कनकमंजिरी : रघुनाथ कृष्ण मुळे यांची कादंबरी. विनायक नारायण आचार्य या प्रकाशकांनी तत्त्वविवेचक छापखान्यात छापून १८९० साली प्रसिद्ध केली. कादंबरी अद्‌भुतरम्य स्वरुपाची असून बोधपर आहे. या कादंबरीला पौराणिक पार्श्वभूमी आहे. धैर्यसागर, सोमकांत, प्रेमचंद्र या तिघांच्या मैत्रिचा महिमा आणि इंद्रपूरच्या राज्यकारभरातील क्रुरकर्म्याचे षडयंत्र असे या कादंबरीचे आशयसूत्र आहे. कादंबरीच्या रचनेमागचा हेतू सांगताना लेखक म्हणतो, “हल्ली विशेषकरुन पाश्चमात्यानुकरणाने पज्याशनेबल स्त्री शिक्षण बरेच मानून आमच्या देशभगिनीस त्याची विशेष अभिरुची लागली आहे. म्हणून अशा बिकट प्रसंगी त्यास बोधपर सदाचार संपन्न पातिव्रत्य मार्गसूचक अशी मनोरंजक कादंबरी वाचण्यास मिळून सूमार्गाचेच वळण लागेल. ह्या उद्देशाने ही कनकमंजिरी  कादंबरी रचली आहे.” कादंबरीत इंद्रपूर नामक राज्य कल्पिले आहे. तिथे नितीसंपन्न, क्षमाशील व्यक्तिमत्त्व असलेला कृपासागर नावाचा राजा राज्य करीत असतो. त्याला धैर्यसागर नावाचा पुत्र असतो, असे कल्पिले आहे. या धैर्यसागर नामक राजपुत्राचे सोमकांत आणि प्रेमचंद्र असे दोन जिवलग मित्र असतात. सोमकांत प्रधान पूत्र व प्रेमचंद्र सावकार पूत्र असतो. हे तिघे मित्र सर्व विद्येने निपुन असतात. पूत्र प्रेमचंद्र हा आपल्या बापाच्या आज्ञेप्रमाणे मगध प्रांतातील विश्रामपूर येथे आपल्या व्यवसायानिमित्त स्थलांतरीत होतो. पण जाताना आपल्या प्रिय मित्रांना दु:ख होईल या कारणास्तव त्यांना न भेटता निघून जातो. प्रेमचंद्र निघून गेल्यावर धैर्यसागर व सोमकांतास क्रुरकर्मा नावाचा मित्र मिळतो, तो दुष्ट, दुराचरणी, द्रव्यलोभी असून त्याला उग्रमणी नावाचा मित्र साथ देत असतो. पुढे इंद्रपूरचे राज्य हडपण्याचे त्यांचे कारस्थान सुरु होते. प्रेमचंद्र आपल्या ठिकाणाहून आपल्या मित्रांना आपल्या हालहवालाची माहिती पत्राद्वारे कळवितो. काही काळानंतर पर्यटनाच्या निमित्ताने धैर्यसागर आणि सोमकांत मित्राच्या भेटीसाठी बाहेर पडतात. तेव्हा क्रुरकर्मा आणि उग्रमणी इकडे सगळे राज्य बळकवितात. पुढे प्रवास करीत असताना धैर्यसागर आणि सोमकांत विलासपूरच्या राज्यात येतात या दोघांची विलासपूरचा राजा सत्यसागर याची राजकन्या कणकमंजिरी आणि तिची दासी कनकावती यांच्याशी भेट होते. या भेटीचे रुपांतर प्रेमात होते. तिकडे प्रेमचंद्राचा व्यवसाय अडचणीत येऊन खूप नुकसान होते. त्यामुळे तो स्वदेशी निघून जातो तेव्हा तिकडे इंद्रपूरला क्रुरकर्माने सर्व राज्य बळकावून आपले बस्तान बसवलेले असते. ही वार्ता जेव्हा धैर्यसागर आणि सोमकांत यांना समजते, तेव्हा सत्यसागर राज्याची सेना घेऊन धैर्यसागर इंद्रपूरावर स्वारी करतो आणि आपले राज्य पुन्हा मिळवितो. प्रेमचंद्राची पुन्हा सर्व घडी व्यवस्थित बसते. त्याला मित्राचे सहकार्य मिळते. पुढे धैर्यसागर याचा कनकमंजिरी बरोबर विवाह होतो. तर सोमकांताचा कनकावतीशी विवाह होतो. शेवटी सर्वांना सुख प्राप्त होते. सदर कादंबरीमध्ये आलंकारिक भाषा, संस्कृतप्रचुर काव्यपदांचा वापर करण्यात आला आहे.

संदर्भ : मूळ कादंबरी.