्य सामाजिक आरोग्य परिचारिकेमार्फत केले जाते. (खालील तक्त्यात दर्शविलेल्या राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण देण्याचे कार्य केले जाते.)
३) बालकांचा पोषण आहार (Nutritional Surveillance) :
- कुपोषणासंदर्भात बालकाचे वजन व उंची यांच्या नोंदी ठेवण्याचे कार्य सामाजिक आरोग्य परिचारिकेमार्फत केले जाते.
- आरोग्य सेवा सत्राचे आयोजन करणे.
- बाळाचे वजन घेणे, वाढीच्या तक्त्यावर (Growth Chart) नोंद ठेवणे. वयोगटानुसार वजन करण्याचे वेळापत्रक तयार करणे व कुपोषणाची श्रेणी ठरविणे.
- प्रत्येक ०३ ते ०६ महिन्यात बालकांची आरोग्य तपासणी करणे.
- अतिसार झालेल्या बालकांच्या मातेला जीवन संजीवनी पाजण्यासाठी मार्गदर्शन करणे.
४) कुटुंबनियोजन :
- ०५ वर्षाखालील बालकांच्या चिकित्सलयामध्ये येणार्या बालकांच्या माता तसेच इतर स्त्रियांना कुटुंब नियोजन सल्ला व सेवा देण्याचे कार्य सामाजिक आरोग्य परिचारिकेमार्फत केले जाते.
- निरोध व संतती प्रतिबंध गोळ्यांचे वाटप.
- जरुरीप्रमाणे वैद्यकीय गर्भ पाताचा व वंध्यत्वावर स्वतंत्र सल्ला देणे.
- गरोदर स्त्रियांची प्रसूतिपूर्व तपासणी करणे व पाळणा लांबविणे या संदर्भात स्वतंत्र सल्ला देणे आणि लोहयुक्त गोळ्यांचे वाटप करणे.
५) बालकांची वाढ व देखरेख :
- ०५ वर्षाखालील बालकांची वाढ व आरोग्य सेवा यांची देखरेख करण्याची मूलभूत क्रिया सामाजिक आरोग्य परिचारिके मार्फत पार पाडली जाते.
- बाळाच्या वयाच्या प्रथम वर्षात प्रत्येक महिन्यात नियमितपणे बाळाचे वजन, उंची घेऊन यादी वाढीच्या तक्त्यावर नोंद ठेवणे.
- आरोग्य तक्त्यावर (Health Chart) बालकाचे वजन नोंदविणे व येणार्या वाढीच्या वक्राचे (Growth Chart) निरीक्षण करून बालकांच्या पालकांना त्यासंदर्भात अवगत करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका सामाजिक आरोग्य परिचारिकेमार्फत पार पाडली जाते.
संदर्भ : S Kamalam, Essential in Community Health Nursing Practice, 2nd Edition.
समीक्षक : रेशमा देसाई