नोलन, ख्रिस्तोफर : (३० जुलै १९७०). हॉलिवुड चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन लेखक, निर्माता व दिग्दर्शक. ख्रिस्तोफर यांचे वडील ब्रिटिश व आई अमेरिकन होती. त्यांचे वडील ब्रेंडन हे सृजनशील जाहिरात दिग्दर्शक होते. तर त्यांची आई क्रिस्टीना या शिक्षिका होत्या. ख्रिस्तोफर यांचे मॅथ्यू व जोनाथन हे भाऊ चित्रपट निर्माता आहेत. या तिघांचे शालेय शिक्षण लंडन येथेच एका निवासी शाळेत झाले.

लहानपणापासूनच ख्रिस्तोफर यांना दृकश्राव्यफीत बनवण्याचा छंद होता. वडिलांच्या सुपर-८ कॅमेराने ते लघुचित्रपट बनवायचे. त्यांना चित्रपट बनवण्याची प्रेरणा जॉर्ज लुकास यांची स्टार वॉर्स चित्रत्रयी व रिडली स्कॉट यांच्या ब्लेड रनर या चित्रपटांमुळे मिळाली. पुढे त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथून इंग्लिश साहित्यातील पदवी घेतली (१९९३). त्यानंतर ते व्यावसायिक व औद्यौगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकरता दृकश्राव्यफीती बनवत होते. तसेच संहिता वाचक (स्क्रिप्ट रीडर) व छायाचित्रण तंत्रज्ञ (कॅमेरा ऑपरेटर) म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या फॉलोईंग (१९९८) या पहिल्या चित्रपटाला विविध चित्रपट महोत्सवात चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर ते आणि त्यांच्या सर्व चित्रपटांच्या निर्मात्या असलेल्या त्यांच्या पत्नी एमा हॉलिवुडमध्ये दाखल झाले.

ख्रिस्तोफर यांना जागतिक कीर्ती त्यांच्या मेमेंटो (२०००) या चित्रपटामुळे मिळाली. यात विशिष्ट स्मृतिभ्रंशाचा − अँटेरोग्रेड अम्नेशिया − आजार झालेल्या नायकाची आपल्या बायकोच्या खुन्याचा शोध घेण्याची कथा अरेषीय (नॉन-लिनिअर – पूर्वी घडलेल्या घटना संक्षिप्त करून त्यांचा संबंध मूळ कथेशी जोडत संपूर्ण कथासूत्र तयार करणे) पद्धतीने दाखवण्यात आली होती. चित्रपटाच्या संकलनाचे व पटकथेचे खूप कौतुक झाले. चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनव (original) पटकथेचे ऑस्कर नामांकन मिळाले. त्यानंतर अल पचिनोची प्रमुख भूमिका असणारा त्यांचा इनसॉम्निया (२००२) हा चित्रपट प्रदर्शित झाला.

ख्रिस्तोफरच्या अतिशय यशस्वी चित्रपटांची सुरुवात बॅटमॅन बिगिन्स (२००५) या चित्रपटाने झाली. रंजक पुस्तकांचे (कॉमिक बुकचे) रूपांतर करताना ते कसे करायला हवे याचे एक चांगले उदाहरण या चित्रपटाच्या स्वरूपात मिळाले. ख्रिस्तोफरने या चित्रपटात रंजक शैलीचा वापर न करता बॅटमॅनच्या विश्वाला जास्तीत जास्त वास्तववादी रूप दिल्यामुळे याचे खूप कौतुक झाले. यानंतर आलेला द प्रेस्टीज (२००६) हा दोन जादूगारांतील स्पर्धेची कथा सांगतो. भाऊ जोनाथन नोलनसोबत त्यांनी द डार्क नाईटची (२००८) पटकथा लिहिली. वाढलेल्या गुन्हेगारीमुळे गॉथम शहराची झालेली क्षती व विदूषकाच्या रूपात व्यवस्था मोडणारा या शहरातील खलनायक यांची कथा म्हणजे हा चित्रपट. चित्रपट इतिहासातील एका महत्त्वाचा व रंजक पुस्तकांचे रूपांतर असलेला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून द डार्क नाईटची नोंद झाली आहे. समीक्षक व प्रेक्षकांनी गौरवलेल्या या चित्रपटाला ऑस्करची आठ नामांकने मिळाली. पैकी हीथ लीजर याला विदूषकाच्या भूमिकेसाठी मरणोत्तर सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता म्हणून तसेच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलनाचा (sound editing) असे दोन पुरस्कार मिळाले.

ख्रिस्तोफर यांनी इन्सेप्शन (२०१०) या चित्रपटाची पटकथा मेमेंटो हा चित्रपट बनवला, त्याचवेळी लिहायला घेतली होती. अभिनेता लिओनार्डो डीकाप्रिओने यात एका कॉर्पोरेट गुप्तहेराची भूमिका केली. जो एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन त्याच्या मनात एखाद्या संकल्पनेचे बीज रोवू शकत असतो. इन्सेप्शनला व्यावसायिक यशासोबत समीक्षकांची वाहवा मिळाली. बॅटमॅन मालिकेतील तिसरा व अंतिम चित्रपटद डार्क नाईट रायझेस (२०१२) मध्ये गॉथम शहराला खलनायक बेनच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी बॅटमॅन आपला जीव पणाला लावतो; जी त्याच्या अस्तित्वाची परीक्षाच ठरते. अशाप्रकारचे कथासूत्र होते. बॅटमॅन चित्रत्रयीतील सर्वांत जास्त कमाई या चित्रपटाने केली. तसेच अजून एक सुपरहिरो सुपरमॅनला परत एकदा पडद्यावर आणणाऱ्या मॅन ऑफ स्टीलच्या (२०१३) निर्मितीत ख्रिस्तोफर यांचा सक्रीय सहभाग होता.

अनेक चित्रपट विषयांच्या निर्मितीनंतर ख्रिस्तोफर यांची भव्य विषय मांडण्याची भूक वाढली. त्याचाच परिपाक म्हणून मानवी अस्तित्वाची चिंता वाहणारा व भविष्यात यशस्वीपणे पृथ्वीवरील मानवांचे स्थलांतर शक्य आहे, असे दाखवणाऱ्या इंटरस्टेलर (२०१४) या चित्रपटामध्ये त्यांनी एका वर्महोलद्वारे (काळ आणि अंतराळ यांना जोडणारी भूयारासारखी काल्पनिक रचना) पृथ्वीवरील मानवाला इतर ठिकाणी यशस्वीपणे स्थलांतर करता येईल, अशी आशावादी कथा मांडली आहे. या चित्रपटातील दृश्ये, तांत्रिक साहाय्याने परिणामकारी करून अत्यंत गुंतागुंतीच्या क्लिष्ट वैज्ञानिक संकल्पनांना सर्वसामान्य प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यात यशस्वी झालेली दिसून येतात. या चित्रपटाला ऑस्करचा सर्वोत्कृष्ट दृश्यपरिणामांचा (visual effects) पुरस्कार मिळाला. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी असणारा डंकर्क (२०१७) हा त्यांचा चित्रपट इतर चित्रपटांसारखा नव्हता. विज्ञान विषयाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या चित्रपटांच्या काळात महायुद्धाची कथा सांगणारा डंकर्क  प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल का? अशी निर्मात्यांना शंका असताना प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धावरील कथा असणारा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा ठरला. तांत्रिक श्रेणीतील तीन ऑस्कर पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले. त्यांचा पुढचा चित्रपट टेनेट (२०२०) हा कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झाला. कोरोनामुळे जवळपास सर्वच देशांमध्ये चित्रपटगृहे एकतर अंशतः किंवा पूर्णपणे बंद होती. त्यामुळे त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. टेनेटची कथा पारंपरिक जेम्स बॉंडच्या हेरपटांच्या रचना वापरते; पण तिची कथनशैली ही हेरपटांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट दृश्यपरिणामांचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ओपनहायमर (२०२३) या चित्रपटाला २०२४ या वर्षीची ऑस्करची १३ नामांकने मिळाली. त्यातील सात ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाने जिंकले. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या आणि ख्रिस्तोफर नोलन यांना मिळालेल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराचा समावेश आहे. हा चित्रपट अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या चरित्रावर बेतलेला आहे. दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून ते ओळखले जातात.

एकतीस वर्षांच्या कारकीर्दीत सुमारे पंधरा चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या ख्रिस्तोफर यांनी विशिष्ट धाटणीचे चित्रपट केलेले दिसतात. वैज्ञानिक, गणिती संकल्पना ते सढळ हस्ताने वापरतात. त्याच जोडीला मानवी अस्तित्वाची चिंता, सामाजिक, राजकीय जाणिवांना ते केंद्रस्थानी ठेवतात. आपण जगत असलेले वास्तव हे ख्रिस्तोफर मांडत असलेल्या वास्तवापेक्षा वेगळे असते, अशी जाणीव प्रेक्षकांना त्यातून होते. त्यांच्या कथेतील पात्र ज्या वास्तवात जगतात ते प्रसंगी बदलता किंवा वाकवता येऊ शकते असे दिसते. त्यामुळे त्यांच्या चित्रपटात अधि-वास्तव (meta-reality) दिसून येते. हे वास्तव वर्तमानकालीन वास्तवाच्या समांतर पातळीवर घडताना दिसते. त्यांच्या चित्रपटात काळाला खूप महत्त्व आहे; किंबहुना त्यांच्या चित्रपटांतील सर्व कथांमध्ये काळ ही एक व्यक्तिरेखा म्हणून ठळकपणे दिसून येते. इथे काळ म्हणजे कथानकातील वेळ. एक एकक म्हणून त्याकडे बघावे लागेल. या एककाच्या साहाय्याने कथानकातील विश्वात घडणाऱ्या गोष्टींचा उलगडा व्हायला सोपे जाते. काळाचा अतिशय चपखल व योग्य वापर त्यांनी इन्सेप्शनइंटरस्टेलर या चित्रपटांत केलेला दिसून येतो. तसेच डंकर्कमध्ये हा काळ कथेचे तीन भाग म्हणून येतो.

ख्रिस्तोफर यांच्या सर्व चित्रपटांत भावनिक नाट्य पण इतर बाबींसारखेच महत्त्वाचे असते. प्रेक्षकांनी भावनिक रीत्या नायकाशी तादात्म्य पावणे त्यांना अपेक्षित असते. मेमेंटोमध्ये नायकाची पत्नी मारली गेलीय; पण ती त्याच्या स्मृतीतून जात नाही. तो त्या स्मृतींच्या आधारे खुन्यापर्यंत पोचतो. ही स्मृती एका अर्थाने नायकाला खुन्यापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा देते. बॅटमॅन गॉथम शहराशी भावनिकरित्या जोडला गेलाय. त्यामुळे तिसऱ्या भागात जीव जाईल अशा अवस्थेत असताना शहराला वाचवणे गरजेचे आहे, या आकांक्षेपोटी तो परत येतो. भावनिकता ही जिवंत व्यक्तीसोबतच शहरासारख्या भौतिक गोष्टीशी सुद्धा निगडित असू शकते. असे ख्रिस्तोफर या कथांतून सुचवतात.

ख्रिस्तोफर नोलन यांना चित्रपटातील योगदानाकरता ऑस्कर पुरस्कारांबरोबरच इतर अनेक महत्त्वाचे पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांपैकी बाफ्ता (BAFTA) आणि गोल्डन ग्लोब पुरस्काराची नामांकने आणि २०१९ मध्ये ‘कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ (Commander of the Order of the British Empire (CBE)) हा ब्रिटनमधील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक हे होत.

ख्रिस्तोफर नोलन यांचा एम्मा थॉमस यांच्याबरोबर १९९७ मध्ये विवाह झाला. त्यांना चार मुले आहेत. एम्मा थॉमस या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या असून ख्रिस्तोफर आणि त्यांनी मिळून सिंकपी (Syncopy) या चित्रपटनिर्मिती संस्थेची २००१ मध्ये स्थापना केली. याच संस्थेद्वारे त्यांनी त्यांच्या बहुतांश चित्रपटांची निर्मिती केली असून चित्रपटाच्या सहनिर्मितीची बाजू एम्मा समर्थपणे सांभाळतात.

समीक्षक : संतोष पाठारे