क्षेत्रमाडे, सुमती बाळकृष्ण : (२७ फेब्रुवारी १९१६ – ८ ऑगस्ट १९९८). मराठी कथालेखिका, कादंबरीकार व प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिका. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात रत्नागिरी जिल्ह्यातील झापडे या गावी झाला. त्यांचे मूळ आडनाव रेगे; परंतु क्षेत्रमाडे हा किताब मिळाल्याने क्षेत्रमाडे हे आडनाव त्यांनी धारण केले. वडील महसूल खात्यात निरीक्षक होते. सुमतीबाईंचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नासिक येथे झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत नासिक केंद्रात त्या मराठी विषयात सर्वप्रथम आल्या. बालपणीच आईचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावर दोन बहिणी आणि लहान भाऊ यांची जबाबदारी पडली होती, तथापि त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी पुण्याच्या बी. जे. मेडिकल महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची एल्. सी. पी. एस्. ही वैद्यक-शास्त्रातील पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी काही वर्षे बडोदे संस्थानात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले.

त्या वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी आयर्लंडला गेल्या (१९४८). तिथे रोटंडा विद्यापीठाची बालरोग आणि प्रसूतिशास्त्रातील एल्. एम्. ही पदवी घेऊन त्या भारतात परतल्या (१९५०). त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथे खासगी दवाखाना सुरू केला. अखेरपर्यंत त्यांचे वास्तव्य कोल्हापुरातच होते. वैद्यकीय सेवा करीत असतानाच त्यांनी आपला लेखन-वाचनाचा छंद जोपासला आणि कथा-लेखनास सुरुवात केली. त्यांची ‘वादळ’ ही पहिली कथा स्त्री मासिकात प्रसिद्ध झाली. पुढे स्त्री व माहेर मासिकांतून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. नंतर त्या कादंबरीलेखनाकडे वळल्या.

सुमतीबाईंनी विपुल लेखन केले. त्यांचे वीस कथासंग्रह, पंधरा कादंबऱ्या, कुमार वाङ्मय व दोन नाटके असे विविध साहित्यप्रकारांना स्पर्श करणारे लेखन आहे. या साहित्यसंपदेपैकी प्रीतिस्वप्न (१९५४), बीजेची कोर (१९६२) हे कथासंग्रह; महाश्वेता (१९६०), मैथिली (१९६३), श्रावणधारा (१९६४), मेघमल्हार (१९६८), अनुहार (१९७६), युगंधरा (१९७९), वादळवीज (१९८१), पांचाली (१९८४), तपस्या (१९८४) इत्यादी कादंबऱ्या आणि भैरवी (१९६८) व मीच जाहले माझी मृगया (१९८७) ही नाटके, या साहित्यकृती उल्लेखनीय आहेत. त्यांनी श्रेष्ठ कादंबरीकार व ज्ञानपीठकार  विष्णु सखाराम खांडेकर यांच्या सूचनेवरून अमरावतीच्या (विदर्भ) शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेल्या तपोवन संस्थेत काही दिवस वास्तव्य केले. तेथील कुष्ठरोग्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या व त्यांच्याशी संवाद साधला. या संवादाच्या अनुभूतीतून तेथील वास्तवावर बेतलेली त्यांची तपस्या  ही कादंबरी मनाला भिडते. युगंधरा  या कादंबरीवर त्याच शीर्षकार्थाची दूरदर्शन मालिका निघाली व ती लोकप्रिय झाली. त्यांच्या महाश्वेता  व मेघमल्हार या कादंबऱ्यांचे गुजरातीत, तर श्रावणधारा आणि मेघमल्हार यांचे हिंदीत अनुवाद झाले आहेत आणि काही कादंबऱ्यांच्या आवृत्त्याही निघाल्या आहेत. त्यांच्या स्वप्न अधुरा  या गुजरातीत अनुवाद केलेल्या नाटकाला केंद्र शासनाचा पुरस्कार लाभला (१९७३). त्यांनी यूरोपचा स्वेच्छा दौरा केला होता (१९७२).

त्या अविवाहित होत्या. वृद्धापकाळाने त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले.

संदर्भ :

  • गणोरकर, प्रभा, टाकळकर उषा आणि सहकारी, संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (१९२०-२००३), मुंबई, २००४.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.