शी-जीआंग; सी नदी; वेस्ट रिव्हर. दक्षिण चीनमधील सर्वांत लांब नदी. लांबी १,९५७ किमी. चीनमधील यूनान उच्चभूमी प्रदेशात उगम पावल्यानंतर सामान्यपणे पूर्वेस वाहत जाऊन ती दक्षिण चिनी समुद्राला मिळते. हुंगश्वे व यू हे सिक्यांगचे प्रमुख शीर्षप्रवाह आहेत. जगामध्ये ही नदी सिक्यांग म्हणून ओळखली जात असली, तरी प्रत्यक्षात तिला वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी नावे आहेत. मुख्यतः वूजोपासूनच्या पुढील प्रवाहमार्गाला शी नदी म्हणून ओळखले जाते. चीनमधील ह्वांग हो (पीत नदी), यांगत्सी या प्रमुख नद्यांच्या तुलनेत ही नदी लांबीने कमी असली, तरी यांगत्सी खालोखाल तिच्यातून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण असते. ह्वांग हो व यांगत्सी नद्यांना उत्तर व मध्य चीनमध्ये जे महत्त्व आहे, तेच महत्त्व सिक्यांग नदीला दक्षिण चीनमध्ये आहे. सिक्यांग नदी ४,४८,००० चौ. किमी. क्षेत्राचे जलवाहन करते.

सिक्यांग नदीचे निम्म्यापेक्षा अधिक खोरे पर्वतीय असून त्या प्रदेशाची उंची सुमारे ५०० ते ३,००० मी. दरम्यान आहे. तसेच सुमारे ४० टक्क्यांपेक्षा अधिक खोरे सुमारे १०० ते ५०० मी. उंची दरम्यानच्या डोंगराळ प्रदेशाने व्यापले आहे. सखल भागातील त्रिभुज प्रदेशाने एकूण खोऱ्याच्या केवळ ५ टक्के क्षेत्रच व्यापले आहे. नदीखोऱ्यातील काही प्रदेश चुनखडी असल्याने तेथे कार्स्ट भूमिस्वरूपे निर्माण झाली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्या भूपृष्ठाखालून वाहतात. नदीपात्रात अनेक ठिकाणी घळ्या व द्रुतवाह निर्माण झाले आहेत.

सिक्यांगला अनेक महत्त्वपूर्ण उपनद्या येऊन मिळतात. त्यांपैकी उजव्या तीरावर येऊन मिळणारी शीआंग (यू) ही प्रमुख उपनदी यूनानमध्ये उगम पावून मुख्य नदीला जवळपास समांतर वाहत जाते. नानिंगजवळ शीआंग नदीला ली नदी येऊन मिळते. लीऊ व ग्वे या सिक्यांगच्या डाव्या तीरावरील प्रमुख उपनद्या आहेत. वूजो शहराच्या वरील नदीखोऱ्यातील विविध उपनद्या पर्वतीय व डोंगराळ प्रदेशातून वाहतात. वूजोच्या पुढे ती ग्वांगटुंग प्रांतात प्रवेश करते. दक्षिण ग्वांगटुंग प्रांतात कँटन (क्वांगजो) शहरापासून पुढे त्रिभुज प्रदेशास सुरुवात होते. हा त्रिभुज प्रदेश शी किमांग (पश्चिम नदी), बे किमांग (उत्तर नदी), डुंग किमांग (पूर्व नदी) आणि पर्ल या चार प्रमुख नद्यांनी निर्माण केलेला आहे. त्रिभुज प्रदेशातील पहिला प्रमुख फाटा माकाऊ शहराच्या पश्चिमेकडून, तर यूकियांग नावाचा दुसरा प्रमुख फाटा माकाऊच्या पूर्वेकडून दक्षिण चिनी समुद्राला मिळतो. खुद्द पर्ल नदीची सुरुवात कँटनपासून झालेली दिसते. सिक्यांगच्या या त्रिभुज प्रदेशास पर्लचा, ग्वांगटुंगचा किंवा कँटनचा त्रिभुज प्रदेश या नावांनीही ओळखले जाते. तसेच सिक्यांग ही पर्लची पश्चिमेकडील उपनदी असल्याचे मानले जात असून ती कँटनच्या पुढे पर्लला मिळते. सिक्यांगचे संपूर्ण खोरेच पर्ल नदीचे खोरे असून त्रिभुज प्रदेशातील इतर तीन नद्या या पर्लच्या उपनद्या असल्याचेही मानले जाते. या त्रिभुज प्रदेशाने ७,५०० चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. पर्लची नदीमुखखाडी २९ किमी. रुंदीची असून त्या खाडीच्या पूर्वेस हाँगकाँग हे सुप्रसिद्ध बेट, तर पश्चिमेस माकाऊ हे प्रसिद्ध शहर आहे. मुखाशी वानशान द्वीपसमूह आहे. मॉन्सून काळात नदीला भरपूर पाणी असते, तर हिवाळ्यात पाणी कमी होते. प्रवाहमार्गात आढळणारे द्रुतवाह व उथळ पात्र यांमुळे अंतर्गत जलवाहतुकीवर निर्बंध येतात. सिक्यांगच्या मुखापासून वूजोपर्यंतचा प्रवाह अंतर्गत जलवाहतुकीस उपयुक्त ठरतो. सिक्यांग खोऱ्यातील पर्वतीय प्रदेशात पाइन, फर, कापूर, बांबू इत्यादी वृक्षांची वने आहेत.

सिक्यांग खोऱ्यात तांदूळ, गहू, मका, ज्वारी, भुईमूग, द्विदल धान्ये, ताग, तंबाखू, ऊस, फळे ही पिके घेतली जातात. प्रवाहमार्गात मासेमारीही मोठ्या प्रमाणात केली जाते. सिक्यांगचा त्रिभुज प्रदेश हा चीनमधील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे. कुंगचुऑन, जीएनचिआंग, लाइपीन, ग्वेईपिंग, तेंगशीन, वूजो, कँटन, काउतून ही नदीजवळील प्रमुख नगरे आहेत.

समीक्षक : सं. ग्या. गेडाम