जोशी, नरहर (बाबूराव) विष्णु : (३१ डिसेंबर १९०८ – ११ नोव्हेंबर १९८४) महाराष्ट्रातील एक संगीतज्ञ व प्रसिद्ध विधिज्ञ. त्यांचा जन्म कोल्हापुरात विष्णुपंत व लक्ष्मीबाई या दांपत्यापोटी झाला. त्यांचे वडील व्यवसायाने वकील असून संगीतप्रेमी होते.

जोशी यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन इंटरआर्ट्सपर्यंतचे शिक्षण राजाराम महाविद्यालयात झाले. पुढे डेक्कन कॉलेज (पुणे) येथून ते एल्.एल्. बी. झाले (१९३०). नंतर त्यांनी दिवाणी न्यायालयामध्ये यशस्वीपणे वकिली व्यवसाय करून लौकिक मिळविला.

बाबूरावांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण वामनराव पाध्ये (ग्वाल्हेर घराणे) यांच्याकडे सुरू केले. तसेच गुंडोपंत वालावलकर, विश्वनाथबुवा जाधव (प्रौढ गंधर्व), आण्णाबुवा इचलकरंजीकर यांच्याकडूनही संगीताचे मार्गदर्शन घेतले. नंतर त्यांना जयपूर-अत्रौली घराण्याची तालीम नथ्थनखाँ, भूर्जीखाँ आणि गोविंदबुवा शाळीग्राम या अध्वर्यू संगीत शिरोमणींकडून मिळाली. संगीतसम्राट अल्लादियाखाँसाहेबांचा प्रत्यक्ष सहवास व गोविंदराव टेंबे यांचा अकृत्रिम स्नेहही त्यांना लाभला. त्यातून ठुमरी, दादरा, लावणी, गझल यांसारख्या उपशास्त्रीय संगीताकडे पाहण्याची एक खास दृष्टी त्यांना मिळाली. त्यांनी आपले संपूर्ण लक्ष संगीताचा प्रचार, प्रसार व उद्बोधनाकडे वळविले. संगीतकला व कलाकार यांच्याविषयी असणारी आत्यंतिक आस्था व अगत्यापोटी त्यांनी अभिजात शास्त्रीय संगीत सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत पोचवून श्रोत्यांना ते उमजावे व त्यांची अभिरूची समृद्ध व्हावी यासाठी अनेक उपक्रम राबविले. तसेच संगीतावर इंग्रजी-मराठीत ग्रंथलेखन करून संगीतशास्त्रातील बारकावे व मर्मस्थळे सामान्य श्रोत्यांस ज्ञात व्हावीत म्हणून प्रयत्न केले. संगीताचे रसग्रहण (१९५६, दुसरी आवृत्ती १९६१) हे त्यांचे पुस्तक सर्वसामान्य रसिकास संगीताची मर्मस्थळे उलगडून सांगत संगीताचा आस्वाद कसा घ्यावा याची योग्य दिशा देते. याच पद्धतीने बाबूरावांनी अंडरस्टँडिंग इंडियन म्यूझिक (१९६३) आणि इंट्रोड्यूसिंग इंडियन म्यूझिक (ध्वनिमुद्रिकांसह, १९६५, सहलेखक-ओवो) या पुस्तकांमध्ये भारतीय संगीताच्या रसास्वादाची सूत्रे सांगितली आहेत. संगीताने गाजलेली मराठी रंगभूमी (१९५९) या पुस्तकात त्यांनी मराठी संगीत रंगभूमीचा वैभवशाली ऐतिहासिक पट उलगडून दाखविला आहे.

मुलांच्या लहान वयातच त्यांच्यावर शास्त्रीय संगीताचे संस्कार व्हावेत म्हणून सोप्या गीतांद्वारे संगीताची मूलतत्त्वे त्यांच्यात रूजविण्याचा प्रयत्न बाबूरावांनी बाल संगीत या प्रकल्पाद्वारे मनोहर कवीश्वर यांच्या सहयोगाने ध्वनिमुद्रिका संचासह केला. बाल संगीत या पुस्तकाचा हिंदी अनुवादही प्रसिद्ध झाला आहे. छंदशास्त्र व संगीत (१९८०) हा त्यांचा मराठी संगीतातील वृत्त, जाति, छंद व त्यांचे सांगीतिक रूप यांचे समग्र दर्शन घडविणारा मौलिक ग्रंथ आहे. शिवाय त्यात शास्त्रकाराची शिस्तही आढळते. महाराष्ट्रातील सांगीतिक स्थितीवरील माझी मुशाफिरी (१९८४) हा ग्रंथ म्हणजे त्यांचे संगीतशास्त्रातील महत्त्वाचे योगदान होय. त्यात संगीताभिरूची संवर्धनाचा उद्देश साध्य झाला आहे. त्यांची मांडणी लाघवी, भाषा साधी व सुलभ असून त्यातून त्यांचे संगीतविषय सखोल ज्ञान व्यक्त होते. ध्वनिमुद्रिकांद्वारे प्रत्यक्ष श्रवणानुभूती देण्याचा उपक्रमही त्यांनी राबविला. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. संगीतविषयक पुस्तंकाखेरीज जे. पी. नाईक (१९८२) या शिक्षणतज्ञाचे चरित्रही त्यांनी लिहिले आहे.

बाबूरावांनी गावोगावी संगीतविषयक व्याख्याने (विशेषत: संगीताचे रसग्रहण) शिबीरे, कार्यशाळा आदी कार्यक्रमाद्वारे संगीतअभिरूची संवर्धनाचे काम केले. त्यांनी लोबोंसह इंग्रजी भाषेतून प्रात्यक्षिकांसह भाषणे दिली. ग्रामीण भागातील संगीत शिक्षकांना बालसंगीत व ध्वनिमुद्रिकांद्वारे संगीत शिक्षण कसे द्यावे याचा वस्तुपाठ दिला.

महाराष्ट्र तमाशा परिषदेच्या अधिवेशनाचे बाबूराव अध्यक्ष होते ( पुणे-१९५६). तेथे त्यांनी लावणी संगीतप्रकारावर व्याख्यान दिले. ‘धन्य ते गायनी कला’ ही संगीत रसग्रहणपर मालिका त्यांनी आकाशवाणीवर सादर केली. यांत बाबूरावांचे भाष्य व सरला भिडे यांचे गायन असे स्वरूप होते. बाबूरावांनी भारती वैशंपायन, माणिक  भिडे, सरला भिडे, सुधीर पोटे आदींना मार्गदर्शन केले.

बाबूरावांच्या पत्नीचे नाव शांताबाई. या दांपत्यास चार अपत्ये.

संगीतक्षेत्रामध्ये अगदी अखेरपर्यंत रमलेल्या बाबूराव जोशी यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. महाराष्ट्र राज्यशासनाचा ललित आणि सौंदर्यशास्त्र गटातील सर्वोत्कृष्ट वाङ्मयासाठीचा पुरस्कार (१९८१-८२) त्यांना छंदशास्त्र आणि संगीत या ग्रंथासाठी मरणोत्तर देण्यात आला.

संदर्भ : जोशी ,बाबूराव, माझी मुशाफिरी,  १९८४.

समीक्षक : सु. र. देशपांडे