मेक्सिको या देशातील एक प्रमुख नदी. दक्षिण-मध्य मेक्सिकोतील गरेरो, मेक्सिको, मरेलस आणि प्वेब्ला या राज्यांचे जलवाहन करणारी ही नदी देशातील सर्वांत मोठ्या नद्यांपैकी एक आहे. तिची लांबी ७७१ किमी. व जलवाहन क्षेत्र १,१६,१०४ चौ. किमी. आहे. प्वेब्ला राज्यातील सॅन मार्टीन व झाहुआपन या शीर्षप्रवाहांचा संयुक्त प्रवाह रीओ आटयाक या नावाने ओळखला जातो. या शीर्षप्रवाहांचा उगम मेसा सेंट्रल या पठारी प्रदेशात होतो. रीओ आटयाक नदी बाल्सास द्रोणीतून प्रथम नैर्ऋत्येस वाहते. त्यानंतर उत्तरेकडील कॉर्डीलेरा नीओव्हाल्कॅनिया व दक्षिणेकडील सिएरा माद्रे देल सुर या पर्वतश्रेण्यांच्या मधून पश्चिमेस वाहत जाते. गरेरो राज्यात ही नदी मेस्काला या स्थानिक नावाने व त्यानंतरचा प्रवाह बाल्सास या नावाने ओळखला जातो. बाल्सास नदी गरेरो व मीचवाकान या राज्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन माँग्रोव्ही पॉइंटजवळ पॅसिफिक महासागरास मिळते. टेपाल्काटेपेक ही तिची प्रमुख उपनदी आहे.

बाल्सास नदीखोऱ्यातील हवामान समशीतोष्ण ते उपोष्ण कटिबंधीय प्रकारचे आहे. तिच्या खालच्या खोऱ्यातील हवामान मात्र आर्द्र उष्ण कटिबंधीय असून वार्षिक सरासरी तापमान १२.५° ते २८° से.पर्यंत असते. या नदीच्या खोऱ्यात पाऊस ऋतुनुसार पडत असून ९० टक्के पाऊस मे ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान पडतो. नदीच्या वरच्या खोऱ्यातील उच्चभूमी प्रदेशात वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०० ते १६० सेंमी. असून खोऱ्यातील ओसाड भागात ते ५५ सेंमी. आहे. हिचा प्रवाहमार्ग डोंगराळ प्रदेश, खोल दुर्गम दऱ्या व अनेक द्रुतवाह यांतून वाहत असल्याने ही नदी जलवाहतुकीच्या दृष्टीने उपयोगी नाही; मात्र हाच प्रवाहमार्ग जलविद्युतनिर्मितीसाठी अत्यंत उपयोगी आहे. बाल्सास नदीखोऱ्याच्या विकासासाठी इ. स. १९४७ मध्ये ‘कमीशन टेपाल्काटेपेक’ या आयोगाची स्थापना केली होती. १९६० मध्ये हा आयोग ‘बाल्सास रिव्हर कमिशन’मध्ये वर्ग करण्यात आला. जलविद्युतनिर्मिती, जलसिंचन व पूरनियंत्रण या उद्देशाने या नदीवर सात धरणे बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यांपैकी मीचवाकान राज्यातील एल् इंफिर्निलो आणि ला व्हीलीटा हे बांधून पूर्ण झालेले दोन प्रकल्प विशेष महत्त्वाचे आहेत.

एल् इंफिर्निलो धरण

एल् इंफिर्निलो हे धरण मेक्सिको सिटीच्या नैर्ऋत्येस ३२० किमी. आणि पॅसिफिक महासागर किनाऱ्यापासून आत ५६ किमी. वर बांधण्यात आले आहे (१९६४). एल् इंफिर्निलो धरणापासून खाली आणि पॅसिफिक महासागर किनाऱ्यापासून आत १५ किमी. वर ला व्हिलिटा हे धरण बांधण्यात आले आहे (१९७१). लाझारो कार्डेनास येथील लोह व पोलाद उद्योगास वीज पुरवठ्याच्या दृष्टीने हे धरण विशेष महत्त्वाचे आहे. त्याशिवाय गरेरो राज्यात कार्लस रामीरेझ ऊलूआ (एल् कारकॉल) हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. बाल्सास नदीखोऱ्यातील काही भागात जलसिंचनाच्या सुविधा असून हे खोरे शेतीच्या दृष्टीने मेक्सिकोतील अत्यंत सधन खोरे समजले जाते. बाल्सास नदीखोरे हे आद्य मका उत्पादक प्रदेशांपैकी एक असल्याचे मानले जात असून तो कालावधी सुमारे ९,००० वर्षे मागे जातो. या नदीखोऱ्यात मका, कॉफी, कापूस, ऊस, उष्ण कटिबंधीय फळे, भाजीपाला इत्यादीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.

समीक्षक : ना. स. गाडे