नेराळे, मधुकर : (९ जून १९४३). तमाशा कला अभ्यासक, गायक, तमाशा संघटक. मधुकर नेराळे हे तमाशा कलेचे ज्येष्ठ अभ्यासक, गायक, नाट्य निर्माते, लोककला क्षेत्रातील संघटक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग आणि आईचे नाव अंजनाबाई होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे झाला. त्यांचे घराणे मूळचे ओतूरचे कार्डिले घराणे. त्यांच्या आजोबांचे कर्जत जवळील नेरळ येथे तेलाच्या व्यवसायानिमित्त दीर्घ काळ वास्तव्य होते, त्यामुळे नेराळे या आडनावाने त्यांचे घराणे ओळखले जाऊ लागले. मधुकर नेराळे यांच्या आई वडिलांनी १९४५ साली मुंबईत येऊन लालबाग येथे भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. जुन्नर, नारायणगाव ही तमाशाची पंढरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे मधूकर नेराळे यांचे वडील पांडुरंग यांना तमाशाची आवड निर्माण झाली. लालबाग मार्केटमध्ये मुख्य रस्त्याच्या भागाच्या बाजूला झाडाझुडपांची जागा भाड्याने घेऊन जागेची साफसफाई करून १९४९ पासून त्या जागेवर कनात लावून तमाशाचे खेळ सुरु केले. बहुसंख्य गिरणी कामगार असलेल्या या भागात न्यू हनुमान थिएटर उभे राहिले. सुमारे ४५ वर्षे हे न्यू हनुमान थिएटर संगीत बारीच्या तमाशा कलावंतांसाठी, ढोलकी फडाच्या तमाशा कलावंतांसाठी, लोककलावंतांसाठी आधार केंद्र बनले.

मराठी शालेय शिक्षण सुरु असतानाच पांडुरंग नेराळे यांनी आपल्या मुलाला शास्त्रीय गायनाची आवड आहे असे पाहून पंडित राजारामजी शुक्ला यांची गाण्याची शिकवणी लावली. १९५८ साली मधुकर नेराळे यांचे पितृछत्र हरपले. नाउमेद न होता त्यांनी न्यू हनुमान थिएटर सुरूच ठेवले माधव नगरकर, विठाबाई नारायणगावकर, तुकाराम खेडकर, दत्ता महाडिक पुणेकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, काळू बाळू, दादू इंदुरीकर अशा ढोलकी फडाच्या तमाशा कलावंतांचे संच न्यू हनुमान थिएटर मध्ये रसिकांचे रंजन करीत असत. रोशन सातारकर, गुलखंदकर, कला मीरा नगरकर, बरखा, अप्सरा जळगावकर, मधू – रत्ना कांबीकर, छाया – माया खुटेगावकर, लक्ष्मी कोल्हापूरकर, यमुनाबाई वाईकर अशा नामांकित संगीत बारीच्या पार्ट्या न्यू हनुमान थिएटरमध्ये लावणी दर्शन घडवीत असत.

इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मधुकर नेराळे यांचे औपचारिक शिक्षण थांबले तसेच शास्त्रीय गायनाचे शिक्षणही थांबले. राज्यातले ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दादासाहेब रुपवते, आप्पासाहेब इनामदार, मुकुंदा विचारे आदी मान्यवरांच्या सहकार्याने मधुकर नेराळे यांनी न्यू हनुमान थिएटरच्या व्यवस्थापनासोबतच स्वतःला तमाशा कलावंत, संगीतबारी कलावंत, शाहिरी कलावंत यांच्या संघटनात्मक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिले. तमाशा कला – कलावंत विकास मंदिर, अ. भा. मराठी शाहिरी परिषद, संगीतबारी थिएटर मालक संघटना, अ. भा. मराठी नाट्य परिषद, पवळा प्रतिष्ठान, शाहीर अमरशेख पुरस्कार समिती अशा वेगवेगळ्या संघटनामध्ये पदाधिकारी म्हणून त्यांनी पदे भूषविली .

जसराज थिएटर या स्वतःच्या नाट्य संस्थेमार्फत १९६९ साली मधुकर नेराळे यांनी वगसम्राट दादू इंदुरीकर आणि प्रभा शिवणेकर यांनी गाजविलेले वग गाढवाचं लगीन रंगमंचावर आणले. त्याचे शेकड्यावर प्रयोग केले. गाढवाचं लग्न, आतून कीर्तन वरून तमाशा, राजकरण गेलं चुलीत, उदं ग अंबे उदं, एक नार चार बेजार, पुनवेची रात्र काजळी अशी नाटके लोकनाट्य त्यांनी रंगभूमीवर आणली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित सातारा,सांगली, लातूर, नाशिक, जुन्नर येथील तमाशा शिबिरांचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. यमुनाबाई वाईकर, सत्यभामा बाई पंढरपूरकर, पांडुरंग घोटकर, मधू कांबीकर, राजश्री नगरकर, छाया खुटेगावर, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर अशा अनेक कलावंतांना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम सादर करण्याची संधी मधुकर नेराळे यांच्यातर्फे प्राप्त झाली. मुंबईत तमाशाची १९ थिएटर होती. ती सर्व बंद झाली. १९९५ साली न्यू हनुमान थिएटर ही बंद झाले .

महाराष्ट्र शासनाचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार, प्राचार्य पी. बी. पाटील सोशल फोरम शांती निकेतन पुरस्कार, सांगलीचा कर्मयोगी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. तमाशा कलेचे अभ्यासक, संघटक म्हणून मधुकर नेराळे यांचे कार्य मोलाचे आहे.

संदर्भ :

  • क्षेत्रसंशोधन