जर्मन भूगोलज्ञ आणि इतिहासकार मॉतेऑस क्रिस्ट्यॉन स्प्रेंगल (१७४६–१८०३) याने जर्मन भाषेत लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ (१७८६). जर्मनीमधील हाल विद्यापीठात इतिहासाचा प्राध्यापक असलेल्या स्प्रेंगलने हाल येथीलच योहान याकोब गबावर याच्याकडून १७८६ साली त्याची प्रथमावृत्ती प्रकाशित केली. इंग्रजीखेरीज अन्य कोणत्याही यूरोपीय भाषेत लिहिलेला फक्त मराठ्यांचा असा हा पहिलाच विस्तृत इतिहास आहे. त्याची एकूण २४६ पाने असून यात छ. शिवाजी महाराजांपासून ते १७८२ साली मराठे व इंग्रजांमधील सालबाईच्या तहापर्यंतचा इतिहास येतो. मराठेशाही ही भारतातील सर्वांत प्रबळ सत्ता असूनही बह्वंशी अज्ञात असल्यामुळे हा इतिहास लिहीत असल्याचे स्प्रेंगल प्रस्तावनेत नमूद करतो. यासाठी त्याने उपलब्ध झालेले प्रत्येक साधन पाहिल्याचाही तो दावा करतो. पुस्तकातील अनेक तळटिपा त्याची साक्ष देतात. प्रामुख्याने इंग्लिश साधने वापरली असली तरी त्याखेरीज डच, फ्रेंच, जर्मन, पोर्तुगीज, इटालियन व लॅटिन भाषांमधील साधनेही त्याने वापरल्याचे दिसून येते. पुस्तकाशेवटी असलेली संदर्भयादी तब्बल ३३ पानांची आहे.
स्प्रेंगलच्या लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तत्कालीन लेखकांप्रमाणे ऐतिहासिक घटनांचे नैतिक दृष्टिकोनातून मूल्यमापन न करता प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणेच निष्पक्षपातीपणे तो इतिहासलेखन करीत जातो. उपलब्ध साधनांची सखोल चिकित्सा करून अनेक घटक, उदा. सैन्यसंख्या, युद्धाचा खर्च, करांची टक्केवारी, इत्यादींची आकडेवारी दिल्यामुळे वाचकाला उत्तम कल्पना येते. घटनांवर त्याचे भाष्य क्वचितच येते. त्याला अपवाद म्हणजे छ. शिवाजी महाराजांचा. त्यांच्याबद्दल लिहिताना त्याची नेहमीची त्रयस्थ, तटस्थ शैली बदलते. स्प्रेंगलच्या मते छ. शिवाजी महाराजांचा जन्म १६२९ साली होऊन १६७४ साली त्यांचा राज्याभिषेक झाला. धर्माबद्दल एरवी ओझरते उल्लेख करणारा स्प्रेंगल त्यांच्याबद्दल मात्र विस्ताराने लिहितो. भारतीय धर्माचे पालन करणारे छ. शिवाजी महाराज हे मोठे धर्मसंरक्षक असून औरंगजेबाने देव व देवालयांच्या केलेल्या विटंबनेचा त्यांनी उत्तम बदला घेतल्याचे तो नमूद करतो. यात त्याने ब्रिटिश इतिहासकार रॉबर्ट ऑर्मच्या पुस्तकातील संबंधित मजकूर मुळाबरहुकूम भाषांतरित केल्याचे काही संशोधकांनी दाखवले आहे. प्रस्तावनेत स्प्रेंगलने ऑर्मचे ऋण मान्य केले असल्याने यात अनुचित काही नाही.
मराठ्यांच्या इतिहासातील अनेक घटनांच्या तारखा यात अचूक नमूद असून अनेक ठिकाणी चुकाही झालेल्या आहेत. उदा., छ. शिवाजी महाराजांचा स्मृतिदिन ५ एप्रिल १६८० हा अचूकपणे नमूद करूनही १६७४ सालच्या राज्याभिषेकानंतर शहाजीराजांना अटक केल्याचे स्प्रेंगल म्हणतो. छ. संभाजी महाराजांची कारकीर्द वर्णन करताना औरंगजेबाने केलेल्या त्यांच्या छळाचे व हत्येचेही त्यात वर्णन येते. परंतु १६८९–१७०७ मधील मोगल-मराठे संघर्षाचा मात्र यात विशेष काहीच उल्लेख नाही. कारण १७८२ मधील जॉन केरच्या इतिहासावर विश्वास नसल्याने आणि त्याखेरीज अन्य काही उपलब्ध साधनांत या कालखंडाची अतिशय विस्कळीत माहिती असल्याने स्प्रेंगलकडून हा भाग टाळला गेला असावा, असा तर्क त्याच्या प्रस्तावनेवरून करता येतो. त्यानंतरचा इतिहास तीन ढोबळ भागांत विभागला आहे : १) इ. स. १७३९ मधील नादिरशाहचे आक्रमण २) इ. स. १७६१ मध्ये मराठ्यांचा पानिपतातील पराभव ३) इ. स. १७८२ मधला मराठे-इंग्रज तह. यातही काही ढोबळ तथ्यात्मक चुका आहेत. उदा., पहिले बाजीराव पेशवे हे शाहू छत्रपतींच्या मरणोत्तरही जिवंत असल्याचे नमूद आहे. त्याशिवाय मराठ्यांच्या उत्तरेतील स्वाऱ्यांचे व राजकारणांचे वर्णन बरेच त्रोटक आहे. तुलनेने पहिल्या मराठे-इंग्रज युद्धाचे वर्णन जास्त तपशिलात येते.
पहिले मराठे-इंग्रज युद्ध हा स्प्रेंगलकरिता समकालीन इतिहास असल्यामुळे त्याला त्यासंबंधीचे ब्रिटिश पार्लमेंटरी रिपोर्ट्स आणि १७५६ नंतरच्या इतिहासाकरिता कर्नाटक रिपोर्ट्स या साधनांचा बराच उपयोग झाला. परंतु येथेही स्प्रेंगल उपलब्ध साधनांबद्द्ल समाधानी नसल्याचे दिसते. यूरोपात राहणाऱ्यांना भारतातील समकालीन घटनांबद्दल आधीच्या तुलनेत कमी माहिती मिळत असल्याचे तो सांगतो. हा इतिहास लिहिताना साधनांची अनुपलब्धता आणि उपलब्ध साधनांचा विस्कळीतपणा याबद्दल त्याने बरेच लिहिले असून प्रस्तावनेत तो सदर प्रयत्न हा जर्मन वाचकांच्या प्रशंसेस पात्र होण्याबद्दल शंकाही व्यक्त करतो. बहुतांशी त्याने कोणत्याही प्रकारचे भाष्य करणे टाळलेले असून त्याला थोडेच अपवाद आहेत. पुस्तकाच्या शेवटच्या वाक्यात तो म्हणतो की, आता (इ. स. १७८६ मध्ये) ब्रिटिश हे भारतातील सर्वांत प्रबळ सत्ता होऊ घातलेले असून, तुलनेने मराठे हे सामंतशाही व्यवस्थेत अडकून पडलेले आहेत. पुस्तकाच्या शेवटी एक नकाशाही दिलेला असून, त्यात तत्कालीन दक्षिण व मध्य भारतातील राजकीय सीमा तपशीलवार दाखवलेल्या आहेत. मराठ्यांची सर्व लहानमोठी राज्ये त्यात ठळकपणे दिसतात. पुस्तकाचे मूळ नाव Geschichte der Maratten bis auf den lezten Frieden mit England den 17 Mai 1782 असे असून यात ‘इंग्लंडबरोबर अलीकडेच झालेल्याʼ तहाच्या तारखेचा उल्लेख आहे. पुढे मात्र १८१४ च्या पुनर्मुद्रणात तारखेचा उल्लेख काढून फक्त Geschichte der Maratten bis auf den lezten Frieden mit England असे नाव दिले आहे. कारण तोपर्यंत १७८२ चा सालबाईचा तह जुना झाला होता व अनेक राजकीय समीकरणेही बदलली होती.
या पुस्तकाचे १७९१ साली पुनर्मुद्रण केले जाऊनही मनासारखा खप न झाल्यामुळे न खपलेल्या प्रती एका प्रकाशकाने विकत घेऊन, मुखपृष्ठ बदलून पुन्हा एकदा विक्रीस ठेवल्या. परंतु याचाही खप विशेष झालेला दिसत नाही. कारण त्यानंतरचे इंग्रज इतिहासकार उदा., एडवर्ड स्कॉट-वेरिंग, ग्रँट डफ यांनी त्याचा साधा उल्लेखही केलेला नाही. तुलनेने नेदरलँड्स व डेन्मार्कमध्ये काही प्रमाणात या पुस्तकाचा खप झालेला दिसून येतो. कारण १७८७ सालीच De Aalborgske allene privilegerede Jydske Efterretninger नामक डॅनिश वृत्तपत्रात या पुस्तकाची छोटीशी माहिती मिळते, तर १७९८च्या Rotterdamse Courant नामक डच वृत्तपत्रात हे पुस्तक विकण्यासाठीची जाहिरातही सापडते.
महाराष्ट्रातील संशोधकांना याचा प्रथम परिचय हा ज्ञानकोशकार केतकर यांची जर्मन पत्नी शीलवती केतकर यांनी करून दिला. कमी साधने उपलब्ध असूनही स्प्रेंगलने इतिहासाची मांडणी अधिक शिस्तबद्धपणे केल्याचे केतकर नोंदवतात. जर्मन संशोधक डिटमार रोथरमुंड हेही स्कॉट-वेरिंगच्या तुलनेत स्प्रेंगलकृत मांडणी अधिक पद्धतशीर व तर्कशुद्ध असल्याचे प्रतिपादन करतात. या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळातील ग्रंथालयात उपलब्ध असून ते आर. एन. चापेकर यांनी केलेले आहे. अद्याप मराठी भाषांतर झालेले नसून, महाराष्ट्रीय संशोधकांची भिस्त ही डिटमार रोथरमुंड, शीलवती केतकर व चापेकर यांच्यावरच राहिली आहे. याखेरीज स्प्रेंगलने लिहिलेल्या भारतविषयक अन्य तीन पुस्तकांमध्येही मराठ्यांचा उल्लेख अनेकदा येतो.
संदर्भ :
- Keune, Jon, ‘M. C. Sprengel’s Writings on India: A Disenchanted and Forgotten Orientalism of the Late Eighteenth Centuryʼ, Deploying Orientalism in Culture and History: From Germany to Central and Eastern Europe, Eds., James Hodkinson & Others, pp. 117-134, Rochester, New York State, USA, 2013.
- Kulkarni, A. R. Maratha Historiography : Based on Heras memorial lectures, Manohar Publishers and Distributors, India, 2006.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर