यूरोपमधील स्पेन आणि पोर्तुगाल या दोन देशांतून वाहणारी नदी. आयबेरियन द्वीपकल्पावरील सर्वाधिक लांबीच्या नद्यांपैकी ही एक नदी आहे. आयबेरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागातील क्वेंग्का या डोंगराळ प्रदेशातून आणि ला मांचा मैदानाच्या दक्षिणेकडून वाहत आलेले थांग्कारा, हीग्वेला, हाव्हालोन, ग्वाद्द्याना आल्तो, ग्वाद्द्याना बाजो, आथ्वेर हे ग्वाद्द्याना नदीचे शीर्षप्रवाह आहेत. या शीर्षप्रवाहांमुळे स्यूदाद रीआलजवळ पाणथळ प्रदेश निर्माण झाला आहे. या पाणथळ प्रदेशाच्या नैर्ऋत्येस काही अंतरावर थांग्कारा व हाव्हालोन या दोन शीर्षप्रवाहांचा संगम होतो. या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाहच पुढे ग्वाद्द्याना नावाने ओळखला जातो. स्पेनच्या दक्षिण-मध्य भागातून पोर्तुगाल सीमेपर्यंत ती पूर्व-पश्चिम दिशेत वाहते. त्यानंतर ती स्पेन-पोर्तुगाल यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून तसेच आग्नेय पोर्तुगालमधून दक्षिण दिशेत वाहत जाऊन अटलांटिक महासागरातील कादिझ आखाताला मिळते. स्येरा मोरेना या पर्वतीय प्रदेशात नदीपात्रात अनेक द्रुतवाह आढळतात. या नदीची एकूण लांबी ८१८ किमी. असून त्यापैकी ५७८ किमी. लांबीचा प्रवाहमार्ग स्पेनमधून, १४० किमी. पोर्तुगाल देशातून, तर उर्वरित १०० किमी. लांबीचा प्रवाह स्पेन-पोर्तुगाल यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरून वाहतो. ग्वाद्द्याना नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र ६०,७४८ चौ.किमी. असून त्यापैकी सुमारे ८३ टक्के क्षेत्र स्पेनमध्ये आणि उर्वरित १७ टक्के क्षेत्र पोर्तुगालमधील आहे. ग्वाद्द्याना नदीच्या सुमारे ३० प्रमुख उपनद्या आहेत.

प्राचीन काळी रोमन लोक या नदीस फ्लूमेन एनस म्हणजे ‘बदकांची नदी’ असे संबोधत असत. पुढे मूरीश वसाहतींच्या काळामध्ये या नदीस वाडी अ‍ॅना (वाडी या अरेबिक शब्दाचा अर्थ नदी) असे म्हटले जाई. वाडी अ‍ॅना या शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन त्याचे ग्वाद्द्यानामध्ये रूपांतर झाले.

अल्कीवा धरण

ग्वाद्द्याना नदीच्या उगमाकडील प्रदेशामध्ये भरपूर पर्जन्यमान असल्याने तेथे अनेक दलदलीचे प्रदेश निर्माण झाले आहेत. स्पेनमधील या नदीच्या खोऱ्यातील ओहोझ-देल-ग्वाद्द्याना हा दलदलीचा प्रदेश वन्य पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून संरक्षित केला आहे. अ‍ॅल्काझर द सॅन ह्वानजवळील प्रदेशात प्रामुख्याने सच्छिद्र चुनखडक असल्याने (कार्स्ट भूमिस्वरूपामुळे) येथे ग्वाद्द्याना नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अनेक खंडित प्रवाह आढळून येतात. अरुंद पात्र आणि भरपूर पाणी या दोन गोष्टींमुळे उगमाकडील टोलीडो या पर्वतीय प्रदेशामध्ये या नदीवर अनेक जलसिंचन व जलविद्युतनिर्मितीचे प्रकल्प उभारले आहेत. स्पेनमध्ये जलसिंचनाचे सर्वांत जास्त प्रकल्प ग्वाद्द्याना नदीवर उभारलेले आहेत. ग्वाद्द्याना नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण ३० पेक्षा जास्त धरणे आहेत. त्यांपैकी अल्कीवा धरण हे पश्चिम यूरोपमधील सर्वांत मोठे धरण आहे. हे धरण पोर्तुगालमधील बेझा प्रांतातील मोरा या गावाजवळ आहे. याशिवाय गार्सीआ सोला, सिजारा, एल विकारिओ आणि ओरेयाना ही स्पेनमधील महत्त्वाची धरणे आहेत. स्पेनच्या पश्चिम भागातील या नदीखोऱ्यात पर्जन्यमान अल्प आहे. त्यामुळे या प्रदेशाच्या दृष्टीने ग्वाद्द्याना वा तिच्या उपनद्यांना आणि त्यावरील प्रकल्पांना विशेष महत्त्व आहे.

शेवटच्या टप्प्यामध्ये ग्वाद्द्याना नदीमध्ये जलवाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. नदीच्या मुखापासून आत सुमारे ६८ किमी. अंतरावरील मार्तोला या शहरापर्यंत लहान बोटींद्वारे जलवाहतूक चालते. त्याचबरोबर या नदीमध्ये नौकाक्रिडा स्पर्धा भरविली जाते. या शहराच्या उत्तरेस सुमारे १७ किमी.वर पुलो दो लोबो हा दक्षिण पोर्तुगालमधील सर्वांत उंच (२० मी.) धबधबा आहे. स्यूदाद रीआल, मेरिदा, बादाहोझ (स्पेन), सर्पा, मार्तोला (पोर्तुगाल) ही नदीतीरावरील प्रमुख शहरे आहेत. आइअमाँटे (स्पेन) आणि व्हीला रीआल दे सांतो आंतोन्यो ही ग्वाद्द्याना नदीच्या मुखाजवळील प्रमुख नगरे व बंदरे आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी