स्प्रेंगल, मॉतेऑस क्रिस्ट्यॉन : (२४ ऑगस्ट १७४६ – ७ जानेवारी १८०३). जर्मन भूगोलज्ञ आणि इतिहासकार. जर्मनीतील (तत्कालीन स्वतंत्र मेकलेनबुर्ग राज्यात) रोस्टॉक या शहरात एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी त्याचा जन्म झाला. त्याचे घराणे मूळचे डँझिग शहरातील होते. त्याच्या बालपणाविषयी व शालेय जीवनाविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. १७७३ साली जर्मनीतील गटिंगेन विद्यापीठात त्याने प्रवेश घेतला. तेथे इंग्लिश, फ्रेंच यांसोबतच इटालियन या तत्कालीन प्रचलित व ग्रीक-लॅटिनसारख्या प्राचीन भाषांचे अध्ययन केले. ऑगस्ट श्लोझर (१७३५–१८०९) या इतिहासकाराचा त्याच्यावर प्रभाव होता. त्यामुळे इंग्लंड व त्याच्या वसाहतींशी संबंधित साधनांचा अभ्यास स्प्रेंगलने सुरू केला. १७७६ मध्ये त्याने ‘फॉकलंड बेटांचा इतिहासʼ व ‘ब्रिटनच्या वसाहतींचे संक्षिप्त वर्णनʼ आणि १७७७ मध्ये ‘उत्तर अमेरिकेची सध्याची स्थिती दर्शविणारी पत्रेʼ ही पुस्तके त्याने प्रकाशित केली.
स्प्रेंगल पुढे गटिंगेन विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाला (१७७८). त्याने तेथे दिलेले पहिलेच व्याख्यान हे अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या पार्श्वभूमीवर उत्तर अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींबद्दल होते. त्याची अल्पावधीतच जर्मनीतील हाल विद्यापीठात त्याची इतिहास आणि राज्यशास्त्राचा पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून बदली झाली (१७७९). त्याच वर्षी त्याने कृष्णवर्णीयांच्या देहव्यापारासंबंधी एक पुस्तक लिहिले. हाल येथे त्याने राज्यशास्त्र, प्रशियन व जर्मन इतिहास, व यूरोपीय इतिहासाचे अध्ययन व अध्यापन केले. त्यातही समकालीन इतिहासाला त्याने प्राधान्य दिले. राज्यशास्त्रासंबंधीचे त्याने लिहिलेले एक क्रमिक पुस्तकही लोकप्रिय झाले. याखेरीज तो नियमितपणे सार्वजनिक व्याख्यानेही देत असे. ब्रिटिश वसाहती, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, पॅरिसमधील १७६३ व १७८३ चे शांतता-करार, भारताचा इतिहास आणि यूरोपियनांचे भारताशी असलेले संबंध हे त्याचे आवडते विषय. यांसंबंधी त्याने ऐतिहासिक-भौगोलिक परिसंवादही आयोजित केले.
पुढे स्प्रेंगल प्रसिद्ध निसर्ग वैज्ञानिक योहान फॉस्टर (१७२९–१७९८) याच्या संपर्कात आला (१७८०). मूळचा ब्रिटिश असलेला फॉस्टर हा त्याच वर्षी हाल विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाला होता. कॅप्टन जेम्स कुकसोबतच्या त्याच्या तीन वर्षे चाललेल्या जगप्रवासाचा वृत्तांत फॉस्टरने नुकताच प्रकाशित केला होता. त्यानंतर स्प्रेंगल, फॉस्टर आणि फॉस्टरचा मुलगा जॉर्ज या तिघांनी मिळून अनेक प्रवासवर्णने अधिक माहिती पुरवून, संपादित करून प्रकाशित केली. यांमध्ये १४ खंड (१७८१-९०), १३ खंड (१७९०-९३), १४ खंड (१७९४-१८००), आणि ८ खंड (१८००-०३) असे एकूण चार निरनिराळ्या मालिकांमधील प्रवासवर्णनांचे एकूण ४९ खंड संपादित करण्यात स्प्रेंगलचे योगदान होते. या कामी त्याच्या पत्नीसह काही भाषांतरकारांची मदतही त्याला होत असे. फॉस्टरच्या विल्हेमिना या मुलीशी त्याचा विवाह झाला (२८ ऑक्टोबर १७८१). त्या वेळी त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. १७८२ साली त्याने उत्तर अमेरिकेतील युद्ध व इंग्लंड आणि फ्रान्सवर त्याचे होणारे परिणाम याविषयी एक पुस्तक लिहिले. १७८३ पासून त्याने भारतावर आपले लक्ष केंद्रित केले. त्याने इंग्रजांच्या भारतातील युद्धांबद्दल एक पुस्तक लिहिले. इंग्रजांनी भारतात केलेल्या अत्याचारांचे तपशीलवार वर्णन त्यात सापडते. यानंतर त्याने सुरुवातीपासून ते सालबाईच्या तहापर्यंतचा (१७८२) मराठ्यांचा इतिहास लिहिला (१७८६). मराठ्यांचा इतिहास लिहिणारा जॉन केर नंतर स्प्रेंगल हा दुसरा यूरोपीय इतिहासकार. त्याने हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्यावरही पुस्तके लिहिली. यांखेरीज त्याने अनेक जर्मन नियतकालिके व वृत्तपत्रांतही लेख लिहिले. एका भौगोलिक कोशासाठीही त्याने काही लेख लिहिले (१७९७). भारताच्या भूगोलाबद्दल त्याने लिहिलेला ग्रंथ ही त्याची अखेरची निर्मिती (१८०२). पुढे काही मतभेदांमुळे फॉस्टर कुटुंबीयांशी त्याचे संबंध दुरावले.
फुप्फुसांचा दाह आणि ताप यामुळे हाले येथे त्याचे निधन झाले. मरणोत्तर त्याच्या कुटुंबाला अनेक कर्जांचा सामना करावा लागला. बर्टूख नामक एका उद्योगपतीच्या मदतीने त्यांपैकी बरीच कर्जे फेडली.
स्प्रेंगलने सु. छत्तीस पुस्तके लिहिली. शिवाय अनेक लेख आणि सु. पन्नास पुस्तकांचे संपादन केले. त्याचे पूर्ण लेखन जर्मन भाषेत असून अन्य भाषांमधील पुस्तकांचे भाषांतर करताना आवश्यक तितकाच मजकूर घ्यावा, असा त्याचा कटाक्ष असे. त्याने स्वत: लिहिलेल्या पुस्तकांमधूनही हेच दिसून येते. कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश त्याच्या लेखनात आढळत नाही – विशेषत: यूरोपकेंद्री श्रेष्ठत्वभावना आणि पौर्वात्य समाजांबद्दल तुच्छता हे तत्कालीन यूरोपातील अनेक लेखकांमध्ये दिसून येणारे दुर्गुण त्याच्या लेखनात आढळत नाहीत. भावनातिरेक टाळून, जगातील सर्व संस्कृतींचा समतोलपणे विचार करून, तत्कालीन अनेक साधनांमधून मिळणारी आकडेवारी वापरून निष्कर्ष काढणे हा त्याच्या लेखनाचा विशेष. असे असूनही मरणोत्तर त्याचे विस्मरण झाले, याचे कारण म्हणजे एकोणिसाव्या शतकातील यूरोपात बळावलेला वसाहतवाद आणि त्याचे त्यांच्या लेखनात पडलेले अभिनिवेशी प्रतिबिंब.
स्प्रेंगलने इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा भारतावर जास्त पुस्तके लिहिली. मराठेशाहीच्या इतिहासलेखनातही त्याचे स्थान महत्त्वाचे आहे. भूगोल, व्यापार, राजकीय घडामोडी इत्यादी पैलूंचा योग्य परामर्श त्याच्या लेखनात दिसून येतो.
संदर्भ :
- Hänsch, Bruno Felix, “Matthias Christian Sprengel, ein Geografischer Publizist am Ausgange des 18. Jahrhunderts”, Halle, Germany, 1902.
- Keune, Jon, “M. C. Sprengel’s Writings on India: A Disenchanted and Forgotten Orientalism of the Late Eighteenth Century”, Deploying Orientalism in Culture and History: From Germany to Central and Eastern Europe, Eds., Hodkinson, James & others, pp. 117-134, Rochester, New York, U. S. A., 2013.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर