संसर्गजन्य रोगांना कारणीभूत होणाऱ्या अतिसूक्ष्म रोगकारकांचा मोठा गट म्हणजे विषाणू होय. मानव, मानवेतर प्राणी आणि वनस्पतींना संसर्ग करणाऱ्या विषाणूजन्य रोगांची संख्या मोठी आहे. प्राणी, वनस्पती तसेच जीवाणूंना संसर्ग करणारे असे विषाणूंचे २,८०० पेक्षा अधिक प्रकार ज्ञात आहेत. विषाणूंचा आकार, आकारमान, त्यावरील प्रथिनांच्या आवरणाची रचना (Capsid structure), केंद्रकीय अम्लांचा प्रकार, त्यांची वर्धनाची पद्धत (Method of replication), त्यांच्यामुळे होणाऱ्या विकाराचे स्वरूप आणि आश्रयी सजीव (Host species) यांनुसार विषाणूंचे वर्गीकरण केले जाते. मात्र, संदर्भ वेगवेगळे असल्याने विषाणू वर्गीकरण वर्गवारी अनेक प्रकारे करावी लागत होती. त्यामुळे विषाणू वर्गीकरण सुलभ, गुंतागुंत विरहित असण्याची आवश्यकता होती.

केंद्रकीय अम्लाच्या प्रकारावरून विषाणूंची वर्गवारी करण्याची पद्धत १९७२ मध्ये डेव्हिड बाल्टिमोर (David Baltimore) या सुप्रसिद्ध अमेरिकन वैज्ञानिकांनी प्रचलित केली. ती ‘बाल्टिमोर पद्धत’ (Baltimore classification) या नावाने प्रसिद्ध आहे. या पद्धतीत विषाणूंचे ७ प्रमुख गट केलेले आहेत (पहा : तक्ता क्र. १).

तक्ता क्र. १ : बाल्टिमोर वर्गीकरणातील विषाणूंचे गट

गट केंद्रकीय अम्लांचा प्रकार उदाहरण
गट १ दुपेडी डीएनए

(Double stranded DNA- dsDNA)

हर्पिस विषाणू (Herpes virus), पॉक्स विषाणू (Pox virus), काही प्रकारचे ॲडिनो विषाणू (Adenovirus), एप्स्टीन-बारविषाणू (Epstein Barr Virus)
गट २ एकपेडी डीएनए

(Single stranded DNA- ssDNA)

श्वान (Canines) व मार्जार कुलातील (Felines) प्राण्यांना संसर्ग करणारे पारव्हो विषाणू (Parvovirus)
गट ३ दुपेडी आरएनए

(Double stranded RNA- dsRNA)

रिओ विषाणू (Reo virus)
गट ४ धन एकपेडी आरएनए

(positive sense ssRNA)

सर्वप्रकारचे कोरोना विषाणू (Corona virus), पिकोर्ना विषाणू (Picornao viruses) आणि टोगा विषाणू (Toga viruses)
गट ५ ऋण एकपेडी आरएनए

(negative sense ssRNA)

ऱ्हॅब्डो विषाणू (Rhabdo viruses) (उदा., रेबीजचा विषाणू; Rabies viruses), इबोला विषाणू (Ebola virus), गोवराचा विषाणू (Measles virus), सर्वप्रकारचे इन्फ्ल्यूएंझा विषाणू (Influenza viruses).
गट ६ उलट दिशेने वाचला जाणारा एकपेडी डीएनए (Reverse transcribed – ssRNA-RT virus) एचआयव्ही (HIV) व अन्य रेट्रो विषाणू (Retro viruses)
गट ७ उलट दिशेने वाचला जाणारा एकपेडी आरएनए (Reverse transcribed – dsDNA-RT virus) हेपॅडना विषाणू  (Hepadna viruses) या वर्गातील विषाणू उदा., काही हेपेटायटिस विषाणू ( Hepatitis virus)

 

बाल्टिमोर विषाणू वर्गीकरण पद्धती

अनेक वर्षे विषाणूंच्या वर्गीकरणाची बाल्टिमोर पद्धत प्रचलित होती. परंतु, विषाणूविज्ञानामधील नवनवीन शोधांमुळे जास्त निकषांचा अंतर्भाव असलेली सर्वसमावेशक पद्धत प्रस्थापित करण्याची गरज निर्माण झाली. इंटरनॅशनल कमिटी ऑन टक्सॉनॉमी ऑफ व्हायरसेस (International Committee on Taxonomy of Viruses; ICTV) या १९६६ साली स्थापन झालेल्या संस्थेने हे काम हाती घेतले. आयसीटीव्हीने संशोधित केलेली विषाणूंच्या वर्गीकरणाची आणि विषाणूंच्या नामकरणाची आयसीटीव्ही पद्धत ही अन्य सजीवांच्या वर्गीकरण पद्धतीशी मिळती-जुळती आहे. या पद्धतीमध्ये विषाणूंची वर्गवारी वर्गीकरण श्रेणींच्या उतरत्या पदानुक्रमे (Hierarchically) केली जाते (पहा : तक्ता क्र. २). आयसीटीव्ही वर्गीकरणातील नोंदी अद्ययावत राखण्याचे काम सतत सुरू असते. नव्याने सापडणाऱ्या विषाणूंचा समावेश करतेवेळी, काही नवीन कुले व गणांची भर त्यात पडते. तसेच डीएनए-क्रमानिर्धारण (DNA sequencing) तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, विषाणूंच्या विविध गटांमधील साधर्म्य व फरकांचा अभ्यास करणे सोपे झाले आहे. वेळोवेळी मिळणाऱ्या नवीन माहितीला अनुसरून, काही कुले व गण बदलले जातात, रद्द केले जातात आणि प्रजातींचे पुर्नवर्गीकरण केले जाते.

तक्ता क्र. २ : आयसीटीव्ही (ICTV) वर्गीकरणाच्या श्रेणी

श्रेणी माहिती उदाहरण
गण (Order) गण ही सर्वोच्च श्रेणी, -व्हायरल्स (virales) या प्रत्ययाने दर्शवली जाते. एका गणामध्ये साधर्म्य असलेल्या विषाणूंची अनेक कुले आहेत. हर्पिस व्हायरल्स

(Herpes virales)

कुल (Family) -व्हिरिडी (viridae) या प्रत्ययाने दर्शवली जाणाऱ्या या श्रेणीमध्ये अनेक प्रजातींचा अंतर्भाव होतो. काही वेळा एका कुलाचे अनेक उप-कुलांमध्ये विभाजन केले जाते. उप-कुल व्हिरिनी (-virinae) या प्रत्ययाने दर्शवले जाते. हर्पिसव्हिरिडी

(Herpesviridae), अल्फाहर्पिसव्हिरिनी

(Alphaherpesvirinae)

प्रजाती (Genus) -व्हायरस (-virus) या प्रत्ययाने दर्शवली जाणाऱ्या या श्रेणीमध्ये एकमेकांशी साधर्म्य असलेल्या प्रजाति येतात. सिम्प्लेक्सव्हायरस

(Simplex virus)

जाती (Species) ही श्रेणी विषाणूच्या नावाने दर्शवली जाते. काही विषाणूंचे उपजाती (Subspecies), पोटजाती (Strain) यांमध्ये वर्गीकरण करतात. परंतु, सर्व विषाणूंना हे लागू होत नाही. ह्युमन हर्पिस व्हायरस-१ (Human Herpes virus -1)

आयसीटीव्ही वर्गीकरण अधिक व्यापक असून त्यामध्ये सर्वंकष पद्धतीने विषाणूंची वर्गवारी केली जाते. आयसीटीव्ही वर्गीकरणाअंतर्गत विषाणूंचे ७ गण आणि १०३ कुलांमध्ये वर्गीकरण केले आहे. कॉडोव्हायरेल्स (Caudovirales), हर्पिसव्हायरेल्स (Herpesvirales), लिगामेनव्हायरेल्स (Ligamenvirales), मोनोनिगाव्हायरेल्स (Mononigavirales), निडोव्हायरेल्स (Nidovirales), पिकोर्नाव्हायरेल्स (Picornavirales), टायमोव्हायरेल्स (Tymovirales) ही ती सात कुले आहेत. कोणत्याही गणात न बसलेल्या विषाणूंच्या ७७ पेक्षा अधिक कुलांचे वर्गीकरण अजूनही अपूर्ण आहे.

विषाणूंच्या वर्गीकरणामधील बदलांचे अहवाल ठराविक कालावधीने प्रसिद्ध होतात. हे सर्व अहवाल http://ictv.global/report/ या सर्वांसाठी खुल्या असलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आयसीटीव्हीने प्रकाशित २०१९ मध्ये प्रसिद्ध  केलेला अहवाल हे विषाणूंचे सर्वांत अद्ययावत वर्गीकरण आहे. त्यात १६८ कुलांचा व एकूण ६,५९० विषाणू जातींचा समावेश आहे.

पहा : विषाणू, सजीव वर्गीकरण.

संदर्भ :

  • http://ictv.global/virusTaxonomy.aspVirus taxonomy : the database of the International Committee on Taxonomy of Viruses (ICTV)
  • https://talk.ictvonline.org/taxonomy

समीक्षक :  प्रमोद जोगळेकर