मनुची, निकोलाव : (१६३९-१७१७).
सतराव्या शतकात भारतात आलेला एक इटालियन प्रवासी. त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. तो मूळचा व्हेनिसचा रहिवासी असावा. जग पाहण्याच्या इच्छेने वयाच्या चौदाव्या वर्षी (१६५३) तो घरातून पळाला व व्हेनिस बंदरामधून स्मिर्ना या शहराकडे जाणाऱ्या एका जहाजावर लपून बसला. लॉर्ड बेलोमाँट या इंग्रज सरदाराने त्याला आपल्या नोकरीत घेतले. त्याच्या बरोबर आशिया मायनरवरून तो पर्शियात पोहोचला. पुढे ईस्ट इंडिया कंपनीच्या सी हॉर्स जहाजात बसून तुर्कस्तान, इराणमधून १६५६ साली भारतात सुरत या ठिकाणी आला. तेथून बऱ्हाणपूर, ग्वाल्हेर, धोलपूर मार्गे आग्र्याला पोहोचला. वाटेत मनुचीचा मालक लॉर्ड बेलोमाँट होडल या गावी मरण पावला. नंतर त्याला मोगल बादशाह शाहजहान याचा मोठा मुलगा दारा शुकोव्ह याच्या तोफखान्यात ८० रुपये पगारावर नोकरी मिळाली. समूगडच्या लढाईत दाराचा पराभव झाला. मुरादबक्षला कैद करण्यात आले, तेव्हा तो औरंगजेबाच्या पदरी काही काळ नोकरी करत होता. पुढे हा परत दाराला जाऊन मिळाला. दारा मारला गेल्यावर औरंगजेबाने त्याला नोकरी देऊ केली, पण त्याने ती नाकारली. या काळात शिपाईगिरी, वैद्यकीय व्यवसाय व राजनैतिक शिष्टाई इ. विविध प्रकारची त्याने कामे केली.
मनुचीने १६६३ मध्ये पाटणा, डाक्का येथे प्रवास केला. या वेळी त्याची किरतसिंगामार्फत मिर्झाराजा जयसिंहाशी ओळख झाली. १६६४ मधे जयसिंहाची दख्खनवर नेमणूक झाली. जयसिंहाबरोबर तो राजस्थान, दक्षिण हिंदुस्थानात गेला. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदर येथील लढाईच्या वेळी मिर्झाराजा जयसिंहाच्या तळावर तो असताना त्याची छ. शिवाजी महाराजांशी भेट झाल्याचे त्याने लिहून ठेवले आहे. पुढे जयसिंहाच्या विजापूरवरील मोहिमेत मनुचीने भाग घेतला. पुढे गोव्याहून परतत असताना तो पंढरपुरात आला, तेव्हा त्यास लुटल्याचे त्याने लिहिले आहे.
लाहोर शहराला बारा दरवाजे असल्याचे त्याने नमूद केले आहे. काबुलमध्ये गेला असताना तो नेताजी पालकर यांस भेटल्याचे सांगतो. त्याला फार्सी व उर्दू भाषांचे तसेच मोगल दरबारातील रीतिरिवाजांचे चांगले ज्ञान होते. पुढे १६८० मध्ये औरंगजेबाच्या जोधपूर मोहिमेत शाह आलम बरोबर त्याने भाग घेतला होता, त्यावेळी अजमेरच्या वाटेवर असताना धुमकेतू बघितल्याची नोंद केलेली आढळते.
१६८२-८३ मध्ये छ. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना पेचात पकडले होते. त्यावेळी तत्कालीन गोव्याच्या गव्हर्नरने मनुचीला पोर्तुगीजांच्या वतीने छ. संभाजी महाराजांकडे वकिलीसाठी पाठवले होते; पण ती भेट निष्फळ ठरली. पुढे सेंट इस्ट्व्हाव हा किल्ला छ. संभाजी महाराजांनी जिकून घेतला. त्यावेळीही मनुचीला वकिलीसाठी पाठविण्यात आले होते. पुढे शाह आलमलासुद्धा हा वकील म्हणून भेटला व त्याच्या बरोबर अहमदनगर येथे आला. औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीच्या वेळी मोगलांच्या कारवायांना कंटाळून तो मद्रास येथील फोर्ट सेंट जॉर्ज येथे पोहोचला व स्थायिक झाला. त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय पुन्हा सुरू केला. उच्च शिक्षणाचा अभाव असूनही मर्यादित वैद्यकीय ज्ञानावर त्याने वैद्यकीय व्यवसाय सुरू करून स्वतःच्या हुशारीने त्यात चांगले यश मिळविले व द्रव्यसंचयही केला. या व्यवसायामुळे त्याचा देशभर संचार झाला. १६८६ च्या सुमारास एलिझाबेथ क्लार्क या विधवेशी त्याने विवाह केला. त्यांना एक मुलगा झाला; पण तो अल्पायुषी ठरला. त्याची पत्नी १७०६ मध्ये निधन पावली. तेव्हा त्याने आपले वास्तव्य पाँडिचेरीत हलविले; पण अखेरच्या दिवसांत तो पुन्हा मद्रासला आला असावा. मद्रासच्या गव्हर्नरने मद्रास येथील टॉमस क्लार्कची सर्व संपत्ती, त्याचे घर व बागा त्यास देऊन त्याचा सन्मान केला. मद्रासचा तत्कालीन गव्हर्नर टॉमस पीट याचा मनुचीवर खूप विश्वास होता, त्याने मनुचीकडे बरीच कामे सोपवली होती असे दिसते. इ. स.१७०० च्या सुमारास नवीन ईस्ट इंडिया कंपनीने दुभाषा म्हणून मनुचीने यावे असा प्रयत्न केला गेला; परंतु आता वय झाले आहे, डोळ्यांनी नीट दिसत नाही या सबबीवर त्याने काम करण्याचे नाकारले. मनुचीचा मृत्यू मद्रास येथेच झालेला असावा. मृत्युसमयी त्याची संपत्ती ३० हजार पॅगोडा म्हणजे १० हजार पौंड असावी.
मद्रासमधील वास्तव्यात त्याने आपल्या बहुविध आठवणी फ्रेंच व पोर्तुगीज भाषांत लिहून काढल्या आणि चार विभागांत प्रसिद्ध करण्यासाठी त्या पॅरिसला पाठविल्या. या आठवणीत त्याने छ. शिवाजी महाराजांसह तत्कालीन प्रसिद्ध राज्यकर्ते, सेनानी यांची अस्सल चित्रे काढून घेतली होती. त्याला औरंगजेब, पोर्तुगीज आणि जेझुइट यांच्याबद्दल तिटकारा होता. भारतातील शहरी वैभव व गावातील दारिद्र्य यांचे त्याने उत्तम चित्रण केलेले आढळते. धार्मिक बाबींविषयीचे त्याचे लिखाण पाल्हाळीक असून ते वास्तवतेने व काल्पनिकतेने भरलेले आहे. काही अपवाद वगळता त्याच्या ग्रंथातील स्थल-कालाचे तपशील आणि विधाने ऐतिहासिक दृष्ट्या विश्वास ठेवण्यायोग्य वाटतात. त्याच्या या मूळ पुस्तकाचा काही भाग फ्रेंच, इटालियन तर काही भाग पोर्तुगीज भाषेत लिहिला होता. त्याच्या आठवणींच्या स्तोरिआ दो मोगोर या पुस्तकाचे विल्यम आयर्विन याने अ पेपीस ऑफ मुघल इंडिया या नावाने इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले (१९०७). त्याची दुसरी आवृत्ती १९८१ मध्ये प्रसिद्ध झाली. या पुस्तकाचे मराठीत भाषांतर सारांश स्वरूपात ज. स. चौंबळ यांनी असे होते मोगल या शीर्षकाने प्रसिद्ध केले (१९७४). मोगल काळ आणि मराठ्यांचा इतिहास यांची माहिती देणारा एक उपयुक्त साधनग्रंथ म्हणून मनुचीच्या या लिखाणास वेगळे महत्त्व आहे.
संदर्भ :
- Eraly, Abraham, The Mughal World, London, 2007.
- चौंबळ, ज. स. अनु. असे होते मोगल, मुंबई, १९७४.
समीक्षक : महेश तेंडुलकर