मुखर्जी, हृषिकेश (ऋषीदा) : (३० सप्टेंबर १९२२ – २७ ऑगस्ट २००६). भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान दिग्दर्शक आणि सिनेसंकलक. त्यांनी कलात्मकता आणि व्यावसायिकता यांचा योग्य मिलाफ असलेल्या अनेक मनोरंजक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

हृषिकेश मुखर्जी यांचा जन्म कोलकात्यात झाला. कोलकाता महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर तिथेच त्यांनी काही दिवस गणित आणि विज्ञान विषयाचे अध्यापनही केले. त्यांना बुद्धिबळ खेळाची खूप आवड होती. छायाचित्रणकला शिकण्याच्या तीव्र इच्छेमुळे त्यांनी बी. एन. सरकार यांच्या न्यू थिएटर कंपनीच्या प्रोसेसिंग लॅबमध्ये नोकरी केली. तिथेच प्रख्यात सिनेसंकलक सुबोध मित्तर यांनी त्यांना सिनेमाच्या संकलनकलेची ओळख करून दिली. त्यानंतर १९५१ साली हिंदी चित्रपट व्यवसायात नशीब आजमावण्यासाठी मुखर्जी सुप्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांच्याबरोबर मुंबईला आले. मुंबईत बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेल्या माँ, परिणीता, बिराज बहु, देवदास आणि मधुमती या चित्रपटांचे त्यांनी संकलन केले. मधुमती या चित्रपटासाठी उत्कृष्ट संकलकाचे फिल्मफेअर पारितोषिकही त्यांनी मिळवले. पण त्यानंतर दिग्दर्शन करण्याची ओढ त्यांना लागली होती. त्याचवेळी प्रसिद्ध कलाकार दिलीप कुमार यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.

हृषिकेश मुखर्जींनी १९५७ साली त्यांचा पहिला चित्रपट मुसाफिर दिग्दर्शित केला. या चित्रपटाला राष्ट्रीय पातळीवरील प्रशस्तिपत्रक मिळाले आणि त्यांची फिल्म इंडस्ट्रीत दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण झाली. पुढे १९५९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला राज कपूर अभिनित अनाडी हा चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ४२ चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांतील अनुराधा (१९६०), असली नकली (१९६२), अनुपमा (१९६६), आशीर्वाद (१९६८), सत्यकाम (१९६९), गुड्डी (१९७१), आनंद (१९७१), बावर्ची (१९७२), अभिमान (१९७३), नमकहराम (१९७३), मिली (१९७५), चुपके चुपके (१९७५), आलाप (१९७७), गोलमाल (१९७९), खुबसूरत (१९८०), बेमीसाल (१९८२), नरमगरम (१९८१), रंगबिरंगी (१९८३) हे काही महत्त्वाचे चित्रपट आहेत. १९९८ साली प्रदर्शित झालेला झूठ बोले कौवा काटे हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता. त्यांच्या अनुराधा या चित्रपटाला १९६१ साली बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोल्डन बेअर’ पारितोषिकासाठी नामांकन मिळाले होते. या चार दशकांच्या कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीतील दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, अशोककुमार, धर्मेंद्र, बलराज सहानी, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, अमोल पालेकर, शर्मिला टागोर, जया भादुरी, रेखा अशा मातब्बर कलाकारांनी त्यांच्या चित्रपटांत अभिनय केला आहे. मुखर्जींनी दूरदर्शनसाठी हम हिंदुस्थानी, तलाश, धुपछाव, रिश्ते, उजाले की ओर, अगर ऐसा हो तो या मालिकाही दिग्दर्शित केल्या आहेत.

बिमल रॉय यांच्या तालमीत तयार झालेल्या हृषिकेश मुखर्जींचे चित्रपट मध्यमवर्गीय व्यक्तींच्या जीवनातील सामान्य विषयांना महत्त्व देतात. त्यांच्या चित्रपटात कथेला अनन्यसाधारण महत्त्व असे. उत्तमोत्तम बंगाली कथा आणि कादंबरींचेही त्यांनी चित्रपटांत रूपांतर केले आहे. सामान्य माणसांच्या जीवनाशी निगडित अशा या सशक्त कथांमुळे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना आपल्या जीवनाचेच एक प्रतिबिंब वाटले आणि त्यामुळेच व्यावसायिक दृष्ट्या यशस्वीही झाले. कथा आणि विषय कोणताही असला, तरी त्यांचे चित्रपट निखळ कौटुंबिक करमणूक करतात. त्यांच्या चित्रपटांनी भारतीय जीवनपद्धतीतील मूल्यांचा जसे, एकत्र कुटुंबपद्धती, परस्पर प्रेम, प्रामाणिक जीवनशैली, सत्यप्रियता, पापभिरुता, सेवाभाव, अनुकंपा यांचा नेहमीच पुरस्कार केला आहे. तसेच व्यक्तींच्या आपापसातील नातेसंबंधांचे, मनोव्यापारांचेही त्यांनी तरलतेने आणि बारकाईने पडद्यावर सादरीकरण केले आहे. आयुष्य सुंदर आहे, या जगात आशावाद टिकून आहे अशी भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण करण्यात त्यांचे चित्रपट यशस्वी होतात. त्यांनी दिग्दर्शित केलेले हलक्या फुलक्या, विनोदी विषयांवरील चित्रपट सामान्य माणसांच्या आयुष्यातल्या छोट्यामोठया अडचणी, कडू गोड गमतीदार प्रसंग यांवर आधारलेले आहेत. त्यांतील विनोद कोणालाही अपमानित न करणारा, सभ्य, सुसंस्कृत असल्याने सगळ्या कुटुंबाबरोबर त्याचा आनंद घेता येतो. गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही विषयांवर पकड असणारे असे हे दिग्दर्शक होते.

हृषिकेश मुखर्जींच्या पत्नीचे, त्यांच्या मृत्यूआधी तीन दशकांपूर्वीच निधन झाले होते. त्यांना तीन मुली आणि दोन मुलगे. आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत ते मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या बंगल्यात एकटेच रहात होते.

हृषिकेश मुखर्जींना त्यांच्या कारकीर्दीत सर्वोत्कृष्ट संकलन, दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी अशी ९ फिल्मफेअर पारितोषिके आणि ७ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. १९९९ साली भारतीय चित्रपट क्षेत्रात मानाचा समजला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. २००१ साली प्रसिद्ध भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते एन. टी. रामाराव यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा ‘एनटीआर राष्ट्रीय पुरस्कार’ ही त्यांना मिळाला. त्याचवर्षी भारत सरकारचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान समजला जाणारा ‘पद्मविभूषण पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवण्यात आले.

चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाबरोबरच मुखर्जींनी काही वर्षें भारतीय अभ्यवेक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चे अध्यक्षपदही भूषविले. तसेच ‘मुंबई अकॅडमी ऑफ मुविंग इमेजेस’ (मामी) या मुंबईतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाशी संबंधित ट्रस्टचे पहिले अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील व्यावसायिक मसाला चित्रपटांच्या भाऊगर्दीतही स्वत:च्या साध्या सरळ, मनोरंजक चित्रपटांनी आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या बुद्धिमान दिग्दर्शकाने फक्त प्रेक्षकांवरच नाही, तर नंतरच्या पिढीतील अनेक चित्रपट दिग्दर्शकांवरही अमीट छाप सोडली आहे. अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे मुंबईत वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

समीक्षक : अभिजीत देशपांडे