मोहिते, शेषराव माधवराव : ग्रामीण कादंबरीकार आणि शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते. १९८० नंतरच्या पिढीतील महत्त्वाचे ग्रामीण कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख आहे. व्हंताळ (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथे एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षण व्हंताळ, बलसूर, परभणी येथे झाले. कृषी विस्तार या विषयासाठी जी. जी. नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनात पीएच. डी. ही पदवी मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे १९८८ मध्ये पूर्ण केली. विद्यार्थिदशेत असताना जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीचे संयोजक म्हणून (१९८०-८१) जबाबदारी त्यांनी सांभाळली. १९८० पासून शेतकरी चळवळीत सक्रीय. शेतकरी चळवळ, जेम्स हेरियट, अलेक्स हॅले, मुन्शी प्रेमचंद्र, लिओ टॉलस्टॉय, मॅग्झीन गॉर्की, साने गुरुजी, जी. ए. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे, उद्धव शेळके, दया पवार यांच्या साहित्याच्या वाचनातून त्यांची वाङ्मयीन जडणघडण झाली. विद्यार्थी दशेत मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे वरिष्ठ छात्र संशोधक म्हणून १९८५-८६ या काळात त्यांनी कार्य केले. १९८६ पासून राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे पीकशास्त्र विषयाचे अध्यापक म्हणून काम केले.

बरा हाय घरचा गोठा (१९८३) हा मोहिते यांचा विद्यार्थीदशेतील पहिला कथासंग्रह. या कथासंग्रहातून खेड्यातले जीवन तटस्थतेले मांडले आहे. शेतकरी कुटुंबातील शेतकर्‍यांच्या मुलाची मानसिकता या कथासंग्रहालयातील कथांमध्ये मांडली आहे.त्यांचा मूळ पिंड कवितेचा आहे. पंधरा ऑगस्ट कवा हाय  ही त्यांची कविता बरीच गाजली. असं जगणं तोलाचं (१९९४) ही आत्मचरित्रात्मक कादंबरी होय. शेतकरी कुटुंबातील बालपण त्यात चितारले आहे. आत्मपर अनुभूतीतून शेतकरी जीवनातील वाताहतीचा तीत अचूकपणे वेध घेतला आहे. शेतकरी संघटनेच्या कार्याने त्यातील सक्रिय सहभागाने शेतकर्‍यांच्या समस्यांकडे एक डोळसवृत्तीने बघणारा लेखक यातून दिसतो. याच कादंबरीचा पुढचा भाग धूळपेरणी (२००१) ही कादंबरी होय.या कादंबरीत भाषा, लोकव्यवहार, राजकीय अंतःप्रवाह, सामाजिक संबंध, आर्थिक ओढग्रस्तता, नैतिक बंध अशा अनेक अंगाने मराठवाड्यातील एका खेड्याचे रेखिव चित्रण येते. यातील सगळीच पात्रे आपल्याला जीवंतपणाचा प्रत्यय देणारी आहेत. ज्या मुळांपासून कादंबरीचा नायक तुटत जातो. त्यांचा रसरशीतपणा आणि व्याप विस्तार तर लेखकाने फारच नेमकेपणाने उभा केला आहे. शेतकरी कुटुंब, परिवार, गावकी आणि प्रशासन यांचे हुबेहुब रेखाटन केले आहे.

शेती व्यवसायातील अरिष्ट (२००७) या वैचारिक पुस्तिकेत मोहिते यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे स्वरूप तर सांगितलेले आहेच. त्याचबरोबर त्याच्या कारणांची विस्ताराने चर्चा केली आहे. ‘बोलिलो जे कांही’ (२०१०) या ललित गद्य ग्रंथात समकालीन  वास्तव टिपताना आपल्या देशातील प्रमुख व्यवसाय राहिलेल्या शेतीबद्दल, शेतीशास्त्रातील पदवी, चळवळीचा प्रत्यक्ष अनुभव व कुणब्याच्या घरातील जन्म यामुळे त्यांच्या शब्दांना वेगळचं वजन प्राप्त झालं आहे. लेखक हा फक्त ललित लेखक नसतो तर समाजाच्या एकूणच घडामोडीत सहभागी असलेला जबाबदार घटक असतो. ह्याची साक्ष यातून दिसते. ग्रामीण साहित्यः बदलते संदर्भ (२०१२) या ग्रंथात त्यांनी साहित्यातील बदलत्या घडामोडींचा वेध घेतलेला आहे.

शोध गुणवत्तेचा (२००२), ऐहिक माझे  (२०१७, सूर्यनारायण रणसूभे यांच्या निवडक वैचारिक लेखांचा संग्रह) या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे. असं जगणं तोलाचं (१९९४) या कादंबरीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा वा. म. जोशी सर्वश्रेष्ठ साहित्य पुरस्कार (१९९४), भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान, औरंगाबाद यांचा शेतकरी साहित्य पुरस्कार (१९९९), धूळपेरणी (२००१) या कादंबरीस यशवंतराव दाते स्मृती संस्था, वर्धा यांचा बाबा पद्मनजी उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (२००२), मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, नरहर कुरुंदकर साहीत्य पुरस्कार (२००२), महाराष्ट्र शासनाचा हरी नारायण आपटे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार (२००२) उर्मी प्रतिष्ठान, जालना मुक्ताई पुरस्कार (२०१२) इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. अ. भा. शेतकरी साहित्य संमेलन, गडचिरोली (२०१७) या संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे.

संदर्भ :

  •  मोरे, संगीता (संपा.), शेषराव मोहितेंची कादंबरी : स्वरूप आणि जाणिवा, मैत्री प्रकाशन, लातूर, २०११.