एश्चेरिकिया कोलाय (Escherichia Coli) या जीवाणूचा समावेश प्रोटीओबॅक्टिरिया (Proteobacteria) संघातील गॅमाप्रोटीओबॅक्टिरिया (Gammaproteobacteria) वर्गाच्या एंटेरोबॅक्टिरियालीस (Enterobacteriales) या गणात होतो. हा जीवाणूंच्या फीकल कॉलिफॉर्म (feacal coliform) गटात मोडतो. ग्रॅम अभिरंजन (Gram Staining) परिणामानुसार तो ग्रॅम ऋण (Gram negative) आहे. यास ई. कोलाय असेही म्हणतात.
१८८५ मध्ये थिओडोर एश्चेरिक (Theodor Escherich) यांनी एश्चेरिकिया कोलाय जीवाणूचा शोध लावला. एश्चेरिकिया कोलाय जीवाणू दंडाकार असून त्याची सरासरी लांबी २µm (मायक्रोमीटर), रुंदी ०.५µm आणि व्यास ०.२५—१µm असतो. तो ऐच्छिक वातनिरपेक्षी (Facultative anaerobic) असल्याने बाह्य ऑक्सिजन विरहीत माध्यमात देखील जिवंत राहतो.
ई. कोलायचे बहुतेक उपप्रकार (Strains) निरुपद्रवी असून ते मानव व इतर उष्णरक्तीय प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळून येतात. तेथे ते जीवनसत्त्व के२ (K2) तयार करतात तसेच आतड्यांमध्ये होणारी रोगकारक जीवाणूंची वाढ रोखण्याचे महत्त्वाचे कार्य देखील ते सातत्याने करीत असतात. परंतु, काही प्रकारच्या ई. कोलायमुळे जठर अथवा आतड्याचा दाह, मूत्रमार्गाचा संसर्ग तसेच मस्तिष्कावरणशोथ (Meningitis) होऊ शकतो. तसेच या जीवाणूचा संसर्ग झाल्यास जुलाब व उलट्या होणे, मळमळणे, अशक्तपणा, ताप येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
ई. कोलाय जीवाणू हे शक्यतो अन्नपदार्थ किंवा पाणी यांमध्ये आढळत नाहीत. मानवी विष्ठा पिण्याच्या पाण्यात मिसळत असेल तरच पिण्याच्या पाण्यात ई. कोलाय जीवाणू आढळून येतात. यावरून पाण्याची शुद्धता तपासता येते. म्हणूनच ई. कोलायला निर्देशक जीवाणू (Indicator bacteria) असे म्हणतात. १०० मिलीलिटर पिण्याच्या पाण्यात एकही ई. कोलाय नसल्यास ते पाणी पिण्यास योग्य आहे असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार समजले जाते.
१९९७ साली ई. कोलायच्या जीनोमचा डीएनए (DNA) क्रम पूर्णपणे शोधून काढण्यात आला. प्रयोगशाळेत वापरण्यात येणाऱ्या K-12 प्रकारच्या ई. कोलाय च्या जीनोममध्ये ४६ लक्ष बेस जोड्या (Base pairs) वर्तुळाकृती डीएनएमध्ये असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने ई. कोलायच्या डीएनएमध्ये हव्या असलेल्या जनुकांची (Genes) स्थापना करून त्याद्वारे हवे ते प्रथिन, संप्रेरक आणि लस मिळविणे शक्य झाले आहे. ई. कोलायच्या अशा विविध गुणधर्मांमुळे तो प्रातिनिधिक सजीव म्हणूनही ओळखला जातो.
पहा : प्रातिनिधिक सजीव, प्रातिनिधिक सजीव : एश्चेरिकिया कोलाय.
संदर्भ :
- https://en.wikipedia.org/wiki/Escherichia_coli
- https://simple.wikipedia.org/wiki/Escherichia_coli
- https://en.wikipedia.org/wiki/Theodor_Escherich
समीक्षक : चित्ररेखा गिरीश कुलकर्णी