बडोदेकर, हिराबाई : (२९ मे १९०५ – २० नोव्हेंबर १९८९). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील मिरज येथे झाला. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अब्दुल करीमखाँ आणि ताराबाई माने यांच्या त्या कन्या. ताराबाई बडोदे सरकारच्या सेवेत होत्या. या दांपत्यास सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, कृष्णराव माने, कमलाताई बडोदेकर, सरस्वताबाई राणे ही पाच मुले. १९२२ मध्ये ताराबाई अब्दुल करीमखाँपासून वेगळ्या झाल्या आणि त्यांनी सर्व मुलांची आडनावे बदलली. त्याचवेळी हिराबाईंचे बडोदेकर हे आडनाव लावण्यात आले. हिराबाईंना घरी चंपूताई असे संबोधत असत. गाण्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या हिराबाईंना लहानपणापासून गाण्याची आवड होती; पण ताराबाईंना आपल्या मुलींनी शिकून समाजात प्रतिष्ठितपणे जगावे असे वाटत होते. कारण त्याकाळी घरंदाज मुलींनी गाणे शिकण्याची प्रथा नव्हती. हिराबाईंनी पुण्याच्या हुजूरपागा शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. पण त्यांच्या मूळ आवडीप्रमाणे त्या संगीताकडे वळल्या. त्यांचे सुरुवातीचे संगीताचे शिक्षण ताराबाईंकडे आणि मोठे बंधू सुरेशबाबूंकडे झाले. त्यांच्याकडून हिराबाईंना संगीताचे सतत मार्गदर्शन लाभत असे. ताराबाई तबल्यावर ठेका धरणे, स्वरलेखन करणे अशा गोष्टी लीलया करत. ताराबाईंचे हे कुटुंब मुंबईत स्थायिक झाल्यानंतर हिराबाईंनी आग्रा घराण्याचे उस्ताद महंमदखाँ यांच्याकडे त्यांनी तालीम घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी झाला. हिराबाईंना किराणा घराण्याची रीतसर तालीम अब्दुल वहीद खाँ यांच्याकडून १९१८ पासून १९२२ पर्यंत मिळाली.
हिराबाईंचे पहिले जाहीर गायन वयाच्या १६ व्या वर्षी गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत परिषदेमध्ये मुंबईत झाले (१९२१ ). तेथे त्यांनी पटदीप हा राग गायला. त्यांचे गाणे लोकांना आवडले व प्रसिद्धीही मिळाली. ताराबाईंनी अर्थार्जनासाठी म्हणून गिरगाव टेरेसेस या इमारतीत ‘नूतन संगीत विद्यालय’ सुरू केले होते (१९२०). तेथे सुरेशबाबू आणि ताराबाई शिकवित असत. हिराबाईही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असत. १९२२ पासून हिराबाई संगीताच्या व्यवसायात उतरल्या आणि त्यांनी स्वतंत्र जलसे करायला सुरुवात केली. १९२३ साली एच.एम.व्ही. (हिज मास्टर्स व्हॉइस) या संस्थेने हिराबाईंची ‘जया अंतरी भगवंत’ ही मराठी भजनांची पहिली ध्वनिमुद्रिका काढली. त्याचबरोबर ‘सखी मोरी रुमझुम’ ही हिंदी ध्वनिमुद्रिकाही काढली. ध्वनीमुद्रिकांसाठी आवश्यक असणारे नेमके आणि मर्यादित वेळेत प्रभावीपणे गाण्याचे तंत्र हिराबाईंनी अचूकपणे साधले होते. त्यांच्या ध्वनिमुद्रिकांना खूप लोकप्रियता व मागणी लाभली. त्यांच्या गायनाच्या सुमारे १७५ ध्वनिमुद्रिका निघाल्या. आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून १९२८ सालापासून त्यांनी गाण्यास सुरुवात केली. जवळपास ४० आकाशवाणीकेंद्रांवरून त्यांचे गाणे प्रसारीत होई. आकाशवाणी आणि ध्वनिमुद्रिका यांतून त्यांचे गाणे सर्वदूर पसरले. पुण्याच्या आर्यभूषण थिएटरमध्ये हिराबाईंनी पहिला जाहीर संगीत जलसा केला. स्वत:च कार्यक्रम लावण्यापासून ते जाहिरात करून तिकिटविक्रीपर्यंत सर्व कामे हिराबाई व त्यांच्या भावंडांनी केली. एखाद्या स्त्रीने तिकिट लावून असे जलसे करणे व त्यात शास्त्रीय संगीताचे सादरीकरण करणे ही संकल्पना तेव्हा नवी होती. यास विरोधही झाला. तो पत्करून हिराबाईंनी असे जलसे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही यशस्वी केले.
ताराबाईंनी ‘नूतन संगीत विद्यालय नाट्यशाखा’ या संगीत नाटक मंडळीची स्थापना केली (१९२९). या नाटक मंडळीच्या सौभद्र या नाटकातून हिराबाईंनी सुभद्रेची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केले (५ सप्टेंबर १९२९).यातील त्यांनी गायलेली गाणी गाजली. यानंतर साध्वी मीराबाई (लेखक – स. अ. शुक्ल),संशयकल्लोळ, युगांतर (लेखक – ना. सी. फडके), पुण्यप्रभाव, विद्याहरण तसेच जागती ज्योत (मामा वरेरकर), स्त्री-पुरुष (लेखक – न. ग. कमतनूरकर) इत्यादी नाटकांतूनही भूमिका केल्या. नंतर ही नाट्यसंस्था बंद पडली. त्यानंतर रंगभूमीवर १९६५ पर्यंत अधूनमधून त्या भूमिका करत राहिल्या. हिराबाईंनी चित्रपटातही भूमिका केल्या. मो. ग. रांगणेकर यांच्या सुवर्ण मंदिर (१९३४), बाबूराव पेंटर यांच्या प्रतिभा (१९३७) व नंतर रवींद्र चित्रच्या संत जनाबाई (१९३८) मध्ये त्यांनी भूमिका केल्या. अनेक चित्रपटांकरिता पार्श्वगायनही केले. त्यांनी १९४९ साली गाण्यासाठी आफ्रिकेचा दौरा केला. तसेच भारतीय शिष्टमंडळाबरोबर १९५३ साली त्यांनी चीनचा दौरा केला.
कोलकात्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांना गाण्याचे आमंत्रण मिळाले (१९३७). जलंदरला दरवर्षी हरिवल्लभ मेळा भरत असे, या मेळ्यात गाणाऱ्या त्या पहिल्या स्त्री कलाकार होत्या (१९४१). त्यांनी संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी विविधप्रसंगी संगीताचे कार्यक्रम केले. विविध संगीत परिषदांमध्ये त्यांनी सातत्याने गायनाचे सादरीकरण केले. उस्ताद अब्दुल करीमखाँ आणि रामकृष्णबुवा वझे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य संगीत महोत्सवात दि. ८ डिसेंबर १९७३ रोजी गाणे सादर केले. त्यानंतर त्यांनी गायनाच्या जाहीर कार्यक्रमातून निवृत्ती स्वीकारली. पण त्यांच्या संगीताच्या तालमी चालू राहिल्या.
हिराबाईंनी अनेक गानप्रकार गायले. राग संगीताबरोबरच नाट्यपदे, ठुमरी, भावपदे, भजन, अभंग त्या आवर्जून गात असत. त्यांनी गाण्यातून भावनिकता आणि वैचारिकता यांचा सुरेख मेळ साधून ते संगीत जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. अत्यंत तलम, रेशमी, सुरेल आलापी आणि तारषड्जाचा हमखास प्रभावी लगाव ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये. सोज्वळपणा व शालीनता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुण त्यांच्या गाण्यातही आविष्कृत होत असे. शांत व संयमी भाव हे त्यांच्या अभिव्यक्तीचे वैशिष्ट्य होते. हिराबाईंनी स्त्रियांच्या गायनाच्या सादरीकरणाला शालीनता, शिस्त, प्रतिष्ठितपणा आणि भारदस्तपणा प्राप्त करून दिला. ज्या काळी हिराबाई मैफली करीत असत, त्याकाळी गाण्याच्या बैठकी सर्वसाधारणपणे राजदरबारी किंवा एखाद्या धनिकाकडे, इनामदाराकडे वा जमीनदाराकडे खाजगी स्वरूपाच्या होत असत. इतर गायनाचे कार्यक्रम मुख्यत: कलावंतिणींचे असायचे. त्यांत अदाकारीला महत्त्व होते. त्यामुळे या सादरीकरणात काही अनिष्ट प्रथाही रूढ झाल्या होत्या. हिराबाईंनी मात्र आपल्या मैफलींत बैठकीवर बसून शांतपणे, हातवारे न करता, शिस्तीने आणि भारदस्तपणे गाण्याचे सादरीकरण करण्याचा पायंडा पाडला आणि स्त्रियांचे गाणे गंभीरपणे, रसास्वद घेत, स्वरानंद अनुभवीत ऐकण्याची सवय श्रोत्यांना लावली.
१९२४ साली सोलापूरमधील माणिकचंद गांधी या खानदानी श्रीमंत गृहस्थांशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या मुलाचे नाव गुरुनाथ होय.
हिराबाईंना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. किर्लोस्कर थिएटरतर्फे आयोजित केलेल्या जलशात सर चुनीलाल मेहता यांनी त्यांना ‘गानहिरा’ या पदवीने गौरविले. मुंबई आकाशवाणीने त्यांना १५ ऑगस्ट १९४७ या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी राष्ट्रगीत गाण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. मराठी नाट्यपरिषदेने बालगंधर्व सुवर्णपदक देऊन त्यांचा सन्मान केला (१९६६). त्यांना भारत सरकारने पद्मभूषण किताबाने गौरविले (१९७०). त्या विष्णुदास भावे सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या (१९७४). कोलकात्याच्या आय. टी. सी. संगीत रिसर्च अकादमीने त्यांचा सन्मान केला.
हिराबाईंचा शिष्यपरिवार मोठा आहे. त्यांच्या भगिनी सरस्वतीबाई राणे, प्रभा अत्रे, मालती पांडे, जानकी वैद्य (अय्यर), मीरा परांजपे, सुलभा ठकार इत्यादींचा त्यांच्या शिष्यवर्गात समावेश होतो.
हिराबाईंचे वयाच्या ८४ व्या वर्षी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
संदर्भ :
- हुमणे, राजाराम, धन्य जन्म जाहला, पुणे, १९८०.
https://www.youtube.com/watch?v=rIVOVfXxVKQ
समीक्षण : सु. र. देशपांडे