ट्राइश्के, हाइन्‍रिख फोन : (१५ सप्टेंबर १८३४—२८ एप्रिल १८९६). प्रसिद्ध जर्मन इतिहासकार आणि राजकीय लेखक. एका सॅक्सन सेनाधिकाऱ्याचा मुलगा. ड्रेझ्‌डेन येथे जन्म. बॉन आणि लाइपसिक ह्या विद्यापीठांत १८५१–५४ ह्या काळात शिक्षण घेऊन त्याने इतिहास विषयात पदवी संपादन केली. विद्यार्थीदशेत हेगेल, डालमान, रोशर, फिक्टे आदी तत्त्ववेत्त्यांच्या लेखनाचा त्याच्यावर पगडा होता. सुरुवातीस तो उदारमतवादी व राष्ट्रवादी होता; पण नंतरच्या आयुष्यात उदारमतवादापेक्षा त्याचा कल राष्ट्रवाद व पुराणमतवाद यांकडे अधिक होता. त्यास जर्मनीचे वसाहतींचे साम्राज्य व्हावे, असे वाटत होते. म्हणून त्याने उदारमतवाद आणि त्याचा पुरस्कार करणारे पक्ष ह्यांवर टीका केली. प्रशियन नेतृत्वाखाली जर्मनीचे एकीकरण व्हावे, म्हणून त्याने आपल्या लेखाद्वारे पुरस्कार केला. त्याने त्याने इतिहास व राज्यशास्त्र हे विषय अनुक्रमे लाइपसिक (१८५९), फ्रायबर्ग (१८६३), कील (१८६६), हायड्लबर्ग (१८६७) आणि बर्लिन (१८७४) ह्या विद्यापीठांत व्याख्याता व नंतर प्राध्यापक म्हणून शिकविले. मध्यंतरी १८६६ नंतर काही दिवस तो Preussische Jahrbucher ह्या मासिकाचा संपादक होता. तथापि मतभेदामुळे त्याने संपादकत्वाचा राजीनामा दिला.

१८७१–८४ च्या काळात तो जर्मन संसदेचा सभासद होता. रांकेच्या मृत्यूनंतर त्याची अधिकृत इतिहासलेखक म्हणून नियुक्ती झाली. १८९५ मध्ये तो Historische Zeitschrift चा संपादक झाला आणि पुढे काही दिवसांनी बर्लिन येथे निधन पावला. त्याच्या लेखनात शिक्षक, राजकारणपटू व इतिहासलेखक या तीन भूमिकांचा समन्वय आढळतो.

त्याने इतिहास व राज्यशास्त्र ह्या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्याचे निबंध, स्फुटलेख व भाषणेही पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली व त्याच्या बहुतेक पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतरही झाले आहे. त्याने लिहिलेला जर्मनीचा इतिहास आलंकारिक भाषा, कथनपद्धती, शैली यांनी सरस ठरला आहे. त्याची तुलना फक्त मेकॉलेच्या इंग्लंडच्या इतिहासाबरोबरच करावी लागेल. यातही होहेंझॉलर्न घराणे व बिस्मार्क यांबद्दलचे त्याचे प्रेम व सहानुभूती दिसते. त्याचप्रमाणे मेटरनिख आणि ब्रिटिश यांबद्दलचा तिरस्कार जाणवतो. अर्थात त्यातही काही ठिकाणी विस्कळित मांडणी, विषयांतर इ. दोष आढळतात. त्याचे काही प्रमुख ग्रंथ : Historische und Politische Aufsatze (४ खंड, १८६५–९७); Zehn Jahre deutscher Kampfe : Schriften zur Tagespolitik (२ खंड, १८७४); Der Sozialismus und scine Gonner (१८७५); Deutsche Geschichte im 19. Jahrhundert (५ खंड, १८७६–९४); Ein wort uber unser Judentum (१८८०); Zwei Kaiser (१८८८) हे होत. Politik हे १९०७ मध्ये दोन खंडात प्रसिद्ध झाले. त्याने Historische und Politische Aufsatze या पुस्तकात नेदर्लंड्स व काव्हूर यांसंबंधी गौरवोद्‌गार काढले आहेत. संसदेतील त्याची भाषणे Reden im deutschen Reichstage (१८९६) या ग्रंथात संगृहीत केली आहेत.

संदर्भ :

  • Dorpalen, Andreas, Heinrich Von Treitschke, Toronto, 1957.