अर्काटचे नबाब : मोगल काळात कर्नाटकच्या नबाबांनाच अर्काटचे नबाब म्हणत. प्राचीन काळी राष्ट्रकूट, चालुक्य, चोल, पल्लव, यादव, नायक व अखेर, मराठे ह्यांचा अंमल ह्या मुलखावर होता. मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकारखान ह्या सुभेदारास कर्नाटकचे नबाबपद दिले. त्यानंतर दाऊदखान पन्नी, सादतुल्लाखान व त्याचा पुतण्या दोस्त अली यांना अनुक्रमे येथील नबाबपद मिळत गेले.
वास्तविक कर्नाटकच्या पोटसुभ्याचा नबाब म्हणून दोस्त अलीने निजामुल्मुल्क याच्या तंत्राने चालावयाचे; पण निजाम उत्तरेकडील राजकारणात व मराठ्यांशी लढण्यात गुंतल्याची संधी साधून दोस्त अली स्वतंत्रपणे वागू लागला. त्याने त्रिचनापल्ली जिंकून घेतल्याने तेथील नायकाने मराठ्यांची मदत मागितली. तेव्हा चौथाई वसुलीच्या निमित्ताने रघूजी व फत्तेसिंगराव भोसले यांनी कर्नाटकवर स्वारी केली. तीत १७४० मध्ये दोस्त अली खान मारला गेला व अर्काटचा पाडाव झाला. भोसल्यांनी त्रिचनापल्ली घेऊन दोस्त अलीचा जावई चंदासाहेब यास कैद करून साताऱ्यास पाठविले. यानंतर प्रथम दोस्त अलीचा मुलगा सफदर अली खान व नंतर अल्पवयी नातू गादीवर आले. त्यांचे खून झाल्यावर तेथील कारभार करण्यासाठी निजामाने मुहम्मद अन्वरुद्दीन खानची नेमणूक केली, पण तो अर्काटचा नबाब म्हणून स्वतंत्रपणे वागू लागला. हाच ह्या घराण्याचा मूळ पुरुष होय.
फ्रेंचांनी १७४८ मध्ये चंदासाहेबाची मराठ्यांच्या कैदेतून सुटका केली. अर्काटच्या नबाबपदावर तो आपला हक्क सांगू लागला. तेव्हा चंदासाहेब व अन्वरुद्दीन यांच्यात संघर्ष सुरू होऊन १७४९ च्या अंबूरच्या लढाईत अन्वरूद्दीन मारला गेला. तत्पूर्वी मे १७४८ मध्ये निजामुल्मुल्क मरण पावला आणि त्याच्या मुला-नातवांत वारसायुद्ध सुरू झाले. तेव्हा दक्षिणेच्या सुभेदारीवर व नबाबपदावर आपला उमेदवार यावा म्हणून इंग्रज व फ्रेंच यांत धडपड सुरू झाली. १७४८–५६ दरम्यान त्यांच्यात अनधिकृत युद्ध झाले. अर्काटच्या नबाबपदासाठी इंग्रजांनी अन्वरुद्दीनचा मुलगा मुहम्मद अली याचा पक्ष घेतला व क्लाइव्हच्या अर्काट विजयानंतर मुहम्मद अली निर्वेधपणे नबाबपद उपभोगू लागला. राज्यकारभाराकडे पूर्ण दुर्लक्ष करून विलासात दंग राहिल्याने मुहम्मद अली नेहमी पैशाच्या अडचणीत येई. त्यामुळे इंग्रजांनी मुहम्मद अलीस वार्षिक तनखा देऊन कर्नाटकचा कारभार स्वतःकडे घेतला. नंतर मुहम्मद अली व त्याचा मुलगा उमदतुल-उमरा यांनी टिपूशी कट केल्याच्या आरोपावरून १८०१ मध्ये इंग्रजांनी अर्काटचे राज्य खालसा केले; पण मुहम्मद अलीचा नातू अजीम उद्दौला यास नाममात्र नबाब म्हणून मान्यता दिली.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.