रशिया आणि कझाकस्तानमधून वाहणारी नदी. लांबी २,४२८ किमी., जलवाहन क्षेत्र २,३७,००० चौ. किमी. यूरोपमधील व्होल्गा आणि डॅन्यूब या नद्यांनंतरची ही तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे. दक्षिण उरल पर्वतातील मौंट क्रुगलायाजवळ उगम पावणारी ही नदी त्या पर्वतीय प्रदेशाच्या पूर्व उतारावरून वाहते. सुरुवातीला कमी उंचीच्या, अरण्यमय पर्वतीय प्रदेशातून व त्यानंतर स्टेप गवताळ प्रदेशाच्या उत्तर भागातून वाहत जाऊन ती दक्षिणेस कॅस्पियन समुद्राला मिळते. उरल नदीच्या प्रवाहमार्गाला आशिया व यूरोप या खंडांदरम्यानची सरहद्द

उरल नदी, कझाकस्तान

मानली जाते. उगमापासून ऑर्स्क शहरापर्यंतच्या पहिल्या टप्प्यात ती दक्षिणेस वाहते. याच टप्प्यात तिच्या काठावर मॅग्निटोगोर्स्क हे रशियातील महत्त्वाचे पोलाद निर्मिती केंद्र वसले आहे. ऑर्स्क येथे तिला ऑर ही उपनदी येऊन मिळते. ऑर्स्क व ऑर यां नद्यांच्या संगमानंतर उरल पश्चिमवाहिनी होते. येथून पुढे सु. ३०० किमी. पश्चिमेस वाहत गेल्यानंतर ओरेनबर्ग येथे तिला सकमारा ही उपनदी येऊन मिळते. ओरेनबर्ग शहराजवळून पश्चिमेस वाहत गेल्यानंतर उरल्स्क (ओरल) येथून ती पुन्हा दक्षिणवाहिनी होते. प्रथम उरल पर्वत, त्यानंतर उरल पर्वताच्या दक्षिण टोकाजवळील पायथ्यालगतच्या टेकड्या पार करून पुढे आल्यानंतर स्टेपीज प्रदेशाच्या अरुंद पट्ट्यातून, अर्धवाळवंटी सखल प्रदेशातून तसेच कॅस्पियन द्रोणीतील लवणयुक्त पाणथळ भागातून वाहत गेल्यानंतर अतिराउ शहराच्या दक्षिणेस काही अंतरावर वेगवेगळ्या फाट्यांनी कॅस्पियन समुद्राला ती मिळते. मुखाजवळ वृक्षाच्या आकाराचा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. सखल भागात नदीचे पात्र उथळ असून प्रवाहमार्गात अनेक नागमोडी वळणे आढळतात.

उरल नदीच्या खोऱ्यात पर्जन्याचे प्रमाण बरेच कमी आणि अनिश्चित स्वरूपाचे असते. पर्वतीय प्रदेशातील वितळणाऱ्या बर्फापासून तिला सर्वाधिक पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नदीतील पाण्याच्या प्रमाणात सातत्याने चढ-उतार होत असतात. सामान्यपणे नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत नदी गोठलेली असते. वसंत ऋतूत नदीला सर्वाधिक पाणी असते. मॅग्निटोगोर्स्क येथील लोह-पोलाद उद्योगाला पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही नदी महत्त्वाची आहे. मॅग्निटोगोर्स्क येथे दोन जलाशय निर्माण करण्यात आले आहेत. उराल्स्कच्या खाली आणखी एक जलाशय निर्माण करण्यात आला आहे. इरिक्लीन्स्काय गावाजवळ उरल नदीवर धरण आणि जलविद्युतशक्ती निर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे. नदीपासून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे सखल भागात कृषी विकास घडून आला आहे.

नदीमध्ये मासेमारी केली जात असून सॅमन, स्टर्जन, हेरिंग इत्यादी जातीचे मासे पकडले जातात. नदीपरिसरातील पाणथळ प्रदेशात आणि त्रिभूज प्रदेशात विविध स्थलांतरित पक्षी आढळतात. नदीमुखापासून ते उराल्स्क शहरापर्यंत या नदीतून जलवाहतूक केली जाते. मुखाजवळील अतिराउ हे कझाकस्तानातील महत्त्वाचे खनिजतेल उत्पादक केंद्र असून तेथे बंदरही आहे. ओरेनबर्ग आणि उराल्स्क येथे नदीवरून लोहमार्ग गेले आहेत. उरलच्या उपनद्यांपैकी कुशूम, देरकूल, चागन, इर्तेक, उट्व्हा, ऑर, सॅल्म्यीस, लेक या डावीकडून मिळणाऱ्या; तर बोल्शाया चोब्डा, किंदेल, सकमारा, तनल्यीक या उजवीकडून मिळणाऱ्या प्रमुख नद्या आहेत.

 

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम